तरुण भारत

देशवासियांना मिळणार आरोग्य ओळखपत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा : वैद्यकीय क्षेत्रात डिजिटल क्रांती घडविण्याचा मनोदय

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना राष्ट्रीय आरोग्य ओळखपत्राची (नॅशनल डिजिटल हेल्थ कार्ड) मोठी घोषणा केली. तसेच आत्मनिर्भर भारतासह, शेजारी राष्ट्रांबद्दलचे धोरण यासह अनेक मुद्यांवरही त्यांनी भाष्य केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशाच्या आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घडेल असा विश्वास व्यक्त केला.

नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन अर्थात राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत प्रत्येक भारतीयाला स्वतंत्र आरोग्य ओळखपत्र दिले जाणार आहे. या आयडीमध्ये स्वतःची आरोग्यविषयक माहिती, प्रत्येक आजार, कोणत्या डॉक्टरने कोणती औषधे दिली, केव्हा दिली, त्यांची किंमत व त्यासंबंधीचे अहवाल अशी सर्व माहिती समाविष्ट असणार आहे.

या अभियानांतर्गत वैयक्तिक वैद्यकीय माहिती, तपासणी केंद्र, वैद्यकीय संस्था व स्टेट मेडिकल कौन्सिलला डिजिटल करण्याची योजना आहे. या मिशनअंतर्गत प्रत्येक नागरिकाचा वैद्यकीय अहवाल तयार केला जाणार असून संबंधिताने कोणत्या आरोग्य केंद्रावर जाऊन तपासणी करायची यासंबंधीची माहितीही दिली जाणार आहे. या क्षेत्रातील डिजिटलायझेशनमुळे कोणत्याही भागातील नागरिकाला कोणत्याही ठिकाणच्या आरोग्य चिकित्सक केंद्राची माहिती मिळणे शक्मय होणार आहे. तसेच त्यानंतर ई-फार्मसी आणि टेलीमेडिसीन सेवा देखील यामध्ये असणार आहे. यासाठी विशेष मार्गदर्शक प्रणाली बनवली जाणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

ऍपच्या माध्यमातून नोंदणी

या मिशनअंतर्गत डॉक्टरांच्या माहितीसह देशभरातील आरोग्य सेवांची माहिती एका ऍपवर उपलब्ध होईल. सदर ऍप डाऊनलोड करून नोंदणी करावी लागेल. त्यानंतर एक हेल्थ आयडी मिळेल. याद्वारे होणारे उपाचार व तपासण्यांची संपूर्ण माहिती डिजिटली जतन करावी लागेल. कोणत्याही रुग्णालयात किंवा डॉक्टरकडे उपचार घेण्यास गेल्यानंतर सर्व कागदपत्रे किंवा रिपोर्ट्स घेऊन जाण्याची गरज नसेल. डॉक्टर युनिक आयडीद्वारे तुमचा सर्व वैद्यकीय तपासणी अहवाल पाहू शकतील. यावर नोंदणी करणे ऐच्छिक असणार आहे.

चीन, पाकिस्तानला इशारा

अलीकडे शेजारी राष्ट्रांच्या वाढलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर  पंतप्रधानांनी चीन आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा कडक शब्दात इशारा दिला आहे. दहशतवादाशीच नव्हे, तर विस्तारवादाविरोधातही भारत समर्थपणे लढत असून सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱयांना यापुढेही अद्दल घडवली जाईल, अशा शब्दांत पंतप्रधानांनी चीन आणि पाकिस्तानला सुनावले. 15-16 जूनला गलवान खोऱयात चिनी सैनिकांचा हल्ला परतवून लावणाऱया जवानांचे त्यांनी कौतुक केले.

मुलींच्या विवाहाचे वय वाढणार?

मुलींच्या लग्नाच्या किमान वयोमर्यादेचा फेरविचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याची घोषणाही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केली. त्यानुसार कदाचित मुलींचे लग्नाचे वय 18 वरून वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलांच्या सक्षमीकरणावर त्यांनी परखडपणे भाष्य केले. मुली लढाऊ विमाने चालवून अवकाशभरारी घेत आहेत. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचा सहभाग मोठा आहे. प्रत्येक संधी त्यांनी सत्कारणी लावली आणि देशाची प्रति÷ा वाढवली. केंद्र सरकार महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्याही समान संधी उपलब्ध करून देईल, असे आश्वासन मोदींनी दिले.

Related Stories

पंजाबमध्ये 627 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

कोचीतील चौथी इमारतही जमीनदोस्त

Patil_p

तामिळनाडू सरकारमध्ये रघुराम राजन यांना जबाबदारी

Patil_p

येडियुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Abhijeet Shinde

येस बँकेची 49 टक्के मालकी एसबीआयकडे

tarunbharat

भाजपमध्ये प्रवेश – निर्णय गांगुलीवरच

Patil_p
error: Content is protected !!