तरुण भारत

घरगुती वीज बिल माफीसाठी 10 ऑगस्टला धरणे आंदोलन

-इरिगेशन फेडरेशनसह सर्वपक्षीय संघटना करणार आंदोलन, सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर राज्यस्तरीय आंदोलन

कोल्हापूर/ प्रतिनिधी

दरमहा ३०० युनिट पर्यंत वीज वापर असणा-या राज्यातील घरगुती वीज ग्राहकांची गेल्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांची वीज देयके माफ करावीत. आणि या ग्राहकांच्या वीज बिल रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृति समिती यांनी सोमवार १० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन केले जाणार आहे. कोल्हापूर प्रमाणेच संपूर्ण राज्यात सर्व जिल्ह्यांतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याच वेळी धरणे आंदोलन करावे असे जाहीर आवाहन प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, विजतज्ञ प्रताप होगाडे, आर. के. पवार व सर्वपक्षीय प्रमुखांनी केले आहे.

Advertisements

कोरोना महामारीमुळे झालेल्या लॉक डाउनच्या कालावधीतील वाढीव वीज माफ करण्याच्या मागणीसाठी प्रथम १३ जुलै रोजी राज्यस्तरीय वीज बिल होळी आंदोलन जाहीर करण्यात आले होते. हे आंदोलन राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये, कांही ठिकाणी अनेक तालुक्यांमध्ये, अनेक गावांमध्ये व मुंबईसह अनेक महापालिका क्षेत्रात झाले. या आंदोलनानंतर राज्य सरकारने घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलांमध्ये २०% ते ३०% सवलत देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. पण ही तोकडी सवलत वीज ग्राहकांना मान्य व दिलासा देणारी नाही, तर उलट आजच्या कोरोना सद्यस्थितीत त्यांच्या अडचणींवर आणि दुःखावर मीठ चोळणारी आहे. राज्यातील ८०% हून अधिक वीज ग्राहकांची खायला नाही, अशी भ्रांत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने संपूर्ण वीज बिल माफी करावी, अशी वीज ग्राहकांची रास्त अपेक्षा आहे. त्यामुळे हे ३ महिन्यांचे वीज बिल ग्राहक भरणार नाहीत असा निर्धार व जाहीर आवाहन सर्वपक्षीय संघटनांनी केले आहे. तसेच उर्जामंत्री यांनी जाहीर केलेल्या “दरमहा १०० युनिटस च्या आतील ग्राहकांना मोफत वीज” या घोषणेची त्वरित अंमलबजावणी करावी अशीही मागणी ही संघटनांनी केली आहे.

जेष्ठ नेते एन डी पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, विजतज्ञ प्रताप होगाडे, महेश जाधव, आर. के. पवार, विक्रांत पाटील आदींसह सर्वपक्षीय संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. धरणे आंदोलन व निवेदन देताना योग्य अंतर ठेवणे व मास्क वापरणे याबाबत सर्व शासकीय सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी अशी सूचना सर्वांना देण्यात आली आहे. त्याचबरोबर जेथे शक्य वा आवश्यक असेल, तेथे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात यावे. त्याचबरोबर राज्यातील घरगुती वीज ग्राहकांनी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री यांना हजारोंच्या संख्येने ईमेल पाठवावेत आणि संपूर्ण वीज बिल माफीची मागणी करावी, तसेच १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा झाल्यास राज्यातील सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभांमध्ये वीज बिल माफी मागणीचे ठराव करावेत व ठरावांच्या प्रती राज्य सरकारकडे पाठवाव्यात असेही आवाहन या सर्वपक्षीय समितीतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

जिल्ह्याचे राजकारण योग्य वळणावर – महादेवराव महाडिक

Sumit Tambekar

किंगबेरी या नव्या द्राक्ष वाणाचे शनिवारी लोकार्पण

Abhijeet Shinde

मी बोललो तर त्रास झाला, ते बोलले तर चालतं; स्वबळाच्या नाऱ्यावरून पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Abhijeet Shinde

निवडणूक पदवीधरांची प्रचारात उठाठेव राजकारण्यांची

Patil_p

मानसोपचार तज्ञ नसल्याने मनोरुग्णांची फरफट

Patil_p

शेतकरीविरोधी कायदे महाराष्ट्रात अडविणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!