तरुण भारत

फ्रान्स संरक्षणमंत्री भारत दौऱयावर येणार

राफेल विमाने वायुदलात समाविष्ट करण्याच्या कार्यक्रमात सहभाग, आणखी खरेदीविषयी होणार चर्चा 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली पुढील महिन्यात भारताच्या दौऱयावर येत असून राफेल लढाऊ विमाने भारतीय वायुदलामध्ये समाविष्ट करण्याच्या कार्यक्रमात ते सहभागी होतील अशी माहिती देण्यात आली आहे. या दौऱयाचा कालावधी अद्याप निश्चित नसला तरी तो होणार आहे, याची शाश्वती देण्यात आली.

या दौऱयात त्या भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्यासह द्विपक्षीय सामरिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत. राफेल विमाने भारतीय वायुदलात समाविष्ट करण्याचा कार्यक्रम 10 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे पार्ली या सप्टेंबरच्या दुसऱया आठवडय़ात भारत दौऱयावर येतील असे सांगितले जाते.

भारत फ्रान्सकडून 36 तयार स्थितीतील राफेल विमाने विकत घेणार आहे. यापैकी 5 विमाने यापूर्वीच भारतात आली आहेत. भारत आणि विमाने विकत घेईल अशी फ्रान्सला अपेक्षा आहे. त्यासंबंधीही दोन्ही नेते चर्चा करणार आहेत. भारत फ्रान्सकडून आणखी 36 राफेल विमानांची खरेदी करू शकतो, असे तज्ञांचे मत आहे. अशा प्रकारे भारतीय वायुदलाकडे 72 राफेल विमाने असल्यास तो चीन व पाकिस्तान अशा दोन्ही देशांशी एकाचवेळी संघर्ष करण्याच्या स्थितीत येऊ शकतो, असेही मत अनेक जागतिक स्तरावरील संरक्षण तज्ञांनी व्यक्त केले.

पहिल्या 36 राफेल विमानांची भारतात पाठवणी 2021 च्या अखेरपर्यंत होणार आहे. या विमानांची खरेदी हा भारताचा गेल्या 23 वर्षांमधील सर्वात मोठा विमान खरेदी करार आहे. त्यावेळी रशियाकडून सुखोई विमाने खरेदी करण्यात आली होती. येत्या नोव्हेंबरात आणखी 5 विमाने देण्यात येणार आहेत. या 36 विमानांपैकी 30 विमाने लढाऊ असतील तर 6 प्रशिक्षणाची विमाने असतील.

पहिली पाच राफेल विमाने अंबाला येथील वायुदलाच्या तळावर नियुक्त करण्यात आली आहेत. तर नंतर येणारी पाच विमाने पश्चिम बंगाल येथील तळावर नियुक्त करण्यात येणार आहेत. भारताला पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांशी दोन हात एकाचवेळी करावयाचे असल्यास त्याच्याकडे अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या 40 तुकडय़ा असणे आवश्यक आहे.

सध्या केवळ 24 तुकडय़ा असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आगामी काळात संरक्षण विभाग अधिकाधिक विमानांची खरेदी आणि देशी उत्पादनावर भर देणार असल्याचे सांगण्यात येते. यासाठी फ्रान्सचे सहकार्य महत्वपूर्ण ठरणार आहे.

Related Stories

अवघ्या 100 रूपयांमध्ये…

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये बालिकांवरही अत्याचार

Patil_p

कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज

Patil_p

जेवढा PF, तेवढीच पेन्शन!

datta jadhav

दोन लसींच्या मानवी परीक्षणाला प्रारंभ

Patil_p

ऑगस्टपर्यंत प्रतिदिन 1 कोटी लसी शक्य

Amit Kulkarni
error: Content is protected !!