तरुण भारत

दुसऱया महामारीसाठी तयारी आवश्यक : डब्ल्यूएचओ

पुढील धोका येण्यापूर्वीच आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्याची गरज केली व्यक्त

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नवा इशारा दिला आहे. लोकांनी दुसऱया महामारीसाठी तयार रहावे. लोकांनी पुढील महामारीपूर्वी आरोग्य सेवांमध्ये पैशांची गुंतवणूक करणे गरजेचे आहे, अन्यथा कोरोनासारखी स्थिती निर्माण होऊ शकते असे उद्गार संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम यांनी काढले आहेत.

Advertisements

जिनिव्हा येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला आहे. कोरोना महामारीमुळे जगभरात 2.71 कोटी लोक बाधित झाले असून 8.88 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना महामारीची भयावहता वाढत आहे, ही महामारी नियंत्रित करणे अनेक ठिकाणी अवघड ठरल्याचे टेड्रोस यांनी म्हटले आहे.

इतिहास अनेक महामारींचा साक्षीदार

कुठलीच महामारी अखेरची नसते, याचा इतिहास साक्षीदार राहिला आहे. हेच जीवनाचे सत्य असून हे संपुष्टात येणारे नाही. आता पुढील महामारी येण्यापूर्वीच आम्हाला त्यासाठी पूर्ण तयारी करावी लागणार असल्याचे टेड्रोस यांनी सांगितले आहे.

जूनपूर्वी लसीकरण अवघड

मोठय़ा प्रमाणावर कोरोनाच्या लसीकरणाची अपेक्षा पुढील वर्षाच्या जूनपर्यंत केली जाऊ शकत नाही. अद्याप जगभरात लसीच्या चाचण्या पूर्ण झालेल्या नाहीत, असे उद्गार जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या डॉ. मार्गारेट हॅरिस यांनी काढले आहेत. जगभरातील अनेक लसी क्लीनिकल ट्रायलच्या अंतिम टप्प्प्यात आहेत. यातील कुठलीही लस कोरोनाला रोखण्यात 50 टक्क्यांपर्यंतही प्रभावी ठरलेली नाही. महामारीच्या या काळात कुठल्याही लसीकडून किमान 50 टक्के प्रभावीपणाची अपेक्षा केली जात असल्याचे त्या म्हणाल्या.

तिसरा टप्प्या महत्त्वाचा

प्रत्येक लसीचा तिसरा टप्पा वेळखाऊ असतो. या टप्प्यानंतरच लस किती उपयुक्त आहे हे समजणार आहे. लस लाखो लोकांना देण्यात आली आहे, परंतु कुठली लस मापदंडांनुसार किती प्रभावी आहे हे अद्याप समोर आले नसल्याचे डॉ. हॅरिस यांनी सांगितले आहे.

लसीबद्दल भ्रम पसरविण्याचे कृत्य

ज्यो बिडेन आणि कमला हॅरिस यांनी अमेरिकन लसीबद्दल भ्रम पसरविल्याबद्दल माफी मागावी. बिडेन हे मूर्ख असल्याचे सर्वजण जाणतात. अमेरिकेत सर्वात कमी मृत्यूदर आहे, आम्ही विक्रमी वेळेत लसीचे उत्पादन सुरू करणार आहोत. आमच्या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करावी अशी बिडेन यांचीच इच्छा आहे. अमेरिकेने विषाणूसमोर शरणागती पत्करावी असे बिडेन यांना वाटत असल्याचा शाब्दिक हल्ला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चढविला आहे. कोरोनावरील लससंदर्भात आम्ही अत्यंत चांगले काम केले आहे. असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. याच कारणामुळे बिडेन आणि हॅरिस लसीसंबंधी भ्रम निर्माण करत असून निरर्थक विधाने करत आहेत. त्यांची ही कृती देशासाठी धोकादायक असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. लसीसंबंधी ट्रम्प यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याचे हॅरिस यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले होते. अमेरिकेत सुमारे 100 महाविद्यालयांमध्ये वेगाने संसर्ग फैलावला आहे. सत्र परीक्षेसाठी येथील वसतिगृहांमध्ये विद्यार्थी परतत असल्याने ही क्षेत्रे नवे हॉटस्पॉट्स ठरू लागली आहेत.

इस्रायल : उच्चांकी रुग्ण

इस्रायलमध्ये मागील 24 तासांमध्ये उच्चांकी 3,331 नवे रुग्ण सापडले आहेत. यापूर्वी 3 सप्टेंबर रोजी 2,991 नवे रुग्ण आढळले होते. देशात आतापर्यंत 1 लाख 33 हजार 975 बाधित सापडले असून 1,025 जणांचा मृत्यू ओढवला आहे. देशातील गंभीर रुग्णांची संख्या 470 झाली आहे.

न्यूझीलंडमध्ये संसर्ग

कोरोना विषाणूचा प्रकोप न्यूझीलंडमध्येही वाढत आहे. तेथे दिवसभरात 6 नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील रुग्णसंख्या 1 हजार 431 पर्यंत पोहोचली आहे. तर बळींचा आकडा 24 वर गेला आहे. न्यूझीलंडमध्ये सर्व सार्वजनिक परिवहन सेवेत मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

ब्राझील : 1.27 लाख बळी

ब्राझीलमध्ये कोरोना संसर्गाचे दिवसभरात 10 हजार 273 नवी प्रकरणे समोर आली असून 310 जणांचा बळी गेला आहे. देशात आतापर्यंत 41 लाख 47 हजार 794 बाधित सापडले आहेत. तर 1 लाख 27 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तेथे आठवडाभरात 6 हजार जणांना जीव गमवावा लागला आहे.

स्पेनमध्ये सर्वाधिक

कोरोना महामारीचे 5 लाखांहून अधिक रुग्ण असलेला स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला आहे. स्पेनमध्ये 5,25,549 रुग्ण सापडले असून 29,516 जणांचा मृत्यू ओढवला आहे. देशात दिवसभरात 2,440 नवे रुग्ण आढळले असून 32 जणांचा बळी गेला आहे. स्पेनमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

चीनकडून स्वतःचेच कौतुक

चीनने कोरोना महामारीवर पारदर्शक पद्धतीने काम करत जबाबदारीची भूमिका स्वीकारल्याचा दावा अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी केला आहे. जिनपिंग यांनी मंगळवारी महामारीदरम्यान उत्तम कार्य करणाऱया 4 डॉक्टरांना सन्मानित केले आहे.चीनने माहिती दडवून ठेवल्यानेच महामारी निर्माण झाल्याचा आरोप जगभरातून होत आहे. मागील 24 तासांमध्ये 15 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती चीनच्या आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली आहे. देशात 85 हजार 134 बाधित सापडले आहेत. यातील 80 हजार 335 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. अद्याप 175 लोक रुग्णालयात दाखल असून यातील 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.

एतिहादची घोषणा

अबू धाबीच्या एतिहाद एअरवेजने विमानात बाधित होणाऱया प्रवाशांचा वैद्यकीय तसेच विलगीकरणाचा खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. कंपनी 1.50 लाख युरोपर्यंत वैद्यकीय खर्च आणि विलगीकरण झाल्यास प्रतिदिनाच्या हिशेबाने 100 युरोपर्यंतचा खर्च उचलणार आहे.

युक्रेनमध्ये संकट तीव्र

युक्रेनमध्ये एका दिवसात महामारीमुळे तेथे 57 जणांना जीव गमवावा लागला आहे. यापूर्वी मागील आठवडय़ात एका दिवसात 54 जण दगावले होते अशी माहिती नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलने दिली आहे. कौन्सिलनुसार देशात आतापर्यंत 1,40,479 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Related Stories

‘या’ लसीबाबत संभ्रम कायम; अनेक देशात निर्बंध

datta jadhav

उलटय़ा डोक्यासह झाला होता जन्म

Patil_p

किचनचा पाईप दुरुस्त करण्यासाठी 4 लाखांची मागणी

Patil_p

कजाकस्तानात महागाईमुळे जनता संतप्त

Patil_p

इन्स्टाग्रामवरील फेमस किड, लाखोंची कमाई

Patil_p

अमेरिका : 1,561 बळी

Patil_p
error: Content is protected !!