तरुण भारत

कोल्हापूर : जिल्ह्यात संततधार, राधानगरीचे चार दरवाजे खुले

प्रतिनिधी / कोल्हापूर

गेले चार दिवस मध्यम ते तुरळक स्वरूपात सुरु असलेल्या पावसाचा जोर शनिवारपासून वाढला. रविवारी सकाळपासूनच धरणक्षेत्रासह जिह्यात सर्वत्र सुरु असलेल्या संततधार पावसामुळे राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले झाले असून 7 हजार 112 क्युसेक जलविसर्ग सुरु आहे. दुधगंगेतूनही 7 हजार 650 क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ झाली असून 35 फुटांपर्यंत पोहोचली आहे. पंचगंगा इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन 74 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 5 राज्य मार्ग आणि 17 प्रमुख जिल्हामार्ग बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.

Advertisements

धरणक्षेत्रात सुरु असलेल्या संततधारेमुळे जिह्यातील बहुतांशी प्रमुख धरणे पुर्ण क्षमतेने भरली आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यामुळे पाटबंधारे विभागाने गेल्या आठ दिवसांपासूनच कुंभी, कासारी, दुधगंगा,तुळशी आदी धरणांतून विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढून देखील धरणांतून मर्यादीत स्वरूपातच विसर्ग सुरु आहे. सध्या राधानगरी, दुधगंगेसह कासारी धरणातून 1750, तुळशीतून 384, कुंभीतून 350 तर वारणातून 14 हजार 786 क्युसेक जलविसर्ग सुरु आहे.

जिह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु
जोरदार पावसामुळे जिह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. यामध्ये करवीर तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद, वडणगे राजाराम बंधाऱयावर पाणी आल्याने रत्नागिरी कोल्हापूर हायवे मार्गे वाहतूक सुरू आहे. कागल तालुक्यातील सर पिराजीराव तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने हासुर, बोळावी, ठाणेवाडी व देवगड, राधानगरी, मुरगुड मार्गे वाहतूक सुरु आहे. सुळकूड-कोगणोळी रस्त्यावर पाणी आल्याने कोगणोळी मार्गे वाहतूक सुरू आहे. पन्हाळा तालुक्यातील केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने गायमुख वळण रस्त्यावरून मार्गे वाहतूक सुरू आहे.

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 155 मि.मी पाऊस
गेल्या चोविस तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 155.50 मिमी पावसाची नोंद झाली. तर हातकणंगले तालुक्यात 23.63, शिरोळ- 30.14, पन्हाळा- 58.71, शाहूवाडी- 61.33, राधानगरी- 57.67, गगनबावडा-155.50, करवीर- 35.91, कागल- 40.71 , गडहिंग्लज- 34.57 , भुदरगड-34.20 , आजरा- 65.50, तर चंदगड तालुक्यात 105 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे
पंचगंगेची (राजाराम बंधारा) पाणीपातळी 35 फुटांवर पोहोचली असून इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. तर सुर्वे 30.8 फूट, रुई 60.3 फूट, इचलकरंजी 56 फूट, तेरवाड 52.6 फूट, शिरोळ 45.6 फूट, नृसिंहवाडी 44 फूट व राजापूर बंधाऱयाची पाणीपातळी 35 फूट आहे.

खरीप पिके वाढीच्या अवस्थेत
20 ते 25 दिवसांच्या दिर्घ विश्रांतीनंतर गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला पाऊस जिह्यातील खरीप पिकांसाठी पोषक ठरला आहे. भूईमूग, सोयाबिन, भात नाचना आदी पिके वाढीच्या आवस्थेत आहेत. पिकांना खतांची मात्रा देण्यासह अंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे.

धरणांतील पाणीसाठा (टक्केवारीमध्ये)
धरणे टक्केवारी
राधानगरी 100
दुधगंगा 93
वारणा 91
तुळशी 94
कुंभी 87
कासारी 86
पाटगाव 91
घटप्रभा 100
जंगमहट्टी 100
चित्री 90
चिकोत्रा 70
कोदे ल.पा. 100
जांबरे 100

Related Stories

कारचा वेग कमी करण्यासाठी दाबला ब्रेक, खिडकीतून बाहेर पडून चिमुकलीचा जागीच मृत्यू

Abhijeet Shinde

वारणा दूध संघाच्या आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Abhijeet Shinde

शिरोळ तालुक्यातील सरपंच निवडणुका पुढे गेल्याने इच्छुकांची घालमेल वाढली

Abhijeet Shinde

ग्रामपंचायत बिनविरोधबद्दल बक्षिस म्हणून म्हारुळला निधी देणार- ना . हसन मुश्रीफ

Abhijeet Shinde

कुस्तीगिरांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार – दिपाली सय्यद

Sumit Tambekar

शिरोळ : उपनगराध्यक्षपदी प्रकाश गावडेंची बिनविरोध निवड

Abhijeet Shinde
error: Content is protected !!