तरुण भारत

फोंडा नगराध्यक्षपदी अपूर्व दळवी निश्चित

प्रतिनिधी /फोंडा :

फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षपदी विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवी यांची निवड निश्चित झाली असून आज शुक्रवारी होणाऱया निवडणुकीत त्यासंबंधी अधिकृत घोषणा तेवढी बाकी आहे. काल गुरुवारी दुपारपर्यंत नगराक्षपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. फोंडय़ाचे पालकमंत्री गोविंद गावडे यांनी फोंडा पालिकेत येऊन त्यांचे अभिनंदनही केले.

Advertisements

 व्यंकटेश उर्फ दादा नाईक यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. हल्लीच भाजपात प्रवेश केलेले रितेश रवी नाईक यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी सुरुवातीला चर्चेत होते. मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी बुधवारी रात्री विश्वनाथ दळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. सध्या फोंडा पालिकेवर भाजपाचे संख्याबळ 8 तर मगोचे 7 आहे. मगो पक्षातर्फे शेवटच्या क्षणापर्यंत कुणीही अर्ज न भरल्याने अपेक्षेप्रमाणे दळवी यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्वांत तरुण नगराध्यक्ष बनण्याचा मान

 विश्वनाथ दळवी हे खडपाबांध येथील प्रभाग 7 मधून सन् 2014 व 2017 साली झालेल्या निवडणुकीत सलग दोनवेळा मोठय़ा मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. सध्या ते उपनगराध्यक्ष आहेत. फोंडा पालिकेवर सर्वांत तरुण नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. आज शुक्रवारी सकाळी 11 वा. औपचारिक निवडणूक होऊन नगराध्यक्ष म्हणून ते ताबा स्वीकारणार आहेत. चालू कार्यकाळातील फोंडा पालिकेवरील ते तिसरे नगराध्यक्ष आहेत. यापूर्वी प्रदीप उर्फ झालू नाईक व त्यानंतर व्यंकटेश नाईक यांनी नगराध्यक्षपद भूषविले आहे.

मंत्री गोविंद गावडेंनी केले अभिनंदन

दळवी यांचे अभिनंदन करताना मंत्री गोविंद गावडे म्हणाले, भाजपाने एका तरुण व निष्ठावान कार्यकर्त्याकडे हे जबाबदारीचे पद सोपविले आहे. ही जबाबदारी पेलताना फोंडय़ातील जनतेच्या विश्वासाला त्यांना सार्थ उतरावे लागेल. रितेश नाईक यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यासाठी त्यांनी हट्ट न धरता आपण वैयक्तिक स्वार्थासाठी भाजपात प्रवेश केलेला नाही, हे सिद्ध केले आहे, असेही गोविंद गावडे यांनी सांगितले. पालकमंत्री या नात्याने फोंडा पालिकेच्या विकासासाठी आपले नेहमीच सहकार्य असल्याची हमी त्यांनी दिली.

जनतेच्या विश्वासाला पात्र ठरु

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी, जनतेचा विश्वास व सर्व नगरसेवकांच्या सहकार्यातून फोंडा शहरात चांगल्या सुविधा देण्याचा आपला प्रयत्न असेल. अपूर्ण राहिलेल्या विकासकामांना चालना देतानाच सर्व प्रभागांना समान न्याय दिला जाईल, अशी प्रतिक्रिया विश्वनाथ दळवी यांनी यावेळी व्यक्त केली.

Related Stories

कॅसिनो स्थलांतराबाबत अद्याप निर्णय नाही

Amit Kulkarni

वेरेंकर, देसाई, गरड यांना साहित्य अकादमी पुरस्कार

Omkar B

केपेतील इच्छुक उमेदवारांचा पालिका संचालकांना घेराव

Amit Kulkarni

हणजुणातून पळवलेली स्विफ्ट कारगाडी 48 तासांच्या आत हणजुण पोलिसांकडून ताब्यात

Amit Kulkarni

एकाच दिवसात तब्बल 527 रुग्ण

Amit Kulkarni

केंद्राकडून मार्गदर्शकतत्त्वे आल्यानंतरच 10 वी, 12 वी अभ्यासक्रमाबाबत निर्णय

Patil_p
error: Content is protected !!