विजापूर पोलिसांची कारवाई : मालमत्तेच्या वादातून कृत्य
वार्ताहर/ विजापूर
मालमत्तेच्या वादावरून खून केल्याप्रकरणी विजापूर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. सिद्दप्पा शंकरप्पा डंबळ (वय 42), पडियप्पा विठ्ठल डंबळ (वय 27), दयानंद रामप्पा हडपद (वय 32), नागप्पा रामप्पा हडपद (वय 35) आणि नबिसाब हाजिसाब काखंडकी (वय 55) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अलिकडेच महादेवप्पा शंकरप्पा डंबळ यांचा विहिरीत मृतदेह आढळून आला होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी, संशयित सिद्दप्पा आणि मृत महादेव हे दोघेही सख्खे भाऊ असून मालमत्तेच्या वादावरून दोघांमध्ये वरचेवर वाद होत होता. दरम्यान, महादेव याचा खून करण्याचा सिद्दप्पाने कट रचला होता. त्यानुसार आपल्या शेतातील घरात महादेव जेवत असताना संशयित पाच जणांनी घरात प्रवेश करून त्याला घेऊन गेले होते. तसेच हातपाय बांधून त्याला एका विहिरीत टाकून देऊन खून केला होता.
दरम्यान, मलघाण (जि. विजापूर) येथील विहिरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत महादेव शंकरप्पा डंबळ यांचा मृतदेह आढळून आला होता. याची माहिती मिळताच विजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती. तसेच महादेव यांचा खून केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार जिल्हा पोलीस वरिष्ठ अधिकारी अनुपम अगरवाल, अतिरिक्त जिल्हा पोलीस वरिष्ठाधिकारी राम अरसिद्दी, बसवन बागेवाडीचे डीवायएसपी शांतवीर यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय सोमशेखर जुट्टल, पीएसआय विनोद दोडमनी यांच्या पथकाने तपास हाती घेत पाच जणांना ताब्यात घेतले.