तरुण भारत

कोरोना लसीचे शीतयुद्ध

कोरोना विषाणूचा अनियंत्रित फैलाव पाहता याला रोखू शकणाऱया एखाद्या औषधाकडे तसेच लस संशोधनाकडे आता संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. त्याची जोरदार चर्चाही सुरू आहे. वास्तविक संशोधन ही संघटित प्रक्रिया असते. संशोधनामध्ये विशेषतः विज्ञानातील संशोधनांमध्ये विविध चाचण्या आणि प्रयोगातील निष्कर्षांचे आदानप्रदान होत असते. सरतेशेवटी याचा फायदा आपले एकंदर जीवनमान सुधारण्यासाठीच होत आला आहे. विविध राष्ट्रांमधील जागतिक वाद, हेवेदावे, स्पर्धा यापलीकडे जाऊन जगभरातील संशोधकांनी समस्त मानवी कल्याणासाठी उभा केलेला तो एका अर्थाने यज्ञ असतो. लस संशोधनाच्या माध्यमातून यापूर्वी मानवजातीची अमूल्य सेवा घडली आहे हे विसरून चालणार नाही. आज संपूर्ण जग कोरोना प्रतिबंधक लस शोधण्याच्या मागे धावत आहे. मोठे आव्हान असूनही संशोधक एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहेत. त्यांची निरीक्षणे आणि निष्कर्ष उत्साहवर्धक आणि समाधानकारक आहेत. त्यादृष्टीने विचार करता लस संशोधनात गुंतलेले शास्त्रज्ञ, संशोधन संस्था यांचे कौतुकच करायला हवे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या ताज्या यादीनुसार पहिल्या व दुसऱया टप्प्यात असणाऱया लस विकसित करणाऱयांची संख्या आजच्या घडीला तब्बल 165 असून प्रत्यक्षात ही संख्या यापेक्षा अधिक आहे. कारण काही संस्था संशोधनाच्या अत्यंत प्राथमिक टप्प्यात असल्यामुळे त्यांची नोंद जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत अद्यापपर्यंत झालेली नाही. पण चिंतेची बाब अशी की, कोरोना प्रतिबंधक लस शोधताना जगभरातील विविध संशोधन संस्था आणि कंपन्यांदरम्यान सहयोग आणि सहकार्य अपेक्षित असताना ते कुठेही दिसत नाही. याउलट संशोधनाच्या निमित्ताने सहकार्याऐवजी विविध राष्ट्रांमध्ये ईर्षा आणि स्पर्धा सुरू असून संशोधनासाठी ही बाब निश्चितच मारक आणि हानीकारक ठरू शकते, असा इशारा जागतिक अभ्यासकांनी व तज्ञांनी दिला आहे. म्हणूनच या मुद्याकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. लस संशोधन सध्या ज्या टप्प्यावर आहे तिथे रुग्णांच्या सर्व दुष्परिणामांच्या कसोटीच्या पातळीवर ते अजूनही सिद्ध झालेले नाही, हे वास्तव आहे. त्या दृष्टीने विचार करता अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. लस संशोधन ही अतिशय गुंतागुंतीची आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. अनेक क्लिष्ट अशा वैद्यकीय चाचणीतून त्याला जावे लागते. सर्वप्रथम उंदीर, मांजर यासारख्या प्राण्यांवर चाचणी केली जाते. मग मानवी छोटा गट त्यानंतर आणखी थोडा मोठा गट अखेर हजारो जणांवर चाचणी घेतली जाते. रोगप्रतिकारकशक्ती, दुष्परिणाम याची दीर्घकाळ तपासणी केली जाते. याचाच अर्थ सध्या सर्व लसी या प्रयोगाच्या पातळीवरच आहेत. सर्वच प्रक्रिया जोखमीची असल्यामुळे यशस्वी होण्याची शक्यताही कमी असते. चाचणीचे  सर्व टप्पे पार केल्यानंतर शंभरातील एखाद दुसऱया लसीला सामूहिक उपचार करण्यास मान्यता मिळू शकते. कोरोना प्रतिबंधक लस विकसित करू इच्छिणाऱया 165 पैकी केवळ 23 जण तिसऱया टप्प्यात आहेत. म्हणजेच त्यांना मानवी चाचणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस लवकरच बाजारात येईल असे सांगितले जाते. पण अद्याप ऑक्सफर्डच्या चाचण्या तिसऱया टप्प्यात आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा आणि अवघड टप्पा मानला जातो. ऑक्सफर्ड विद्यापीठ देखील अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही, हे त्यांचे संशोधकही मान्य करतात. या स्पर्धेत रशियाने तर सर्वांवर कडी केली. येत्या दोन आठवडय़ातच आपल्या देशाची स्वतंत्र लस बाजारात येत असल्याची घोषणा रशियाने केल्याने जगाच्या भुवया उंचावल्या. कोविड-19 च्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्याचा त्यांनी दावा केला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासूनच सामूहिक लसीकरण कार्यक्रम रशियात राबवत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तथापि, जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या या कोरोना लसीबाबत शंका उपस्थित केली आहे. लस संशोधन मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करीत रशियाने अक्षरशः घिसाडघाई करून लस बाजारात आणल्याचा आरोप करून ही लस धोकादायक ठरू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. यावरून कोरोना लसीबाबत जगभरात सध्या संशयाचे वातावरण असल्याचे स्पष्ट होते. ही बाजारपेठ काबीज करण्याची स्पर्धा विविध राष्ट्रांदरम्यान सुरू झाली आहे. यानिमित्ताने मानवी कल्याणापेक्षा एक प्रकारची अनैतिक जागतिक स्पर्धा डोके वर काढताना दिसत आहे. ही स्पर्धा पाहून काही तज्ञांनी त्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. मानवी सुरक्षेपेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वर्चस्ववादावर अढळ निष्ठा असणाऱया जागतिक नेत्यांना आपल्याच राष्ट्राची लस बाजारात सर्वप्रथम आणण्याची अति घाई झाली आहे हे दुर्दैव. जगाला वेगाने संकटाच्या खाईत लोटणाऱया चीननेदेखील तितक्याच वेगाने लस तयार केल्याचा दावा केला आहे. चीनच्या लसीकडे अमेरिका बारीक लक्ष ठेवून आहे. लसनिर्मितीनंतर बाजारपेठेतील उपलब्धतेवरून मोठा झगडा होण्याची चिन्हे आताच दिसत आहेत. सर्वांच्या अगोदर लस आपल्यालाच कशी मिळेल, यासाठी अमेरिका व युरोपियन राष्ट्रांनी घाई सुरू केली असून अब्जावधी रु. खर्च करून लसनिर्मिती करणाऱया विविध कंपन्यांशी त्यांनी करार केले आहेत. कोटय़वधी डोस राखीव ठेवले आहेत. उत्पादित होणाऱया मालाच्या पळवापळवीच्या स्पर्धेचा फटका विकसित आणि गरीब राष्ट्रांना निश्चितच बसेल. परिणामी, ब्राझील, फिनलँड सौदी अरेबिया, भारत, नायजेरिया, थायलंड यासारख्या अनेक देशांनी लस विकसित करण्याच्या स्पर्धेत उडी घेतली आहे. कोरोना ही एकच समस्या सध्या जगाला भेडसावत आहे. अशावेळी जगासमोरील एकाच समस्येवर उत्तर शोधताना जगातील सर्व तज्ञ व शास्त्रज्ञ एकत्र येऊ शकले असते. या सर्वांच्या संघटित प्रयत्नातून व सहकार्यातून सर्वांना मुबलक उपलब्ध होईल अशी प्रभावी लस शोधून काढू शकले असते. पण दुर्दैवाने मानवी प्रवृत्तीनुसार स्वत:चे अस्तित्व टिकवण्याला प्राधान्य दिले जात आहे.

Related Stories

आणि रावळगाव

Patil_p

शिक्षणाचे नवे धोरण

Patil_p

नवी पहाट

Patil_p

आव्हान लॉकडाऊन संपल्यानंतरच

Patil_p

गानविद्या बडी

Patil_p

प्राणिक हीलिंग ही एक आरोग्य संजीवनीच

Patil_p
error: Content is protected !!