वृत्तसंस्था/ दुबई
संयुक्त अरब अमिरातमध्ये 19 सप्टेंबरपासून आयपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रांचायजीनी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज 40 वर्षीय रेयान हॅरीसची गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाकरिता यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे जेम्स हॉप्सची गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती पण आता हॉप्सच्या जागी रेयान हॅरीसची निवड करण्यात आली आहे. आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात दिल्ली कॅपिटल्सला हॉप्सकडून गोलंदाजीचे मार्गदर्शन लाभत होते. 40 वर्षीय हॅरीसने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व करताना कसोटीत 113, वनडेत 44 आणि टी-20 प्रकारात 4 बळी मिळविले आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षक वर्गामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पाँटींग, मोहम्मद कैफ, सॅम्युअल बद्री आणि विजय दाहिया यांचा समावेश आहे. आता त्यामध्ये हॅरीसची भर पडली आहे. 13 वी आयपीएल क्रिकेट स्पर्धा कोरोना महामारी समस्येमुळे लांबणीवर टाकण्यात आली होती. सदर स्पर्धा भारताबाहेर 19 सप्टेंबरपासून युएई येथे खेळविली जाणार आहे.