तरुण भारत

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण

  • रुग्ण तपासणीत हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप
  • मारहाणीविरोधात डॉक्टर्स संघटना एकवटल्या
  • सरकारी कामात अडथळा, मारहाणप्रकरणी गुन्हा
  • संबंधितांना अटक न झाल्यास ‘कामबंद’चा ‘मॅग्मो’चा इशारा
  • पालकमंत्री, जिल्हाधिकाऱयांचे वेधले लक्ष

प्रतिनिधी / ओरोस:

तपासणीत हलगर्जीपणा केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांकडून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रकार घडला. मागील 15 दिवसांपासून उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या क्रिटिकल कंडिशनबाबत कोणतीच कल्पना देण्यात आली नाही. शिवाय उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी रुग्णाकडे फिरकलेच नाहीत, असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून डॉक्टरांनी पालकमंत्री उदय सामंत आणि प्रशासकीय प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधले आहे.

Advertisements

दरम्यान, डॉ. लिहितकर यांनी याबाबतची रितसर तक्रार ओरोस पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी मृत स्मिता भोसले यांचा मुलगा व अन्य तीन नातेवाईक यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱयाला शिवीगाळ व मारहाण करणे तसेच सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील स्मिता शिवाजी भोसले या 31 जुलै पासून जिल्हा रुग्णालयात दाखल होत्या. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे नॉन कोविड कक्षात त्यांच्यावर त्यांना पूर्वीपासूनच त्रास जाणवत असलेल्या आजारावर उपचार सुरू होते.

 14 ऑगस्टला रात्री 8 ते 15 रोजी सकाळी 8 या वेळेत डॉ. सौरभ लिहितकर हे अपघात विभागात कर्तव्यावर होते. त्या रात्री स्मिता भोसले यांची प्रकृती बिघडली. उपचार सुरू असतानाच पहाटे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तसेच कर्तव्यावर असलेल्या डॉ. लिहितकर यांना स्मिता यांच्यावर उपचार करणारे डॉ. पवार समोर का येत नाहीत, असा सवाल करत शिवीगाळ व मारहाण केली. त्याचप्रमाणे जीवे मारण्याची धमकी दिली, अशा आशयाची तक्रार देण्यात आली आहे.

 ‘कोविड’च्या काळात वैद्यकीय अधिकाऱयांची कमी संख्या असतानाही चांगली सेवा देत असणाऱया डॉक्टरांनी एकत्र येत या मारहाण व धमकी प्रकरणाबाबत आवाज उठविला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या काचाही फुटल्या आहेत. त्यामुळे सदर प्रकरण फार गंभीर असल्याकडे जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कर्तव्यावर असणाऱया डॉक्टरांच्या संरक्षणासाठी पोलीस चौकी कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. पोलिसातही याबाबत
तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी संबंधितांवर भादंवि कलम 353, 332, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.

          अटक न झाल्यास कामबंद आंदोलन -डॉ. उमेश पाटील

 15 ऑगस्टची ही घटना अतिशय निंदनीय व निषेधार्ह असल्याचे मॅग्मो संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. उमेश पाटील यांनी ‘तरुण भारत’ला सांगितले. रुग्णाच्या क्रिटिकल परिस्थितीची नातेवाईकांना अगोदरच कल्पना देण्यात आली होती. मात्र, डॉक्टरांची बाजू समजून न घेताच झालेल्या या प्रकाराबद्दल 16 रोजी काळय़ा फिती लावून काम करण्यात आले. गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. संबंधितांना वेळीच अटक न झाल्यास काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशाराही दिला आहे.

 जिल्हय़ातील इंडियन मेडिकल असोसिएशन, डॉक्टर्स प्रॅटर्निटी क्लब तसेच रत्नागिरी मॅग्मो अध्यक्ष डॉ. बी. एन. पितळे तसेच सर्वच डॉक्टर संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. केवळ सांत्वन नको, तर गुन्हेगारांच्या बाबतीत ऍक्शन अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Stories

दोन हजार वर्षे टिकणारा शिवपुतळा अखेर दापोलीत दाखल

Patil_p

चिपळुणात कारवाई झालेल्यांकडून पुन्हा गुटखा विक्री!

Patil_p

चिपळुणातील वाशिष्ठी पूल वाहतुकीस खुला!

Patil_p

चिपळुणात कोरोना वाढता वाढता वाढे!

Patil_p

ग्रंथालयांना 35 हजारपेक्षा पुस्तकांचे वाटप

NIKHIL_N

चिपळुणात एनडीआरएफची तुकडी दाखल

Patil_p
error: Content is protected !!