तरुण भारत

अझारेन्का, पिरोन्कोव्हा, सेरेना उपांत्यपूर्व फेरीत

अमेरिकन ओपन टेनिस : थिएम, मेदवेदेव्ह, डी मिनॉरचीही आगेकूच, केनिन, साकेरी, टायफो पराभूत 

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

ऑस्ट्रियाचा द्वितीय मानांकित डॉमिनिक थिएम, बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेन्का, अमेरिकेची सेरेना विल्यम्स, त्स्वेताना पिरोन्कोव्हा, एलिस मर्टेन्स, डॅनील मेदवेदेव्ह, ऍलेक्स डी मिनॉर यांनी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली तर मारिया साकेरी, ऍलिझ कॉर्नेट, व्हॅसेक पॉस्पिसिल, द्वितीय मानांकित सोफिया केनिन, फ्रान्सेस टायफो यांचे आव्हान संपुष्टात आले.

थिएमने शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविताना कॅनडाच्या 15 व्या मानांकित फेलिक्स ऑगर ऍलियासिमेचा सुमारे दोन तासांच्या खेळात 7-6 (7-4), 6-1, 6-1 असा पराभव केला. त्याची पुढील लढत 21 व्या मानांकित ऍलेक्स डी मिनॉरशी होणार आहे. ऍलेक्सने कॅनडाच्या बिगरमानांकित व्हॅसेक पॉस्पिसिलला 7-6 (8-6), 6-3, 6-2 असा पराभवाचा धक्का दिला. ही लढत सव्वादोन तास रंगली होती. रशियाच्या मेदवेदेव्हच्या पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याच्या आशा बळावल्या असून त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठताना टायफोचा 6-4, 6-1, 6-0 असा धुव्वा उडविला. तिसऱया मानांकित मेदवेदेव्हची पुढील लढत आपल्याच देशाच्या आंदेय रुबलेव्हशी होणार आहे. रुबलेव्हने सहाव्या मानांकित मॅटेव बेरेटिनीचा चार सेट्समध्ये पराभव केला. तीन वर्षात दुसऱयांदा त्याने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

महिलांमध्ये बेलारुसच्या बिगरमानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काने आगेकूच करताना एक सेटची पिछाडी भरून काढत झेकच्या 20 व्या मानांकित कॅरोलिना मुचोव्हावर 5-7, 6-1, 6-4 अशी मात केली. बेल्जियमच्याच एलिस मर्टेन्सने या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या सोफिया केनिनचे आव्हान केवळ सव्वातासाच्या खेळात 6-3, 6-3 असे संपविले. मर्टेन्स व अझारेन्का यांच्यात पुढील लढत होईल. सेरेना विल्यम्सला मात्र ग्रीसच्या 15 व्या मानांकित साकेरीविरुद्ध विजय मिळविताना संघर्ष करावा लागला. सेरेनाने हा सामना 6-3, 6-7 (6-8), 6-3 असा जिंकला. बल्गेरियाच्या पिरोन्कोव्हाविरुद्ध तिची पुढील लढत होणार आहे. पिरोन्कोव्हाने फ्रान्सच्या ऍलिझ कॉर्नेटवर 6-4, 6-7 (5-7), 6-3 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.

बोपण्णाच्या पराभवाने भारताचे आव्हान संपुष्टात

अमेरिकन ओपन स्पर्धेतील भारताचे आव्हान रोहन बोपण्णाच्या पराभवाने संपुष्टात आले. कॅनडाच्या शॅपोव्हॅलोव्हसमवेत पुरुष दुहेरीत खेळणाऱया बोपण्णाला हॉलंडच्या जीन ज्युलियन रॉजेर व रोमानियाचा होरिया तेकॉ यांच्याकडून उपांत्यपूर्व फेरीत 5-7, 5-7 असा पराभव स्वीकारावा लागला. सुमारे दीड तास ही लढत रंगली होती. 2018 मध्ये बोपण्णाने अमेरिकन ओपन व पेंच ओपन या दोन्ही स्पर्धांत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतरची त्याची ही स्लॅममधील सर्वोत्तम कामगिरी आहे. दिविज शरण दुहेरीत व सुमित नागल एकेरीत याआधीच पराभूत झाले आहेत.

Related Stories

द. आफ्रिकन महिलांचा भारताविरुद्ध मालिकाविजय

Patil_p

फुटबॉलपटू फाँड्रे मुंबई सिटी क्लबशी करारबद्ध

Patil_p

कोरोनामुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा मृत्यू

prashant_c

माजी ऑलिंपिक धावपटू बॉबी मॉरो कालवश

Patil_p

मुष्टियोद्धा डिंको सिंग कोरोनातून मुक्त

Patil_p

स्टुटगार्ट स्पर्धेतून स्वायटेकची माघार

Patil_p
error: Content is protected !!