तरुण भारत

कोल्हापूर महापलिकेची वर्षाखेरीस निवडणूक ?

राज्य निवडणूक आयोगाकडून तयारीचा आढावा

मुंबई, कोल्हापूर / प्रतिनिधी

Advertisements

कोल्हापूरसह राज्यातील पाच महापालिकांची सार्वत्रिक निवडणूक या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला घेतली जाण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन मुदत संपलेल्या आणि नजीकच्या काळात मुदत संपणाऱया महापालिकांचा आढावा घेतला.

नवी मुंबई, औरंगाबाद, वसई- विरार महापालिकेची मुदत संपली आहे. कोल्हापूर आणि कल्याण- डोंबिवली महापालिकेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. यापैकी नवी मुंबई, औरंगाबादमध्ये निवडणूकपूर्व तयारी पूर्ण झाली आहे. तर वसई – विरारची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

दरम्यान, कोल्हापूर महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबरला संपणार आहे. तत्पुर्वी निवडणूक प्रक्रिया आवश्यक होते. तथापि कोल्हापूरमधील कोरोनाची स्थिती सध्या गंभीर बनली आहे. त्यामुळे येथील निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेणार ? याबद्दल लवकरच कळून येईल.

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकांना सूचना

राज्यातील कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या महापालिकांसाठी लगेच निवडणूक घेणे शक्य नाही. तथापि आम्ही संबंधित महापालिकांना निवडणूकपूर्व प्रक्रिया सुरू करण्याची सूचना केली आहे. प्रभागाची पुनर्रचना, प्रभागाची सीमा निश्चित करणे, नागरिकांच्या सूचना हरकती मागवणे, मतदारयाद्या अंतिम करणे याबाबत महापालिकांना सूचना केल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली.

कोरोनामुळे संभ्रमाची स्थिती : प्रा. जयंत पाटील, ज्येष्ठ नगरसेवक

महापालिकेची निवडणूक घेण्याआधी सहा महिने तयारी सुरू करावी लागते. कोल्हापूर महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत नोव्हेंबर 2020 मध्ये संपणार असल्याने ही तयारी मार्च, एप्रिल दरम्यान सुरू होणे आवश्यक होते. पण कोरोनामुळे ही प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही. त्याचबरोबर महापालिकेचे प्रशासन कोरोनाच्या कार्यात सक्रिय असल्याने त्यांना निवडणूक प्रक्रियेसाठी वेळ नाही, अशी स्थिती आहे. महापालिकेचे अधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. या उलट नवी मुंबई, औरंगाबाद आदी महापालिकेच्या निवडणुकांची तयारी पूर्वीच झाली आहे. त्यामुळे तेथे निवडणूक होऊ शकते. मात्र कोल्हापूरची सद्यःस्थिती पाहता येथील निवडणूक लांबणीवर जाण्याची अधिक शक्यता वाटते. अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता म्हणजे मतदार याद्या करणे, हरकती, सूचना मागविणे, दुरूस्ती करणे, पुरवणी यादी व अंतिम मतदार यादी करणे, नवीन मतदार नोंदणी करणे, प्रभाग रचना आदी तांत्रिक आणि वेळाखाऊ कामे शिल्लक आहेत, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी दिली.

अशी आहे कोल्हापूर महापालिका

एकूण प्रभाग ः 81
सत्ताधारी पक्ष ः काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (48)
विरोधी पक्ष ः भाजप, ताराराणी आघाडी, एक अपक्ष (33)

पक्षीय बलाबल ः
काँग्रेस 30
राष्ट्रवादी 14
शिवसेना 04
भाजप 13
ताराराणी 19
अपक्ष 01
एकूण 81

2015 मध्ये निवडणूक

2015 मध्ये नवीन प्रभाग रचना झाल्यानंतर 81 प्रभागांसाठी निवडणूक झाली होती. नोव्हेंबर 2015 मध्ये सभागृह अस्तित्वात आले होते. आता विद्यमान सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपणार आहे. त्याच दिवशी नवीन सभागृह अस्तित्वात येणे आवश्यक आहे. पण सध्या कोरोनामुळे संभ्रम आहे.

आयुक्तांकडे जबाबदारी की नवीन अधिकारी

कोरोनाच्या सद्याच्या स्थितीत महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता कमी असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत. निवडणूक झाली नाही तर प्रशासक म्हणून सनदी अधिकारी नियुक्त केला जाऊ शकतो. सध्या असणारे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यावर प्रशासक पदाचा अतिरिक्त भार देणार की स्वतंत्र सनदी अधिकारी नियुक्त होणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यातील ३०० आयसीयू आणि ४०० ऑक्सिजनेटेड बेडचा प्रस्ताव शासनाकडे

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पैशाच्या वादातून तरुणावर खुनी हल्ला

Abhijeet Shinde

विद्युत ठेकेदारीचा परवाना देण्यासाठी 13 हजारांची लाच, शिपाई जेरबंद

Abhijeet Shinde

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय व्होकेशनल योजनेचे सक्षमीकरण करा

Abhijeet Shinde

शिवसेनेच्यावतीने झालेला सत्कार पोलीस दलासाठी प्रेरणादायी – अप्पर पोलीस अधीक्षक काकडे

Abhijeet Shinde

‘संगीत ताजमहाल’च्या निमित्ताने खल्वायन नाट्य संस्थेचा वेगळा आविष्कार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!