तरुण भारत

स्मार्ट सिटीची कामे रखडली; रस्त्यांवर अडथळय़ांची शर्यत

प्रतिनिधी/ बेळगाव

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात विविध रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. मात्र, विकासकामे सुरू केल्यानंतर ती ठिकठिकाणी रखडली आहेत. त्याचा फटका वाहनधारक आणि शहरवासीयांना बसत आहे. शहापूर-वडगाव आणि पटवर्धन लेआऊट ते आरपीडी कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी अडथळय़ांच्या शर्यती पार कराव्या लागत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी नको रे बाबा ! असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

Advertisements

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकसित करण्यात येणाऱया रस्त्यांचा दर्जा आणि रखडलेल्या कामांचा त्रास व्यावसायिकांना तर होतच आहे. परिसरातील रहिवासी आणि वाहनधारकांनादेखील अडथळय़ांचा सामना करावा लागत आहे. बॅ. नाथ पै चौक ते येळ्ळूर रोड कॉर्नर आणि आरपीडी कॉर्नर ते पटवर्धन लेआऊटपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण योजनेंतर्गत करण्यात येत आहे. सदर कामाची सुरुवात जानेवारीमध्ये करण्यात आली होती. पण शहापूर-वडगाव रस्त्याच्या एका बाजूचे काँक्रिटीकरण करण्यात आल्यानंतर हे काम बंद अवस्थेत होते. दुसऱया बाजूला काँक्रिटीकरण करण्यासाठी रस्त्याची खोदाई करून ठेवली होती. डेनेज चेंबर खचल्याने संपूर्ण रस्त्याची वाताहत झाली होती. एकीकडे अर्धवट रस्ता आणि दुसरीकडे खड्डय़ांचे साम्राज्य अशी स्थिती या रस्त्याची झाली होती. तब्बल 6 महिन्यांच्या कालावधीनंतर दुसऱया बाजूच्या काँक्रिटीकरणाला मुहूर्त मिळाला आहे. पण यापूर्वी करण्यात आलेल्या रस्त्याशेजारील साईडपट्टय़ांचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे याचा त्रास येथील व्यावसायिक आणि रहिवाशांना सहन करावा लागत आहे. साईडपट्टय़ा नसल्यामुळे वाहने रस्त्यावरच पार्क करण्यात येत आहेत. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. सदर काम करताना कोणत्याच प्रकारचे नियोजन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.

विकासकामे राबविताना निविदेतील अटींचे पालन करणे आवश्यक आहे. रस्त्याचे काम करताना नागरिकांच्या सुरक्षेचा विचार प्राधान्याने करणे बंधनकारक आहे. रस्त्याचे काम करतेवेळी वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करणे कंत्राटदाराची जबाबदारी असते. कोणत्याही ठिकाणी खोदाई करण्यात आल्यास त्याची माहिती नागरिकांना समजण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन त्या ठिकाणी काम सुरू असल्याबाबत फलक लावणे बंधनकारक आहे. पथदीप बंद असल्यास पर्यायी दिवे लावून नागरिकांची सोय करणे गरजेचे आहे. मात्र, या सर्व अटी व नियम धाब्यावर बसवून स्मार्ट सिटीची कामे करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोणतेही काम कधीही आणि कुठूनही सुरू केले जाते. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. व्यवस्थित आणि शिस्तबद्धपणे एका बाजूचा रस्ता पूर्ण झाल्यानंतर दुसऱया बाजूच्या रस्त्याचे काम करणे आवश्यक आहे. पण कंत्राटदाराच्या मर्जीनुसार कुठूनही आणि कधीही कामाची सुरुवात करण्यात येत असल्याने वाहनधारक आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या अशी स्थिती स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी दिसून येत आहे. शहापूर-वडगाव रस्त्यावर वाहनांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे एका बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण करून दुसऱया बाजूचे काम सुरू करणे गरजेचे होते. पण या ठिकाणी कोणतीच दक्षता घेण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. वडगाव रोड कॉर्नर ते पटवर्धन लेआऊटपर्यंतच्या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. केवळ शहापूर-वडगाव कॉर्नर या दरम्यान काँक्रिटीकरणाचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरू असल्याने ही कामे कधी पूर्ण होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. येळ्ळूर, अवचारहट्टी, धामणे, नंदिहळ्ळी, देसूर, राजहंसगड, जुने बेळगाव, अनगोळ अशा विविध भागातील नागरिक या मार्गाने ये-जा करीत असतात. त्यामुळे हा रस्ता वर्दळीचा आहे. पण वाहनधारकांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याची दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

आरपीडी कॉर्नर ते पटवर्धन लेआऊटच्या आरपीडी रोडचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा खोदाईचे काम अद्यापही सुरूच आहे. या ठिकाणी विविध वाहिन्या घालण्यात आल्या नसल्याने आता काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर खोदाई सत्र आरंभण्यात आले आहे. या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यापूर्वी डेनेज चेंबरची उंची वाढविणे गरजेचे होते. पण हे नियोजन काँक्रिटीकरण करण्यापूर्वी आले आहे. त्यामुळे आता डेनेज चेंबरची उंची वाढविण्यासाठी काँक्रिटीकरण पूर्ण केलेला रस्ता पुन्हा खोदण्याचे सत्र सुरू आहे. साईड पट्टय़ांचे काम अपूर्ण असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर रस्ता  अरुंद बनला असून यामध्ये आता डेनेज चेंबरच्या कामामुळे अडचण निर्माण झाली आहे. आरपीडी रोडवर विविध महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ असते. वाहने रस्त्यावर पार्क करण्यात येत असल्याने अडथळा निर्माण झाला आहे.  त्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे आवश्यक होते. पण याबाबत स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांना आणि कंत्राटदारांना कोणतेच गांभीर्य नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. अर्धवट रस्त्याच्या कामामुळे वाहनधारक आणि नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या कामाची अंमलबजावणी पाहता सुविधा कमी आणि गैरसोयीच अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी नको रे बाबा! अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. 

Related Stories

ता.पं.कार्यालयासमोर खासगी वाहनांचेच अधिक पार्किंग

Patil_p

तालुक्यातील प्लास्टिक बंदी केवळ फार्स

Amit Kulkarni

बिबटय़ाच्या हल्ल्यातून शेतकरी सुदैवानी बचावला

Patil_p

बसरीकट्टी येथे दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

Omkar B

द वायरच्या संपादकांनी माफीनामा जाहीर करावा

Omkar B

साडेतीनशे बाधितांवर घरातच उपचार

Patil_p
error: Content is protected !!