तरुण भारत

आज गणेश पूजनाने चतुर्थी उत्सवास प्रारंभ

कोरोनामुळेपुरोहिताविनापूजा,फटाक्याविनाचवथ

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

गणांचा अधिपती, विघ्नविनायक श्री गणरायचे शुक्रवारी घरोघरी आगमन झाले. आज शनिवारी गणेश चतुर्थी दिनी श्री गणेशाच्या महापूजनेने राज्यात चतुर्थी उत्सवाला प्रारंभ होत आहे. राज्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले असून कोरोनाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर बहुतेक ठिकाणी प्रथमच पुरोहिताविना तसेच फटाक्याना फाटा देऊन अनेक मर्यादा घालून घरोघरी चतुर्थी उत्सव थाटात साजरा करण्यासाठी गोमंतकीय भाविक सज्ज झाले आहेत. 

कोरोनामुळे सर्वांचेच आर्थिक कंबरडे मोडले असले तरी राज्यात आज मोठय़ा उत्साहात गणेश चतुर्थी उत्सवाला प्रारंभ होत आहे. अनेक मर्यादा सरकारने लादल्या आहेतच शिवाय प्रत्येक कुटुंबाने स्वत:वर काही बंधने घालून घेतलेली आहेत. त्यामुळे मर्यादित स्वरुपात गणेश उत्सव साजरा केला जात आहे. गणेश चतुर्थी हा उत्सव राज्यभरातील सर्व स्तरातील मंडळीना एकत्र आणतो. गावागावातील वाडय़ावाडय़ातील लोक या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात. घरोघरी जाऊन सामूहिक पद्धतीने आरती करतात. विसर्जनादिवशी देखील सर्व मंडळी एकत्र येतात. पिढीजात परंपरेने राज्यात गणेश चतुर्थी उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. मात्र प्रथमच या प्रथा व परंपरेला कोरोनाच्या संसर्गामुळे मर्यादा आल्या आहेत.

भटजीविना आणि फटाक्यांना बायबाय करीत चतुर्थी

कोरोना संसर्गाच्या फैलावाने प्रथमच गणेशोत्सवावर असंख्य मर्यादा आल्या. गावागावातील पुरोहितांनी यावर्षी कोरोना संसर्गामुळे घरोघरी पूजेला जाणार नसल्याचे भाविकांना कळविले. त्यामुळे दरवर्षी पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीची महापूजा करणाऱयांना ऑनलाईनद्वारे पुरोहितांच्या मदतीने पूजा करावी लागेल किंवा अनेकांनी घरी पुस्तके आणून त्यातील छापील पूजेच्या सहकार्याने पूजा करण्याचे ठरविले आहे. एका बाजूने पुरोहितांविना व दुसऱया बाजूने कोरोनामुळे एवढी धास्ती घेतलेली आहे की बहुतेक जणांनी यावर्षी गणेश चतुर्थी उत्सवात फटाके वा दारु सामानाची आतषबाजी करायचे नाही असे ठरविले आहे. अनेक जणांनी आपल्या संपूर्ण परिसरात कोणालाही फटाके उडवायला द्यायचे नाही असा निर्णय घेतला आहे. फटाक्यांच्या धुरामुळे सर्दी, पडसे उद्भवण्याची भीती आहे. अगोदरच कोरोनाचा फैलाव सर्वत्र आहे. त्यातच फटाक्यांच्या धुरामुळे आरोग्य बिघडण्याची भीती असल्याने राज्यातील बहुतेक मंडळींनी फटाके उडवायचे नाहीत, असा निर्णय घेतला आहे. परिणामी यावर्षी फटाक्यांची विक्री अत्यल्प प्रमाणात झाली.

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्यातील बाजारपेठेमध्ये नागरिकांनी माटोळी सामान, तसेच आवश्यक खाद्यपदार्थ, अन्नधान्य तसेच फळे आणि भाजी खरेदीसाठी एकच गर्दी केली. परिणामी सामाजिक अंतर राखण्याचे भान अनेकांना राहिले नाही. शुक्रवारी सायंकाळी अनेकांच्या घरात गणेशमूर्तींचे आगमन झाले. आज रितसर मखरात रितसर बसवून महापूजा होईल. गणेश चतुर्थीनिमित्त संपूर्ण गोव्यात मंगलमय असे वातावरण निर्माण झाले. शुक्रवारी दुपारपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडला तरी जनतेचा उत्साह मात्र तसुभर देखील कमी झाला नाही.

Related Stories

वास्कोत ताबडतोब पूर्ण लॉकडाऊन करावे

Omkar B

धारबांदोडा तालुका भाजी लागवडीत अव्वल

Amit Kulkarni

ड्रग्स विरोधात आपली भूमिका कायम

Omkar B

गोव्यात आदिवासी संग्रहालय, संशोधन केंद्र उभारणार

Amit Kulkarni

कोरोनावर आता लॉकडाऊन हाच उपाय

Omkar B

मुंबईत अडचणीच्या ठिकाणी आग विझवण्यासाठी लवकरच फायर बाईक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!