तरुण भारत

हायवेबाधित शाळांच्या मूल्यांकन रकमेचे काय?

काम पूर्ण होत आले, तरी रकमेबाबत निर्णय नाही :  जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधण्याचे जि. प. शिक्षण सभापतींचे आदेश

प्रतिनिधी / ओरोस:

Advertisements

महामार्ग रुंदीकरणासाठी जमीन संपादित झाल्याने बाधित झालेल्या शाळांची मूल्यांकन रक्कम महामार्गाचे काम पूर्ण झाले, तरी जि. प. ला देण्याची कार्यवाही संबंधित उपविभागीय अधिकाऱयांनी केली नाही. दोन ते तीनवेळा स्मरणपत्र देऊनही ही रक्कम दिली जात नाही. इतरांचे पैसे देण्यात आले. मात्र शाळांचेच का नाहीत, असा सवाल उपस्थित करीत याकडे जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधण्याचे आदेश शिक्षण सभापती सावी लोके यांनी दिले. नडगिवे, पणदूर आणि वेताळबांबर्डे या तीन शाळांचे सुमारे दोन कोटी रुपये येणे रखडल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक सर्वसाधारण सभा शिक्षण सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै समिती सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, सदस्य विष्णूदास कुबल, सुधीर नकाशे, सरोज परब, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडुस, निरंतर शिक्षणाधिकारी तिजारे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, सर्व तालुका गटशिक्षणाधिकारी, अधिकारी खातेप्रमुख आदी उपस्थित होते.

मूल्यांकन रकमेचे काय झाले?

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण करताना जुन्या महामार्गालगतच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. यामध्ये नडगिवे, पणदूर व वेताळबांबर्डे येथील जिल्हा परिषद शाळाही बाधित झाल्या आहेत. या शाळांचे मूल्यांकन करून ते जि. प. ला देण्याचे निश्चित झाले आहे. पणदूर शाळेचे 73,50,367 रुपये, वेताळबांबर्डे शाळेचे 53,28,600 रुपये, तर नडगिवे शाळेचे 54,97,662 रुपये मूल्यांकन करण्यात आले आहे. मात्र याची रक्कम अद्याप जि. प. कडे देण्यात आलेली नाही. संबंधित प्रांताधिकाऱयांना याबाबत दोन ते तीनवेळा स्मरणपत्र देण्यात आले. मात्र अद्याप पैसे देण्यात आले नसल्याचे शिक्षणाधिकाऱयांनी सांगितले. दरम्यान हे पैसे मिळाले नसल्याने इमारती बांधण्याचे कामही रखडले असल्याचे सांगण्यात आले. सद्यस्थितीत पैशांची व्यवस्था होणे शक्य नसल्याने हे पैसे मिळाल्यास कामे मार्गी लागणे शक्य आहे. याबबत जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधण्याचे आदेश देण्यात आले.

नवोदय प्रवेशासाठी शाळांमधून प्रवेशाचा मुद्दा

नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पर जिल्हय़ातील विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश दाखविले जात असल्याचा आरोप दादा कुबल यांनी केला. या प्रवेशाला आळा घालण्यासाठी पावले उचलण्याची मागणीही त्यांनी केली. परजिल्हय़ातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास ते त्या शाळेत दररोज उपस्थित असतात किंवा नाही, याबाबतची खातरजमा गटशिक्षणाधिकाऱयांनी करावी. केवळ हजेरी दाखविली जात असेल आणि प्रत्यक्षात विद्यार्थी शाळेत येत नसतील, तर संबंधित शाळा मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा मागावून असा प्रकार उघड झाल्यास गटशिक्षणाधिकाऱयांना जबाबदार धरण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया येत्या 10 तारीखपर्यंत राबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याद्या तयार करण्यात आल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या मान्यतेने लवकरच याबाबतची तारीख निश्चित केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱयांनी यावेळी स्पष्ट केले.

‘ज्ञानी मी होणार’ मार्गदर्शक पुस्तिका जि. प. च्या शालेय क्रीडा स्पर्धांदरम्यान होणाऱया ‘ज्ञानी मी होणार’ या प्रश्नमंजुषा कार्यक्रमावर आधारित मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात आली आहे. दोडामार्ग तालुक्यातील वझरे हळदीचा गुंडा या शाळेचे शिक्षक तुषार भगवान पवार यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी बनविलेल्या या पुस्तिकेचे प्रकाशन सभापती सावी लोके यांच्या हस्ते झाले.

Related Stories

जिल्हय़ात ट्रूनॅट मशीनद्वारे कोरोना तपासणी

NIKHIL_N

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग अद्यापही ठप्पच, दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा

Abhijeet Shinde

बांदा मासळी मार्केट परिसरातील नाल्याच्या स्वच्छतेची मागणी

Rohan_P

वीजबिलात मिळणार ‘स्लॅब बेनिफिट’

NIKHIL_N

संजय गवस, दीप्ती धालवलकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी : टेम्पो कठड्यावर आदळून चालक ठार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!