तरुण भारत

बारा वर्षांपूर्वी बांधलेला मातीचा बंधारा फुटला कसा ?

प्रतिनिधी / कोल्हापूर

स्वातंत्र्यानंतर सात दशके लोटली तरी जिल्हय़ातील अनेक धनगरवाडय़ांवर अत्यावश्यक अशा मूलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत. असाच अनुभव घेत जीवन जगणाऱया करवीर तालुक्यातील उपवडे पैकी मारूतीचा धनगरवाडय़ातील मातीचा बंधारा गेल्या महिन्यात फुटला आणि वाहून गेला. दहा बारा वर्षांपूर्वी बांधलेला हा बंधारा इतक्यात फुटलाच कसा? असा प्रश्न तेथील धनगरबांधव व्यक्त करत आहेत. दरम्यान, बंधारा फुटल्याने भातपीकाचे नुकसान झाल्याने कोरोनाच्या काळात आधीच अडचणीत आलेल्या धनगर कुटुंबांना पुढे जगायचे कसे? याची चिंता लागली असून नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांच्याकडून सुरू आहे.

करवीर तालुक्यातील सांगरूळपासून खंटागळे, बोलोली, स्वयंभूवाडी, मठाचा धनगरवाडा या मार्गावरून पुढे दुर्गम भागात उपवडे पैकी मारूतीचा धनगरवाडा आहे. या वाडय़ावर पंचवीस तीस उंबरे आहेत. लोकसंख्या दोनशे ते अडीचशे. धनगर कुटुंबांचा मुख्य व्यवसाय भातशेती आणि शेळी पालन. दहा बारा वर्षांपूर्वी या धनगरवाडय़ावर मातीचा बंधारा बांधण्यात आला होता. शेततळय़ासारखा असणारा हा बंधारा धनगरवाडय़ातील शेतीला पाणी आणि कुटुंबांची तहान भागवित होता. गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये मुसळधार पावसांत मातीचा बंधारा अचानकपणे फुटला आणि वाहून गेला. 8 ऑगस्ट दिवशी घडलेल्या या प्रकाराने येथील तब्बल वीस एकरहून अधिक जमिनीवरील भातपीक वाहून गेले. त्याचबरोबर   शेतातील पिकांबरोबर मातीही वाहुन गेल्यामुळे शेतीमध्ये दगडाचा खच पडला आहे. गेले चार महिने काबाड-कष्ट करून भात शेती केली होती. हातातोंडाशी आलेले पीक गेल्यामुळे तेथील धनगर बांधव हवालदिल झाला आहे. हा प्रकार घडून तीन आठवडय़ाहून अधिक कालावधी लोटला तरी केवळ पंचनामा करण्याचे सोपस्कार झाले आहेत. मात्र या संदर्भात स्थानिक तलाटी फारशी माहिती देत नाहीत. जलसंपदा विभागाला या घटनेची माहिती आहे की नाही? या बद्दल धनगर बांधवांत साशंकता आहे. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, करवीर पंचायतीचे माजी सभापती राजू सूर्यवंशी यांच्यासह आमदार पी. एन. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भेट दिली. करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांनीही या प्रकाराची माहिती घेतली असून शासकीय पातळीवर चौकशी आणि मदत देण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. 

मल्हारसेनेकडून चौकशीची मागणी

Advertisements

दरम्यान, मल्हारसेनेचे सरसेनापती बबनराव रानगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या धनगरवाडय़ाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी बयाजी शेळके, राघु हजारे,बाबुराव बोडके, दता बोडके, सर्जेराव देवणे, धोंडीराम कात्रट, रामचंद्र जानकर, विक्रम शिंणगारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने बंधारा वाहून गेला आहे. या कामाची सखोल चौकशी व्हावी व या आपत्तीमुळे ज्या धनगर बांधव शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी बबनराव रानगे यांनी केली. या प्रकाराबद्दल करवीरचे आमदार आमदार पी.एन.पाटील यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. तसेच तहसिलदार लोकरे व तालुका कृषी अधिकारी दीपक देशमुख यांच्याशी संपर्क साधुन नुकसान भरपाईसंदर्भात चर्चा केली आहे, असेही रानगे यांनी सांगितले.

उपवडे पैकी मारूतीचा धनगरवाडा येथील वाहून गेलेल्या मातीच्या बंधाऱयाच्या कामाच्या दर्जाची चौकशी केली जाईल. नुकसानग्रस्त धनगरबांधवांना नुकसान भरपाई देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. त्यासाठी संबंधितांना सूचना केल्या आहेत.
-आमदार पी. एन. पाटील

Related Stories

11 हजार 541 मेट्रीक टन आंब्याचा लिलाव

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपर्यंत नवे 30 कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिमेचे कोल्हापुरात दहन

Abhijeet Shinde

जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत गडहिंग्लजला विजेतेपद

Abhijeet Shinde

कोल्हापूर महापालिकेचे घरफाळा, टीपी अधिकारी धारेवर

Abhijeet Shinde

सातवे येथे पन्नास हजाराची चोरी : अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!