तरुण भारत

नाही जल्लोष… पण भक्तीभाव अपार !

पाच दिवशीय गणरायाला भक्तिमय निरोप

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

कोरोना महामारीच्या संकटातही काल बुधवारी गोव्यातील गणेशभक्तांनी पाच दिवशीय गणरायाचे साधेपणाने, पण मोठय़ा भक्तीभावाने विसर्जन केले. कोरोनाचे संकट दूर करून समस्त जनतेला सुखी ठेवण्याची मनोमन विनवणी करीत गणरायाला निरोप दिला. यावर्षी विसर्जनाला टाळ, लेझीम, बॅण्ड, दिंडी पथकाची साथ नव्हती. त्याचबरोबर फटाक्यांची आतषबाजीही होऊ शकली नाही. जुन्या काळातील चतुर्थीची आठवण करून देणारा हा यंदाचा गणेशचतुर्थीचा सोहळा ठरला.

गणशेभक्तांनी सायंकाळी लवकरच विसर्जन सोहळ्याला सुरुवात केली होती. दिंडीचे सोहळे नाही, भजनी पथकांच्या बैठका नाहीत. केवळ मनोमन गणपतीची भक्ती करीत आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्जवी  विनंती करीत गणरायाला निरोप दिला. अनेक गावांमध्ये यंदा पुरोहितांशिवाय गणेशभक्तींनी स्वतः गणरायाची पूजा केली. त्याचबरोबर उत्तरपूजाही केली. व्हॉट्सऍपवर मंत्रपठण व गणेश पूजनाचे मंत्र सुरू ठेऊन लोकांनी पूजन केले. शक्य होईल त्या पद्धतीने गणपतीची पूजा घरोघरी करण्यात आली. कोरोनाच्या संकटात जड अंतःकरणाने भाविकांनी गणरायाला निरोप दिला.

जल्लोष नाही, पण भक्तीभाव अपार

दरवर्षी विसर्जन सोहळाही तेवढाच उत्साही असायचा. ढोल-ताशांचा गजर, तालबद्ध पदन्यास करत नाचणारे दिंडी पथकांचे मेळ, ठिकठिकाणी होणाऱया भजनांच्या मैफली यामुळे परिसर उत्साहाने भरून जायचा. ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष परिसर दणाणून सोडायचा. युवा पिढी निरोपाच्या सोहळ्याला प्रचंड जल्लोष करायची. अमाप उत्साह सर्वत्र दिसून यायचा. पण यंदा मात्र या सर्व गोष्टी बाजूला राहिल्या मात्र भक्तीभाव कायम राहिल्याचे दिसून आले.

कोरोनाच्या संकटाला दाद न देता मोठय़ा धिराने गणेशभक्तांनी आपला पारंपरिक गणेश उत्सव जपला. अजूनही सात दिवसांचे गणेश राज्यात आहेत. फार मोठा सोहळा करता येत नसला तरी गणरायाचे पूजन मनोभावे करण्यावर भक्तांनी भर दिला. सार्वजनिक गणेश मंडळांनीही यंदा साधेपणाने उत्सव साजरा केला व पाच दिवसांतच विसर्जन केले.

जुन्या काळातील आठवणींना उजाळा

जुन्या काळात अत्यंत साधेपणाने पणतीच्या किंवा पेट्रोमॅक्स बत्तीच्या उजेडात गणेशोत्सव व्हायचे. फार मोठा उत्साह नसला तरी गणरायावर अपार श्रद्धा, भक्ती असायची. गरीब लोक भक्तीभावनेने गणरायाचे पूजन करायाचे. विद्युत रोषणाई नव्हती, सजावट नव्हती, रंगरंगोटी नव्हती पण भक्ती मात्र अपार होती. अनेक जुन्या, जाणत्या लोकांनी यंदा जुन्या काळातील गणेशोत्सवाची आठवण ताजी केली. कोरोना संकटाने लोकांमधील उत्साहावर विरजण टाकले मात्र गणरायावरील अपार श्रद्धा, भक्तीला कोरोना बाधा पोहोवू शकला नाही. उलट कोरोनाच्या संकटाला दूर करण्याची मागणी भक्तांनी गणेश विसर्जनावेळी केली.

Related Stories

राखी प्रभुदेसाई यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Amit Kulkarni

‘बिग बी’ कडून ‘कमला पसंद’चा करार रद्द

Amit Kulkarni

स्पेनचा जुआन गोंझालेज हैदराबाद एफसीला करारबद्ध

Amit Kulkarni

एक तरी विकास प्रकल्प दाखवा

Patil_p

आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर प्राणघातक हल्ला

Patil_p

प्रश्नपत्रिकेतील हा प्रश्न सरकारचे पितळ उघडे पाडणारा

Omkar B
error: Content is protected !!