तरुण भारत

स्वत:चा जीव पणाला लावत वाचविला कामगाराचा जीव

वेंगुर्ल्याच्या सुकन्येची मुंबईत धाडसी कामगिरी : बेशुद्ध कामगाराला स्वतः वाहनातून नेले इस्पितळात

शेखर सामंत / सिंधुदुर्ग:

Advertisements

कोरोनाच्या दहशतीमुळे लोक माणुसकीही विसरत चालल्याचे दृष्य सर्वत्र दिसत असताना मुंबई येथे कार्यरत असलेल्या वेंगुर्ल्याच्या सुकन्या सौ. क्षमा आरोलकर – गवाणकर यांनी यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता थेट कोरोनाचा धोका पत्करत बेशुद्ध होऊन पडलेल्या कामगाराला स्वत:च्या हातानी उचलून आपल्या वाहनातून योग्य वेळेत इस्पितळात दाखल करीत त्याचे प्राण वाचविले.

दरम्यान या धावपळीत त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यामुळे त्यांच्या पतीलाही कोरोनाची लागण झाली. यात पतीची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना ब्रीचकॅण्डी इस्पितळात दाखल करावे लागले. उपचाराअंती त्यांचे प्राण वाचले. तसेच स्वत: सौ. क्षमा यांनी दुर्दम्य इश्चाशक्तीच्या बळावर स्वत:ही कोरोनावर मात  करण्यात यश मिळविले. कामगारासाठी स्वत:सह स्वत:च्या कुटुंबाचा जीव पणाला लावणाऱया सौ. क्षमा यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

सौ. क्षमा आरोलकर-गवाणकर या वेंगुर्ल्याच्या सुकन्या व बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्या मुंबईत स्थायिक असून त्या बी. एस. टी. कँटिन सेवा चालवितात. लॉकडाऊन काळात ती सेवा बंद असली, तरी त्यांना कँटिनमध्ये थांबून असलेल्या कामगारांची काळजी घेण्यासाठी कँटिनमध्ये फेऱया माराव्या लागतात. विशेष म्हणजे त्यांचा स्वभावगुण परोपकारी असल्यामुळे आपल्या कँटिनमध्ये त्या रस्त्यावर फिरणाऱया गरीब, गरजू, निराधार बांधवांना आपल्या कँटिनच्या माध्यमातून रोजगार देत आधार देतात. एवढंच नव्हे तर या गरजू निराधारांना पगाराबरोबरच त्यांच्या कपडे, औषधपाण्याची त्या काळजी घेत असतात.

रुग्णास स्वत:हून उचलत वाहनात ठेवले

असाच एक दिवस कामगारांची हजेरी घेण्यासाठी त्या कँटिनमध्ये पोहोचल्या असता त्यांना एक वयोवृद्ध कामगार बेशुद्ध होऊन पडलेला दिसला. त्या कामगारासोबत अन्य कामगारही होते. परंतु कोरोना झाला असेल, या भीतीने कोणी त्यास पाणी देण्यास वा हात लावण्यास तयार नव्हते. या आणीबाणीच्या क्षणी सौ. क्षमा घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी कँटिनमधील वयोवृद्ध कामगार अत्यवस्थ होऊन जमिनीवर कोसळल्याचे दिसताच तातडीने ऍम्ब्युलन्स सेवा बोलावण्यासाठी त्यांनी संपर्क साधला. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने सौ. क्षमा यांनी स्वत:च त्या कामगाराला वाहनात घालून इस्पितळात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्या कामगाराला वाहनात ठेवण्यासाठी कुणी तयार होत नव्हते. शेवटी सौ. क्षमा यांनी कामगाराचा जीव महत्वाचा आहे, असे म्हणत त्या कामगाराला स्वत:हून पुढे होत उचलले.

कामगाराचा जीव महत्वाचा

आपल्या कामगार सहकाऱयाचा जीव वाचविण्यासाठी स्वत: सौ. क्षमा स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पुढे होतात, हे पाहून मदतीकरीता अन्य कामगारही पुढे आले. या अत्यवस्थ कामगारास वाहनात ठेवून स्वत: ड्राईव्ह करीत सौ. क्षमा यांनी त्याला सायन इस्पितळात दाखल केले. तिथे सर्व तपासण्या झाल्यानंतर त्या कामगारास कोरोना नसल्याचे निदर्शनास आले. पण त्याच्या डोक्यात गाठ झाल्याने तो बेशुद्ध पडल्याचे निदान झाले. आणखी काही वेळ गेला असता तर या रुग्णाचा जीव धोक्यात आला असता, असे डॉक्टरनी यावेळी सांगितले. त्यांनी सौ. क्षमा यांच्या धैर्याचे त्यांना कौतूक केले. त्यानंतर त्या कामगारावर तातडीने शस्त्रक्रिया होऊन त्याचे प्राणही वाचविण्यात आले. या सर्व उपचाराचा जवळपास 25 हजार रुपयांचा खर्चही सौ. क्षमा यांनी स्वत: केला.

पतीसह क्षमा यांना कोरोनाची लागण

दरम्यान त्या इस्पितळात कोरोनाचे पेशंट असल्यामुळे तिथेच सौ. क्षमा यांना कोरोनाची लागण झाली. पुढे घरी आल्यानंतर त्यांच्या पतीलाही या कोरोनाची लागण झाली. यात त्यांचे पती अत्यवस्थ झाले. यामुळे आपल्या पतीवर उपचार करण्यासाठी सौ. क्षमा यांनी तातडीने पतीला त्वरित ब्रीचकॅण्डी इस्पितळ गाठले. या इस्पितळात चौदा दिवस उपचार घेतल्यानंतर सौ. क्षमा यांचे पती मृत्यूच्या दाढेतून सुखरुपपणे बाहेर आले. याच दरम्यान दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर सौ. क्षमा यांनी स्वत:ही कोरोनावर यशस्वीपणे मात केली. माणुसकी व परोपकाराच्या लढाईत दुसऱयाच्या जीवासाठी स्वत:चा व कुटुंबियांचा जीव पणाला लावणाऱया सौ. क्षमा यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

कामगाराचा प्राण वाचला, हेच समाधान – सौ. क्षमा

दरम्यान सौ. क्षमा यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, कोणास काय वाटते हे जाणून घेण्यापेक्षा मी एका माणसाचा प्राण वाचवू शकले, याचा मला अभिमान वाटतो. काहीजणांनी माझ्यावर टीकाही केली. तुझ्या या सामाजिक बांधिलकीमुळे तू स्वत:चा व स्वत:च्या कुटुंबाचा जीव धोक्यात आणलास, असेही काहीजण म्हणाले. पण मी असं म्हणेन त्या कामगाराचे प्राण वाचविल्यामुळेच परमेश्वराने कोरोनाच्या संकटातून माझी व माझ्या पतीची यशस्वी सुटका केली. मला व माझ्या कुटुंबियांना माझ्या या कामगिरीचा गर्व वाटतो, असेही त्या म्हणाल्या.

Related Stories

विलगीकरणाची जबाबदारी ग्राम नियंत्रण समितीवर

NIKHIL_N

दाऊदच्या लोटेतील भूखंडाचा 1 कोटी 10 लाखाला लिलाव

Patil_p

सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मार्चपर्यंत पुढे ढकलल्या

NIKHIL_N

रत्नागिरी : शीळ धरणाच्या ‘पंम्पीग हाऊस’चे होतेय मजबुतीकरण

triratna

चालत्या लक्झरीला अचानक आग

NIKHIL_N

निजामुद्दीन कार्यक्रमात सिंधुदुर्गातील दोघे

NIKHIL_N
error: Content is protected !!