तरुण भारत

‘माही’ मुळे मारेकऱयाचा सहा तासांत छडा

प्रतिनिधी / खेड :

तालुक्यातील होडखाड-वरचीवाडी येथील नारायण शिगवण याच्या खून्याला अवघ्या सहा तासातच पोलीसांनी जेरबंद केले आहे. रत्नागिरी पोलीस दलाच्या ‘माही’ श्वानाने तपासात महत्वाची भुमिका बजावली असून गावातीलच रूपेश शिगवण (24) याने आर्थिक देवघेवीच्या वादातून हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

होडखाड-वरचीवाडी येथील नारायण सदू शिगवण या 40 वर्षीय अपंग युवकाचा मृतदेह बुधवारी सकाळी जंगलमय भागात आढळला होता. लाकडी दांडक्याने प्रहार करून त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. मारेकऱयाचा माग काढण्यासाठी श्वानपथकही मागवण्यात आले होते. माही श्वानाने तपासात महत्वाची भुमिका निभावत मारेकऱयापर्यंत पोहचवण्यात पोलीसांची मोठी मदत केली.

नारायणचा मृतदेह सापडलेल्या ठिकाणी माहीला नेल्यानंतर तेथे काही काळ तो घुटमळला. त्यानंतर त्याने थेट आरोपी रूपेश शिगवणचे घर गाठले. दारात पोलीसांना पाहताच त्याचे धाबे दणाणले. पोलीसांनी चौकशी केली असताना सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलीस खाक्या दाखवताच रूपेशने गुन्हा कबूल केला.

पैसे देऊनही दाखला न मिळाल्याचा राग

अपंग असलेले नारायण शिगवण हे नागरिकांना आवश्यक शासकीय दाखले काढून देणे, महसूल व पंचायत समितीशी संबधीत कामे करून देणे, कागदपत्रे मिळवून देणे अशी कामे करायचे. रूपेश शिगवण याने आजोबांचा मृत्यू दाखला काढून देण्यासाठी दीड वर्षापूर्वी नारायण शिगवण यास 10 हजार रूपये दिले होते. दाखल्यासाठी तगादा लावूनदेखील दाखला देण्यास त्याने असमर्थता दर्शवली होती. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रूपेश मुंबईहून गावी आला होता. यानंतर त्याने पुन्हा दाखल्यासाठी नारायण शिगवण याच्याकडे तगादा लावला असता त्याने आणखी 4 हजार रूपयांची मागणी केली होती.

 त्यानुसार रूपेश 25 रोजी रात्रीच्या सुमारास 4 हजार रूपये घेऊन नारायणला भेटण्यासाठी होडखाड येथील बसस्टॉपवर गेला होता. यादरम्यान नारायणने आणखी 2 हजार रूपयांची मागणी करत रूपेशला शिविगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी झालेल्या शाब्दीक बाचाबाचीनंतर रागाच्या भरात त्याच्या डोक्यात लाकडी दांडका घालून खून केल्याचे रूपेशने पोलिसांना सांगितले. याबाबतचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत गडदे करत आहेत.

 पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या तप्तरतेमुळे  व ‘माही’ श्वानाच्या महत्वपूर्ण योगदानामुळे अवघ्या 5 तासांतच मारेकऱयास गजाआड करण्यात यश आले. याकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत गडदे व अन्य पोलीस कर्मचाऱयांचेही सहकार्य लाभले. पथकात पोलीस कर्मचारी मंगेश शिगवण, संजय मारळकर, संदीप कदम, चरणसिंग पवार, नीलेश माने यांचा समावेश होता. खूनासाठी वापरलेल्या दांडक्यासह मनगटी घडय़ाळ, मृताच्या कुबडय़ा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Related Stories

विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी खासदार राऊतांतर्फे प्रयत्न करणार!

NIKHIL_N

जागतिक वारसास्थळांसाठी राज्याकडून कातळशिल्पासह दोन प्रस्ताव

Patil_p

रत्नागिरी : खेडमध्ये आठवड्यानंतर ३ कोरोनाचे रूग्ण

triratna

‘जलजीवन मिशन’मधून पोहोचू लागले घराघरात पाणी

Amit Kulkarni

थिबा पाँईटकडे वाहन नेताय तर ५०० रु. दंड

Shankar_P

रत्नागिरी : पाळीव श्वानानी घेतला कर्मचार्‍याचा बळी

triratna
error: Content is protected !!