तरुण भारत

बोगस ई-पास प्रकरणी गुहागरात मनसे कार्यकर्त्यास अटक

नाशिक पोलिसांनी केली कारवाई, जिल्हय़ात खळबळ,

प्रतिनिधी/ गुहागर

Advertisements

राज्यात कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यावर एका जिह्यातून दुसऱया ठिकाणी जाण्यासाठी शासनाने ई-पास सुरु केले. मात्र यामध्ये प्रचंड प्रमाणात बोगस पास मिळत असल्याच्या तक्रारी झाल्या. या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यातून मनसेच्या एका कार्यकर्त्याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे जिह्यात खळबळ माजली आहे.

   कोरोना संक्रमण काळात अत्यावश्यक सेवा म्हणून राज्यात ई-पास सेवा सुरू झाली. मात्र यावेळी हे पास फक्त हे ठराविक लोकांनाच मिळतात किंवा पैसे दिल्यावरच मिळतात, असा आरोपही करण्यात आला. मनसेच्या संदीप देशपांडे यांनी या संदर्भात राज्य शासनावर गंभीर आरोप करत राज्य शासनाने यात लक्ष घालावे, अशी मागणी केली होती. मात्र नाशिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुहागर तालुक्यात बोगस ई-पासच्या या कारवाईत गुहागर तालुका मनसे संपर्क सचिव राकेश सदानंद सुर्वे (32) हा सापडल्याने खळबळ माजली आहे.

  सुर्वे हा बोगस ई-पास बनवत असल्याची खबर नाशिक पोलिसांना लागली आणि त्यानंतर नाशिक पोलिसांनी थेट गुहागर गाठले. गुहागरचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने यांच्या मदतीने गुहागर तालुक्यातील पडवे गावातून राकेश सुर्वेला अटक करण्यात आली. नाशिक पोलीस त्याला अधिक तपासासाठी नाशिकला घेऊन गेले आहेत. या बाबत गुहागर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता त्यांनी नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली व अधिक तपासासाठी त्याला नाशिकला घेऊन गेले असल्याचे सांगितले.

  दरम्यान, मनसेचा कार्यकर्ता बोगस ई-पासमध्ये सापडल्याने राजकीय वर्तुळात  खळबळ माजली आहे. मनसेने राज्यातील हा घोटाळा उघड करण्याचा प्रयत्न करत असतानाच मनसेचा कार्यकर्ता यात सापडल्याने खळबळ माजली आहे. राकेश सुर्वे हा डोंबिवली येथे राहणारा असून गणपतीसाठी तो आपल्या मूळगावी पडवे येथे आला होता. तो येथे महिनाभरापूर्वी आला होता. त्यामुळे ठाणेसह आता गुहागर तालुक्यात अजून अशी मोठी साखळी आहे का, यात अजून कितीजण आहेत, याचा तपास नाशिक पोलीस करणार आहेत.

  अटक केल्यानंतर सुर्वे याची अधिक चौकशी केली असता त्याने गुह्याची कबुली देत 15 प्रवाशांकडून लॉकडाऊन काळात मुंबई येथून रत्नागिरीला जाण्यासाठी प्रत्येकी 2 हजार रुपये घेत पोलिसांच्या नावाने बनावट ई-पास इतर ठिकाणांवरुन काढून दिल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता ई-पास काढण्यासाठी वापर करत असलेला टॅब, मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. नाशिक पोलिसांनी त्याला नाशिक येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Related Stories

रिफायनरीचे समर्थन केले म्हणून जमातीतून बहिष्कृत करण्याची धमकी

Patil_p

प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांचा विक्रम

Abhijeet Shinde

दोडामार्ग ते बांदा रस्ता पावसाळी डांबराने तर दोडामार्ग ते विजघर दुरुस्ती जांभ्या दगडाने दुरुस्ती

NIKHIL_N

दापोलीत सापडले आणखीन दोघे कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

आजपासून महत्वाच्या कामांना प्रारंभ

NIKHIL_N

मंदिरे तात्काळ खुली करण्यासाठी इशारा

NIKHIL_N
error: Content is protected !!