तरुण भारत

दिशाभूल करण्याकरिता काँग्रेसने नाहक आरोप करू नयेत

पत्रकार परिषदेत भाजपचे प्रत्युत्तर : स्थानिक काँग्रेस समितीने प्रथम मडगावच्या समस्या दूर कराव्यात

प्रतिनिधी/ मडगाव

मडगावात बुधवारी स्वप्नील वाळके याचा खून झाला. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी भाजप सरकारने सर्व यंत्रणांचा वापर केला आणि अवघ्या 24 तासांच्या आत त्यांना पकडण्यात यश मिळाले. त्यामुळे काँग्रेस पक्षाने भाजपवर लोकांची दिशाभूल करण्याकरिता नको असलेले आरोप करू नयेत. जर भाजपला सदर प्रकरण दाबून ठेवायचे होते, तर या आरोपींना पकडलेच गेले नसते, असे मडगावचे नगरसेवक रूपेश महात्मे यांनी शुक्रवारी मडगावात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजप सरकार लोकांच्या सुरक्षेसाठी व हितासाठी कार्य करत आहे. काँग्रेस पक्षाने कधीही संघटनात्मकदृष्टय़ा काम केलेले नाही. काँग्रेसला भाजप सरकारवर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. मडगावच्या काँग्रेस समितीने मडगावच्या समस्या दूर करण्यास प्रथम योगदान द्यावे. भाजपवर केलेला एकही आरोप आम्ही सहन करणार नाही, असे महात्मे दक्षिण गोवा भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. यावेळी शर्मद रायतूरकर, नवीन पै रायकर, सुनील नाईक व इतर उपस्थित होते.

मडगावसाठी काय केले हे आमदारांनी दाखवावे

मडगावचे आमदार गेली 25 वर्षे निवडून येत आहेत. मडगावच्या हितासाठी त्यांनी काय केले हे सिद्ध करून दाखविण्याची गरज आहे. मडगावच्या बसस्थानकाचे काम अजून सुरू होत नाही. मडगावमध्ये बेरोजगारी वाढलेली आहे तसेच झोपडपट्टय़ा वाढत आहेत. याला कारणीभूतही मडगावचे आमदारच आहेत. रिंग रोडच्या समस्या अजूनपर्यंत सोडविण्यात येत नाही. तसेच मडगावात अनेक प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत. कोरोनामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. तसेच कित्येक व्यवसाय बंद पडलेले आहेत. पण काँग्रेस पक्ष भाजप सरकारवर टीका करून लोकांची दिशाभूल करत चाललेला आहे, अशी टीका महात्मे यांनी पुढे बोलताना केली.

भाजप सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. बूथ, राज्य, केंद्र अशा अनेक पातळय़ांवर पक्ष संघटनात्मक कार्य करत आहे. पण नगरसेविका डॉरिस टेक्सेरा या स्वतःला काँग्रेस कार्यकर्त्या म्हणवत असल्या, तरी त्या कधीही प्रतिमा कुतिन्हो यांच्यासोबत कोणत्याही समस्येवर आवाज उठवताना दिसलेल्या नाहीत. काँग्रेसची संघटना कशा प्रकारची आहे हे यातून स्पष्ट होते, असे ते म्हणाले.

तेव्हा कायदा व सुव्यवस्था बिघडली नव्हती का ?

मडगावात नुकतीच घडलेली घटना ही अत्यंत वाईट घटना आहे. सदर घटना घडत असताना कुणीही स्वप्नील वाळके यांच्या मदतीला आला नाही. प्रत्येकाने फक्त बघ्याची भूमिका निभावली. अशा प्रकारची घटना पुन्हा मडगावात घडू नये यासाठी पोलिसांनी जबाबदारी घेण्याची गरज आहे, असे रायतूरकर म्हणाले. यापूर्वी 2010 साली मोती डोंगरवर अनेक तलवारी सापडल्या होत्या व 2011 साली मडगावातील रस्त्यावर गँगवॉर झाले होते. तेव्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते. तेव्हा अशा प्रकारच्या गुंडांना मदत करण्याचे कामही काँग्रेस सरकारच करत होते. तेव्हा राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली नव्हती का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पूर्वी मडगावच्या एकाही नागरिकाला मोती डोंगरवर बोलता येत नव्हते. कारण तेथे मडगावच्या आमदारांनी गुंड पाळून ठेवले होते, असा दावा रायतूरकर यांनी केला. जेव्हा माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सरकार 2012 साली सत्तेवर आले तेव्हा मोती डोंगरवरील समस्या दूर झाल्या. सध्या पोलिसांनी मडगावातील बेकायदेशीर व्यवसायांना आळा घालण्याची अत्यंत गरज आहे, असे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झालेल्या मळकर्णे येथील शाळेच्या मुख्याध्यापिका सिंधू प्रभुदेसाई नायक यांचे भाजपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Related Stories

पणजी शहरातील पे पार्किंगसाठी नऊ जागा अधिसूचित

GAURESH SATTARKAR

शेवटच्या मिनिटाला स्वयंगोल, चेन्नई पराभूत

Amit Kulkarni

मालविक्रीसाठी व्यापाऱयांना पावसाची प्रतिक्षा

Omkar B

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्लाझ्मा बँक

Patil_p

नितीन गडकरी यांची शनिवारी ऑनलाईन सभा

Omkar B

पोर्ट टाऊन जेसीआयतर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तू प्रदान

Omkar B
error: Content is protected !!