तरुण भारत

कोरोना विषाणू पुन्हा बदलतोय स्वतःचे स्वरुप

संसर्गानंतर स्पाइक प्रोटीन रॉडसारखा आकार घेतोय

कोरोना विषाणूसंबंधी नवी माहिती समोर आली आहे. सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार संक्रमणानंतर विषाणूचा आकार बदलतो. स्पाइक प्रोटीनमुळे हा आकार बदलत आहे. विषाणूचा स्पाइक प्रोटीन संक्रमित माणसाच्या शरीरात पोहोचल्यावर लांब रॉडचा आकार घेत असल्याचे दिसून आले आहे.

Advertisements

अमेरिकेच्या बोस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलने स्वतःच्या संशोधनपत्रात हा दावा केला आहे. विषाणूसंबंधी ही नवी माहिती लस तयार करणाऱया वैज्ञानिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

स्पाइक प्रोटीन

कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावर मुकुटाप्रमाणे दिसणाऱया हिस्स्यातून विषाणू प्रोटीन बाहेर काढतो आणि याला स्पाइक प्रोटीन म्हणतात. याच स्पाइक प्रोटीनमुळे संसर्गाचा प्रारंभ होतो. हा माणसांच्या इंजाइम एसीई2 रिसेप्टरशी जोडून घेत शरीरापर्यंत पोहोचतो आणि नंतर स्वतःची संख्या वाढवून संसर्गात वाढ करतात.

बदल चांगला का वाईट?

डॉ. चेन यांच्यानुसार स्पाइक प्रोटीनचा बदलणारा आकार विषाणू कुठल्याही पृष्ठभागावर काही काळासाठीच जिवंत राहत असल्याचे दर्शवितो. याचा रॉडसारखा आकार मानवी प्रतिकारशक्तीला विषाणूपासून वाचविण्यास मदत करू शकतो. संसर्गानंतरचा प्रोटीनचा रॉडसारखा आकार प्रतिपिंडांना विषाणू निष्क्रीय करण्यास मदत करू शकतो.

संशोधनाचे स्वरुप

विषाणूवर संशोधन करणाऱया बोस्टन चिल्ड्रन्स हॉस्पिटल्सचे संशोधक डॉ. बिंग चेन आणि त्यांच्या पथकाने क्रायोजेनिक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीद्वारे विषाणूचे अध्ययन केले आहे. या अध्ययनादरम्यान अनेक बाबी समोर आल्या आहेत. स्पाइक प्रोटीन स्वतःचा आकार बदलत आहे. संसर्गापूर्वी विषाणूचा आकार वेगळा आहे आणि संसर्गानंतर तो वेगळय़ाप्रकारे दिसून येत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. त्रिकोणासारखा दिसणारा स्पाइक प्रोटीन संसर्गानंतर हेअर पिनप्रमाणे आढळून येत आहे. हा बदल माणसांच्या एसीई2 रिसेप्टरच्या संपर्कात आल्यावर सुरू होतो.

ब्राझील : 30 लाखाच्या पार

ब्राझीलमध्ये मागील 24 तासांमध्ये 22 हजार 48 नवे रुग्ण आढळले असून 703 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील रुग्णसंख्या 30 लाख 57 हजार 470 वर पोहोचली आहे. बळींचा आकडा 1,01,857 झाला आहे. तेथील पहिल्या तीन महिन्यातच 50 हजार जणांचा मृत्यू झाला होता. तर केवळ 50 दिवसांमध्ये हा आकडा दुप्पट झाला आहे. तरीही देशात दुकाने आणि रेस्टॉरंट सुरू करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

भूतान : संपूर्ण टाळेबंदी

भूतान सरकारने मंगळवारपासून देशभरात टाळेबंदी लागू केली आहे. गेलेफू शहरात एका महिलेला संसर्ग झाला आहे. संबंधित महिलेचा पारो, थिम्पू आणि अनेक अन्य ठिकाणच्या लोकांशी संपर्क झाला आहे. तिच्या संपर्कात आलेल्या 71 जणांची आतापर्यंत ओळख पटविण्यात आली आहे. सरकार लोक आणि वाहनांच्या ये-जावर बंदी घालत आहे. सर्व शाळा, महाविद्यालये, संस्था, दुकाने आणि कार्यालये बंद राहणार असल्याचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी म्हटले आहे.

मेक्सिको : महापौर विलगीकृत

मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीच्या महापौर क्लाउडिया शेनबॉम या स्वयंविलगीकरणात गेल्या आहेत. त्यांच्या काही सहकाऱयांचा चाचणी अहवाल होकारात्मक आला होता. नियमानुसार त्यांनी विलगीकरणाचा निर्णय घेतला आहे. मेक्सिको सिटीच्या अंतर्गत मंत्री जोस अल्फोंसे सूरेज डेल रियल यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. मेक्सिकोत दिवसभरात 5,558 नवे रुग्ण सापडले असून 705 जणांचा मृत्यू ओढवला आहे.

रुग्णसंख्या वाढली

फिलिपाईन्समध्ये मंगळवारी 2,987 नवे बाधित सापडले आहेत. याचबरोबर देशातील रुग्णसंख्या आता 1,39,538 वर पोहोचली आहे. हा आकडा दक्षिणपूर्व आशियात सर्वाधिक ठरला आहे. आरोग मंत्रालयाने देशात दिवसभरात 19 जणांचा  मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. बळींचा एकूण आकडा 2,312 वर पोहोचला आहे. अधिकाधिक बाधितांना आयसोलेट करावे लागेल, संपर्कात आलेल्यांना विलगीकृत करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे उद्गार अध्यक्षांचे प्रवक्ते हॅरी रॉक यांनी काढले आहेत. राजधानी मनीलात टाळेबंदी लागू करण्याची शक्यता त्यांनी फेटाळली आहे.

अमेरिकेत नवा निर्णय शक्य

संशयित बाधितांना देशात येण्यापासून रोखण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेणार आहेत. नव्या प्रस्तावित नियमानुसार अमेरिकन नागरिक किंवा स्थायी रहिवासी जर कोरोना किंवा अन्य आजाराने बाधित असल्याचा संशय असल्यास त्यांना देशात येण्याची अनुमती दिली जाणार नाही. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 50 लाखांहून अधिक झाला असून 1,66,201 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचे सावट दूर

एप्रिलमध्ये 76 दिवसांची टाळेबंदी हटल्यावर चीनचे मुख्य औद्योगिक शहर वुहानचे जनजीवन पूर्वपदावर परतले आहे. वुहानमध्ये आता संगीत महोत्सवात नृत्य, स्वादिष्ट मेजवानीसाठी मोठय़ा रांगा दिसून येत आहेत. तसेच शहरातील रस्त्यांवरील वाहतूक पाहता तेथील कोरोनाचे सावट दूर झाल्याचे मानले जात आहे. परंतु वुहानमधील उद्योगांनी अद्याप वेग पकडलेला नाही. 1 कोटी 10 लोकसंख्या असलेल्या वुहानमध्ये डिसेंबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग पसरला होता. शहरातील हुनान सागरी खाद्यबाजार मात्र अद्याप निर्जन ठिकाण राहिले आहे. या बाजारातच सर्वप्रथम कोरोना विषाणूनचे हल्ला चढवत अनेकांचा बळी घेतला होता.

Related Stories

बायडेन यांच्या शपथविधीला सशस्त्र आंदोलनाचा धोका

datta jadhav

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत महिलेवर बलात्कार

Patil_p

अनेक देशांमध्ये शीतलहर, हिमवृष्टीने जनजीवन ठप्प

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने गाठला 70 लाखांचा टप्पा

datta jadhav

दक्षिण कोरियाचे ‘ट्रिपल टी’चे सूत्र

tarunbharat

विद्यापीठे बंद राहणार

Omkar B
error: Content is protected !!