तरुण भारत

कोल्हापूर शहरात व्यापार्‍यांचा जनता कर्फ्यू!

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आज महत्वपूर्ण बैठक : पाच ते सात दिवस व्यापार बंद ठेवण्यावर निर्णय शक्य

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

जिल्हय़ातील विविध तालुके, गावात स्थानिक पातळीर लॉकडाऊन करण्यात येत आहे. जनता कर्फ्यू पुकारण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज या व्यापारी, उद्योजकांच्या शिखर संस्थेने शहरातही जनता कर्फ्यू पुकारण्याचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. चेंबरच्या नेतृत्वाखाली असणार्‍या 65 व्यापारी संघटनांची आज मंगळवारी सायंकाळी 5 वाजता महत्वपूर्ण बैठक होत आहे.

शिवाजी उद्यमनगरातील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन हॉलमध्ये होणार्‍या बैठकीत जनता कर्फ्यूवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर ‘चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजचे’ अध्यक्ष संजय शेटे यांनी मंगळवारी होणार्‍या बैठकीविषयी माहिती दिली.

सध्या जिल्हय़ात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरानाने मरण पावणार्‍यांचा आकडाही चिंताजनक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील काही तालुक्यात स्थानिक जनतेने स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पुकारला आहे. त्याचबरोबर काही गावातील नागरिकांनी आपली गावे बंद करून जनता कर्फ्यू पुकारला आहे. कागल तालुक्यातील जनता कर्फ्यूची अंमलबजावणी सुरू झाली. शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील काही गावांनीही निर्णय घेत व्यवहारावर मर्यादा आल्या आहेत.

कोल्हापूर शहरात व्यापार्‍यांचा जनता कर्फ्यू
जिल्हय़ात अनेक ठिकाणी जनता कर्फ्यू पुकरण्यात आल्याने गावे लॉकडाऊन आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरात होलसेल खरेदीसाठी येणाऱया तालुक्यातील, गावपातळीवरील व्यापाऱयांची संख्या प्रचंड प्रमाणात घटली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील शाहूपुरी, लक्ष्मीपुरी या व्यापारी पेठेतील व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. पन्नास ते साठ टक्के विक्री घटली आहे. सध्या व्यवहार कमी आहेत. नजीकच्या काळात जर कोल्हापूर शहरात लॉकडाऊन पुकारण्यात आला तर तेव्हा व्यापार बंद ठेवावा लागणार आहे. त्यापेक्षा सध्या गर्दी टाळण्याबरोबर जिल्हय़ातील जनता कर्फ्यू पुकारलेल्या गावांबरोबर गेले ते व्यवहारीक दृष्टय़ा योग्य होईल. त्यामुळे शहरातील गर्दीही कमी होईल.

सामुहिक संसर्गाचा वाढता धोका कमी होईल, या हेतूने शहरात व्यापार्‍यांनी जनता कर्फ्यू पुकारण्याचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. सध्याची चिंताजनक स्थिती पाहता, खरेदी, विक्री बंद ठेवणे संयुक्तिक वाटत असल्याने निर्णय घेण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता इंजिनिअरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये बैठक होईल. चेंबरशी संबंधित 65 संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चेनंतर अंतिम निर्णय होणार असल्याचे चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.

शिवाजी पेठेत जनता कर्फ्यूची शक्यता
शिवाजी पेठेत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर दहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारण्याची शक्यता आहे. याबाबत दोन दिवसात निर्णय घेतला जाणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन निवेदन हि दिले जाणार आहे.

शिवाजी मंदिर येथे सोमवारी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत शिवाजी तरुण मंडळाचे पदाधिकारी, शिवाजी पेठेतील तालीम संस्था, मंडळे यांचे प्रमुख पदाधिकारी यांनी मते मांडली. शिवाजी पेठ व परिसरात वाढत चाललेल्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. बहुतांश जणांनी भागात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करावा, अशी भूमिका घेतली. तर न्यू कॉलेज येथे पेठेतील नागरिकांसाठी 100 बेडचे कोविड सेंटर प्रशासनने सुरु करावे, असेही मत व्यक्त करण्यात आले.

यावेळी देवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कॉ. चंद्रकांत यादव, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, शिवाजीराव जाधव,राजू चव्हाण, लालासाहेब गायकवाड, सुरेश जरग, विश्वास पोवार आदी उपस्थित होते. दरम्यान आज, मंगळवारी पुन्हा पेठेतील प्रमुख पदाधिकाऱयांची याबाबत बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

दादांच्या पाच वर्षातील कारभाराचा हिशोब घेणार

Patil_p

कागल तालुक्यातील ९ जण कोरोना मुक्त

Abhijeet Shinde

भाजपकडून अमल महाडिक यांना उमेदवारी

Sumit Tambekar

आगामी गळीत हंगामात सात लाख टन ऊस गाळपचे उद्दिष्ट : अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर

Abhijeet Shinde

‘ पक्ष मजबुती ’ मध्ये कोल्हापूर राष्ट्रवादी आघाडीवर

Abhijeet Shinde

कोल्हापूर : नरंदेत सोशल डिस्टनिंग पाळत घरगुती गणपती विसर्जनाला सुरुवात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!