तरुण भारत

स्मशानभूमीतल्या कोरोना योद्धय़ाला मृत्यूने कवटाळले

प्रतिनिधी / मिरज

ज्या हातांनी गेल्या महिनाभरात 88 हून अधिक कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार केले, ते महापालिकेचे कोरोना योद्धे, स्वच्छता निरीक्षक सुधीर तायाप्पा कांबळे (वय 48) यांना अखेर कोरोनानेच कवटाळले. ज्या स्मशानभूमीत त्यांनी दुसऱ्यांवर अंत्यसंस्कार केले, त्याच स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप देण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली. आंबेडकरी चळवळीतले अभ्यासू कार्यकर्ते म्हणून जिल्हाभर ओळख असणाऱ्या सुधीर कांबळे यांच्या मृत्यूमुळे महापालिका कर्मचाऱ्यासह नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य पंढरी मिरजेत दक्षिण महाराष्ट्रातील पहिले विशेष कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. यामध्ये दाखल झालेल्या कोरोना रुग्णांपैकी काही अत्यवस्थ रुग्णांचे मृत्यू होतात. मात्र, त्यांना नातेवाईकांच्याकडे न देता मिरजेतच पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात येतात. अंत्यसंस्काराची ही जबाबदारी महापालिकेकडे आहे. त्यासाठी दहा कर्मचाऱयांची एक टीम कार्यरत आहे. या टीमचे नेतृत्व स्वच्छता निरीक्षक सुधीर कांबळे यांच्याकडे होते.

गेली दोन महिने सलग कांबळे हे मृत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्काराचे काम करीत होते. गेल्या महिनाभरात रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दररोज दहाहून अधिक रुग्णांवर अंत्यसंस्कार करावे लागत होते. ही अवघड जबाबदारी सुधीर कांबळे यांनी पेलली होती. प्रत्यक्ष कोरोनाच्या युध्द भूमीवर उतरुन जीवाची पर्वा न करता त्यांनी तब्बल 88 हून अधिक मृत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार केले हेते. खऱया अर्थाने ते कोविड योद्धा या उपाधीला पात्र होते. मात्र, चार दिवसांपूर्वी त्यांनाच कोरोनाने कवटाळले आणि उपचार घेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या हातांनी पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार केले, त्या सुधीर कांबळे यांच्यावर याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली. त्यांच्या या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

राम मंदिर उभारणीसाठी बाणूरगड येथे कलश यात्रेचा शुभारंभ

Abhijeet Shinde

सांगली : तासगाव तालुक्यात 11 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

आमदार पडळकर यांचे राज्यभर घोंगडी बैठकांचे आयोजन

Abhijeet Shinde

जतमध्ये एक हजाराची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात

Abhijeet Shinde

सोलापूरकडे जाणाऱ्या तीन रेल्वे गाड्या बंद होणार

Abhijeet Shinde

चंद्रकांत पाटील हल्ली झोपेतही बोलतात; त्यांना मनावर घेऊ नका – जयंत पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!