तरुण भारत

ड्रीम 11 चा पुढील 2 वर्षांचा प्रस्ताव फेटाळला

ड्रीम 11 कंपनीचा करार केवळ साडेचार महिन्यांपुरताच : बीसीसीआयचे स्पष्टीकरण, कमी निविदा रकमेचा परिणाम

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम 11 यंदाचे आयपीएल प्रायोजक असतील, असे मंगळवारी जाहीर केले. पण, याच कंपनीचा 2021 व 2022 आयपीएल आवृत्तीसाठीचा प्रस्ताव बीसीसीआयने स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. ड्रीम 11 कंपनीशी फक्त 4 महिने 13 दिवसांचा करार आहे आणि यानुसार ते याच आयपीएलचे प्रायोजक असतील. कमी निविदा रकमेमुळे आम्ही त्यांचा पुढील दोन वर्षांचा प्रस्ताव नाकारला आहे, असे बीसीसीआयने येथे स्पष्ट केले.

ड्रीम 11 कंपनीने बायजूज व यूएन अकादमी या दोन शैक्षणिक क्षेत्रातील कंपन्यांना पिछाडीवर टाकत यंदाचे आयपीएल प्रायोजकत्व पटकावले. 4 महिने 13 दिवसांच्या या करारासाठी त्यांनी 222 कोटी रुपये मोजले. मात्र, आयपीएलची मूळ प्रायोजक चायनीज मोबाईल कंपनी व्हिवो वर्षाकाठी 440 कोटी रुपये मोजायची. त्यापेक्षा ही रक्कम बरीच कमी आहे.

ड्रीम 11 कंपनीने दुसऱया व तिसऱया वर्षासाठी 240 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव बीसीसीआयसमोर ठेवला होता. व्हिवो कंपनीचा मूळ करार पूर्ववत झाल्यास आपला यावर दावा नसेल, याचीही त्यांनी तयारी दर्शवली होती. पण, बीसीसीआयने या कमी रकमेवर पुढील दोन वर्षांसाठी करार करता येणार नाही, या कंपनीला कळवले.

240 कोटींसाठी करार का?

‘लिलावात सहभागी तीन कंपन्यांमध्ये ड्रीम इलेव्हनची निविदा रक्कम अधिक होती. पण, पुढील दोन वर्षात कोव्हिड-19 ची सध्याची परिस्थिती सुधारणार, हे निश्चित असल्याने केवळ 240 कोटी रुपयांचा करार बीसीसीआय कशासाठी करेल’, असा प्रतिप्रश्न बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने गोपनियतेच्या अटीवर केला.

अद्यापही व्हिवोकडून अपेक्षा

‘आमचा व्हिवो कंपनीशी करार आताही कायम आहे. सध्या आम्ही त्या कराराला केवळ अल्पविराम दिला आहे. त्यामुळे, 440 कोटी रुपये मिळत असतील तर त्याऐवजी 240 कोटी रुपयांचा करार करण्यात काहीच हशील नाही’, असे या सूत्राने पुढे नमूद केले.

ड्रीम 11 कंपनी मागील काही कालावधीत विशेषतः क्रीडा लीग स्पर्धांमध्ये प्रायोजकत्व मिळवले असून 6 आयपीएल प्रँचायझींसह 19 लीगमध्ये त्यांचा वाटा आहे.

अध्यक्षांकडून शिक्कामोर्तब

यापूर्वी, आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी पत्रकातून ड्रीम 11 शी केलेल्या कराराची मंगळवारी माहिती दिली होती.

‘2020 आयपीएल आवृत्तीसाठी आम्ही ड्रीम 11 कंपनीचे प्रायोजक या नात्याने स्वागत करतो. ड्रीम 11 कंपनीने आयपीएलचे प्रायोजकत्व स्वीकारले, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. डिजिटल ब्रँडच्या नात्याने या प्रायोजकत्वातून त्यांनाही उत्तम व्यासपीठ लाभेल, याची आम्हाला खात्री वाटत़े’, असे ब्रिजेश पटेल पुढे म्हणाले होते.

ड्रीम स्पोर्ट्सकडून स्वागत

ड्रीम स्पोर्टस्चे सीईओ व सहसंस्थापक हर्ष जैन यांनी देखील या कराराबद्दल आनंद व्यक्त केला. या कराराबद्दल आम्ही बीसीसीआयचे आभारी आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, 2021 व 2022 हंगामासाठी व्हिवो कंपनी परतली नाही तर बीसीसीआय नव्याने निविदा काढेल. पण, 400 कोटी रुपयांपेक्षा कमी किंमतीला नवा करार केला जाणार नाही, हे जवळपास स्पष्ट असल्याचे मानले जाते.

ड्रीम 11 कंपनीला सीएआयटीचा विरोध

नवी दिल्ली : कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स युनियनने आयपीएल स्पर्धेचे नवे प्रायोजक ड्रीम 11 कंपनीला कडाडून विरोध केला असून याबाबत त्यांनी बीसीसीआयकडे लेखी आक्षेप नोंदवला. ‘ड्रीम 11 कंपनीत चायनीज कंपनी टेन्सेंट ग्लोबलची गुंतवणूक आहे. त्यामुळे, या ना त्या प्रकारे चायनीज कनेक्शन कायम राहणे हे निश्चितच आक्षेपार्ह आह़े’, असे या युनियनने स्पष्ट केले. यंदाची आयपीएल स्पर्धा दि. 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवली जाणार आहे.

Related Stories

ग्रीसचा सिटसिपेस तिसऱया फेरीत

Patil_p

यापुढे प्रत्येक मालिकेत सर्वोत्तम संघ नसेल – बटलर

Patil_p

माजी ऑलिम्पियन्सना प्रशिक्षणासाठी निमंत्रण

Patil_p

फिक्सर्स खेळाडूंशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात

Patil_p

विंडीज-लंका कसोटी मालिका अनिर्णीत

Patil_p

अझारेन्का, सेरेना विल्यम्स, थिएम, मेदवेदेव्ह उपांत्य फेरीत

Patil_p
error: Content is protected !!