तरुण भारत

खानापूर तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अडचणीत

ऐनवेळी जाहीर झालेल्या नियमावलीमुळे समस्या

@ खानापूर / प्रतिनिधी

Advertisements

कर्नाटक राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरू असल्याने राज्य शासनाने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जाचक अटी घातल्या आहेत. यासंदर्भातील नियमावली राज्य शासनाने अगदी ऐनवेळी जाहीर केल्याने या नियमावलीनुसार गणेशोत्सव कसा साजरा करावा, याचा संभ्रम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.

वास्तविक राज्य शासनाने या नियमावली दोन महिन्यांपूर्वीच जाहीर करणे गरजेचे होते. दोन महिन्यांपूर्वी नियमावली जाहीर झाली असती तर त्या दृष्टीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी केली असती. या जाचक अटींमध्ये गणेशोत्सव मंडळाची मूर्ती जास्तीत जास्त चार फूटच रहावी, असा नियम घालण्यात आला आहे. पण सर्व गणेशोत्सव मंडळांनी दोन महिन्यांपूर्वीच गणेशमूर्ती करण्याच्या ऑर्डर दिल्या आहेत. बऱयाच गणेशोत्सव मंडळांनी 5 फुटांपासून 8 फुटांपर्यंतच्या मूर्ती करण्याची ऑर्डर संबंधित मूर्तिकारांना दिली आहे. त्या ऑर्डरीप्रमाणे गणेशमूर्तीही तयार झाल्या आहेत. अशावेळी 4 फुटी मूर्ती ऐनवेळी कुठून आणाव्यात आणि ऑर्डर दिलेल्या मूर्तींचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच यावर्षी कोरोनामुळे पीओपीच्या मूर्ती करण्यास या पूर्वीच राज्य शासनाने परवानगी दिली होती. त्यानुसार पीओपी मूर्ती तयारही झाल्या आहेत. असे असताना ऐनवेळी शाडू मातीच्याच मूर्ती पूजवण्याचे बंधन घातले आहे. यामुळे देखील अडचण निर्माण झाली आहे.

तालुक्यामध्ये खानापूर शहर परिसरात जवळपास 14 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर ग्रामीण भागात साधारण 200 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून सर्व मंडळे मंडप उभा करून त्या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. पण यावर्षीच्या नियमावलीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव स्वतंत्र मंडप घालून साजरा न करता एखाद्या मंदिरात साजरा करावा, अशीही अट घालण्यात आली आहे. पण यामध्ये देखील थोडय़ाफार अडचणी असून बऱयाच गणेशोत्सव मंडळांच्या परिसरात मंदिरच नसल्याने त्या ठिकाणी कसा गणेशोत्सव साजरा करावा, हा देखील प्रश्न आहे. बाकीच्या अटीमध्ये डॉल्बी किंवा फटाक्यांची आतषबाजी करू नये, या नियमावलीचे पालन करण्यात मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. तसेच गणेशाच्या आरतीसाठी पाचजणच उपस्थित रहावे, असाही नियम घालण्यात आला असून त्यामध्ये कमीतकमी 25 लोकांना सामाजिक अंतर राखून व मास्क परिधान करून आरती करण्यास परवानगी दिली जावी, अशी मागणी देखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून केली जात आहे. यासंदर्भात नियमावली जाहीर झाल्या असल्या तरी याची माहिती देण्यासाठी अद्याप शासकीय पातळीवर बैठक बोलाविण्यात आलेली नाही. याकरिता तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक तातडीने घेऊन यामध्ये मार्ग काढावा, अशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मागणी आहे.

Related Stories

महाराष्ट्रातून सीमाभागाला ‘अवैध मद्यपुरवठा’

Patil_p

महाराष्ट्रातून आलेल्या तिघांना कोरोनाची बाधा

Patil_p

आयुष्मान भारत योजनेंतर्गत 19 रुग्णालयात उपचार

Amit Kulkarni

शिवशक्तीचे 15 लाख गाळप उद्दिष्ट

Patil_p

कार्तिक उत्सवानिमित्त आज होणारा महाप्रसाद रद्द

Patil_p

सायकल चोरी प्रकरणी प्रभूनगर येथील युवकाला अटक

Patil_p
error: Content is protected !!