तरुण भारत

काँग्रेस कार्यकर्त्यांचा कुडचडे वीज कार्यालयावर मोर्चा

प्रतिनिधी/ कुडचडे

कोविडच्या महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात पाठविण्यात आलेली भरमसाठ वीजबिले माफ करण्यासाठी निवेदने देऊन सुद्धा कोणतीच हालचाल होत नसल्यामुळे सांगे, कुडचडे, केपे व इतर भागांतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुडचडेतील वीज खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावर जाब विचारण्यासाठी बुधवारी मोर्चा आणला. यावेळी वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी कार्यालयात येऊन मोर्चेकऱयांच्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली. तासभराच्या चर्चेनंतर सदर बिले माफ करण्यासंबंधी मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले, अशी महिती काँग्रेस नेते व शेल्डे जिल्हा पंचायत मतदारसंघातील उमेदवार हर्षद गावस देसाई यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

Advertisements

वीजबिलांच्या विषयावरून जाब विचारण्यासाठी तसेच कुडचडे वीज कार्यालयात निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो. पण त्यासाठी बऱयाच अडचणींना तोड द्यावे लागले. सुरुवातीला कुडचडे येथील काडा हॉलजवळ असलेल्या बागायत यार्डमध्ये गेट टाकून पोलीस कर्मचाऱयाच्या साहाय्याने अडवून ठेवण्यात आले. आम्हाला अडवून ठेवण्यासाठी कोणाचा दबाव आला होता हा एक वेगळा प्रश्न आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने कोणाची तरी परवानगी घेण्यात आली व केवळ पाच जणांना जाण्याची परवानगी देण्यात आली. ही कुडचडेत चालणारी हुकूमशाही असून आपण त्याचा निषेध करतो, असे गावस देसाई म्हणाले.

वीजमंत्र्यांकडील भेटीवेळी ज्यावेळी आपण याअगोदर आंदोलने करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विचारली तेव्हा त्यांनी विविध प्रकारे विषय बदलण्याचा प्रयत्न केला, असा दावा गावस देसाई यांनी केला. यावेळी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, सचिव अमरनाथ पणजीकर, जर्नादन भंडारी, ट्रिबेलो सौझा, रजनीकांत नाईक, कुडचडे गट अध्यक्ष पुष्कल सावंत, दक्षिण गोवा जिल्हा सचिव अली शेख, सावर्डे गट अध्यक्ष श्याम भंडारी, रिवण जिल्हा पंचायत मतदारसंघातील उमेदवार अभिजित देसाई, दक्षिण गोवा युवक काँग्रेस अध्यक्ष उबेद खान, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष इरफान किल्लेदार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

…तर पुन्हा रस्त्यावर उतरू

वीजमंत्री काब्राल यांनी या भेटीवेळी फक्त दिशाभूल करणारी वक्तव्ये केली व प्रत्येक प्रश्नावर विषय सोडून उत्तरे दिली. मार्च व एप्रिल महिन्यांची जी वीजबिले पाठविण्यात आली आहेत ती माफ करावीत अन्यथा सदर बिलांवर 50 टक्के सूट द्यावी. तसेच ज्या लोकांना पाच हजार रुपयांहून कमी बिले आली आहेत ती माफ करावीत अशा मागण्या आपण केल्या आहेत. बिले माफ करण्यासाठी योजना करण्याबद्दल चर्चा करतो असे मंत्र्यांनी सांगितले. पण जनतेला यासंबंधी कोणतीच योजना नको असून भरमसाठ बिले माफ करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी गावस देसाई यांनी केली. आपण पुढील काहीच दिवस वाट पाहणार आहे. अन्यथा परत एकदा जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरेन, असा इशारा त्यांनी दिला.

जनतेची दिशाभूल : आमोणकर

राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी वीजबिले माफ करावीत यासाठी वीज खात्यात निवेदने दिलेली आहेत. पण त्याची कोणतीच माहिती नसल्याचे मंत्री काब्राल सांगत आहेत. अशी वक्तव्ये मंत्रिपदाला शोभत नाहीत. निवेदन देऊन एक महिना पूर्ण होत आला आहे आणि सदर निवेदनाबद्दल विचारपूस करण्यासाठी आलो असता वीजमंत्री येणाऱया मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा मांडणार असे सांगत आहे. असे सांगणे म्हणजे  जनतेची निव्वळ दिशाभूल करणे आहे, अशी टीका आमोणकर यांनी केली.

माहितीविना आश्वासन : सावंत

आजपर्यंत सरकारने शब्दांचा घोळ करून लोकांची दिशाभूल केली आहे. हा त्या पक्षाचा गुणधर्म आहे. वीजबिले माफ करण्यासाठी योजना आखण्याचे आश्वासन अशा योजनेची कोणतीच माहिती नसताना देण्यात आलेले आहे. वीजमंत्री म्हणतात की, लॉकाडाऊनच्या काळात लोक घरी बसल्यामुळे सदर भरमसाठ बिले आली आहेत. या मुद्याचा आधार घेऊन सर्व घोटाळा सुरू आहे, अशी टीका पुष्कल सावंत यांनी केली. वीज खात्यातर्फे नवीन पथदीप बसविण्याचे व दुरुस्ती करण्याचे कंत्राट काढण्यात आले होते. त्यानंतर प्रत्येक नगरसेवक स्वतःच्या वॉर्डमधील पथदीप बंद पडलेला असेल, तर सदर खांबाच्या क्रमांकाचे छायाचित्र काढून पाठवू लागला. पण आता सदर कंत्राटदार सोडून गेल्यामुळे शेवटी सदर पथदीपांच्या दुरुस्तीचे काम वीज खात्यातील कर्मचाऱयांवर टाकण्यात आले आहे. कोटय़वधी रुपये घेऊन कंत्राटदार गेला व वीजमंत्री एक पुष्प देऊन सदर पथदीपांचे काम केलेल्यांचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त करतात ही गोष्ट हास्यास्पद आहे, अशी टीका त्यांनी पुढे बोलताना केली. ज्या वेळी आम्ही वीज कार्यालयाजवळ आलो तेव्हा सदर ठिकाणी भाजप कार्यकर्ते दिसून आले. ते कशासाठी आले होते आपल्याला माहिती नाही. पण आपण जे आवाहन केले होते ते सर्वांसाठी होते. त्यामुळेच कदाचित भाजप कार्यकर्तेही उपस्थित राहिले असावेत, असा दावा सावंत यांनी केला. याअगोदर येणारी बिले भरतानाच सर्वांच्या नाकी नाऊ यायचे. मग ही वाढीव बिले या लोकांनी कशी भरायची, असा सवाल अभिजित देसाई यांनी केला. ज्या प्रकारे भाजप कार्यकर्त्यांनी येऊन या मोर्चाला सहकार्य केले त्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत. कारण हा मुद्दा चाळीसही मतदारसंघांचा आहे, असा दावा श्याम भंडारी यांनी केला. योजना नव्हे, तर दोन महिन्यांच्या वीजबिलांमध्ये कपात करा, अशी मागणी पणजीकर यांनी केली.

Related Stories

सांखळी- कारापूर पुलाचे आज मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

Amit Kulkarni

स्वातंत्र्यसैनिक गोपाळ चितारी यांचा आज सत्कार

Patil_p

आपचे गोरखनाथ केरकर यांचा कुंभारजुवे मतदारसंघात प्रचार सुरू

Amit Kulkarni

गालजीबाग येथे नाल्यात कार कोसळली

Omkar B

सारे जहाँ से अच्छा ! यह गोवा है हमारा !

Patil_p

कामगार कल्याण निधीत मोठा घोटाळाच!

Patil_p
error: Content is protected !!