तरुण भारत

कोरोनाबाधितांवर होणार आता गावातच अंत्यसंस्कार

चिपळूण नगर परिषदेवरील ताण कमी करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

प्रतिनिधी/ चिपळूण

Advertisements

यापुढे कोरोनाबधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास व तो ग्रामीण भागातील असल्यास त्याच्यावर ग्रामपंचायतीलाच अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. चिपळूण नगर परिषदेवरील ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला असून तसे पत्र गटविकास अधिकाऱयांनी सर्व ग्रामसेवकांना काढले आहे. त्यानुसार सरपंचाच्या अधिपत्याखाली टास्क फोर्स तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. तालुक्यात सध्या 673रूग्ण असून त्यात ग्रामीण भागातील 332 रूग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील 10 बाधितांचा रत्नागिरी व चिपळूण येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या आजाराची सर्वांनी इतकी भीती घेतली आहे की सर्वजण आपली नाती विसरत चालले आहेत. या रोगामुळे मृत्यू होणाऱयाला नातेवाईकांसह समाजही नाकारत असल्याने सुरूवातीला अशा व्यक्तींवर त्या-त्या गावांमध्ये अंत्यसंस्कार करताना प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तरीही ग्रामस्थांचा विरोध झुगारून एका गावात अंत्यसंस्कार केल्यांनतर अधिकाऱयांना धडा शिकवण्यासाठी कोणीतरी जिल्हाधिकाऱयांना दूरध्वनी करून मृतदेह जळाला नसल्याचे कळवले होते. यानंतर प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती.

त्यामुळे असा त्रास नको म्हणून त्यानंतर कोरोनासह अन्य कारणांनी मृत्यू होणाऱयांवर रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे, आरोग्य विभागाचे प्रमुख वैभव निवाते, कर्मचारी संकेत मोहिते, मयुर जाधव, दिनेश जाधव, तुषार कांबळे, संदेश मोहिते, चेतन चिपळूणकर, अभिजीत पाटकर, सचिन हरवडे, अंकित गमरे यांच्या खास पथकाने आतापर्यंत शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधितांसह अन्य कारणांनी मृत पावलेल्या 14 व्यक्तींवर येथे अंत्यसंस्कार केले आहेत. मात्र आता कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यातच कोरोनासह अनेक कारणांनी मृत्यू होणाऱयांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे दिवसाला तीन ते चारजणांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ या पथकावर येत आहे.

पीपीई कीट घालून अनेक तास राहणे अडचणीचे ठरत असल्याने या पथकावरील ताण कमी करण्यासाठी वरील निर्णय घेण्यात आला आहे. तसे पत्र गटविकास अधिकारी सरिता पवार यांनी सर्व ग्रामपंचायतींना दिले आहे. त्यानुसार सरपंचाच्या अधिपत्याखाली टास्क फोर्स तयार करायचे असून कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱयांची नियुक्ती करायची आहे. मृताच्या दोन नातेवाईकांनाही यात सहभाग घ्यावा लागणार असून स्वयंसेवकांची मदत घेण्याचेही सूचवण्यात आले आहे. स्मशानभूमीपर्यंत रूग्णवाहिका जात नसल्यास पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

…तर सर्वांवर कारवाई

मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास कोणी विरोध केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार असून अंत्यसंस्कार करताना हेळसांड, दिरंगाई झाल्यास किंवा कर्तव्यात कसूर केल्यास ग्रामसेवकांसह संबधितांवरही कारवाई करण्याचा इशारा या पत्रात देण्यात आला आहे.

Related Stories

कळंबस्ते पोल्ट्रीतून खरेदी केलेल्या कोंबडय़ांनी अंडे देणे केले बंद!

Patil_p

‘पॉझिटिव्ह’ रुग्णसंख्या 99 वर

NIKHIL_N

नीट परीक्षेला जाणे होणार सोपे

NIKHIL_N

भालावल गावात बियाणे पेरणीचे प्रात्याक्षिकासहीत मार्गदर्शन

Ganeshprasad Gogate

आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत रत्नागिरीची सायली साने प्रथम

Patil_p

आठवडाभरात जिह्यात 400 रूग्णांची भर

Patil_p
error: Content is protected !!