प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात मजूर गावी गेल्यामुळे इमारत बांधकामाचे काम रखडले होते. आता कामगार काही प्रमाणात कामावर रुजू झाल्यामुळे पुन्हा बांधकामाला सुरुवात झाली आहे. मुख्य इमारतीसोबतच दक्षिण बाजूला असणाऱया प्रवेशद्वाराचे काम प्रगतिपथावर आहे. रेल्वेचे अधिकारी या कामाची पाहणी करीत आहेत. लवकर हे काम पूर्ण व्हावे यासाठी रेल्वे विभाग प्रयत्नशील आहे.
ब्रिटिशकालीन असणारे बेळगावचे रेल्वेस्थानक नूतनीकरण करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रिपदी बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांची निवड झाल्यानंतर या कामाला गती मिळाली. विमानतळ टर्मिनलच्या धर्तीवर अत्याधुनिक सेवांसोबत हे टर्मिनल उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. 28 फेब्रुवारी 2019 ला नव्या बांधकामाच्या कोनशिलेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कामाला काही महिन्यांनी प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.
एकूण चार मजली अशी ही नवी इमारत बांधण्यात येणार आहे. चार हजार स्क्वेअर मीटर इतकी मोठी मुख्य इमारत बांधण्यात येत आहे. बांधकामाचे काम गतिमान असतानाच लॉकडाऊनमुळे कामगार आपापल्या गावी निघून गेले होते. यामुळे काम रखडले होते. लॉकडाऊन हळूहळू उघडल्यानंतर कामगार पुन्हा कामावर रुजू झाले असून पुन्हा कामाला सुरुवात झाली आहे.
मुहूर्त टळणार
नोव्हेंबर 2020 पर्यंत नव्या इमारतीच्या बांधकामाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱयांनी व्यक्त केला होता. परंतु कोरोनामुळे हा मुहूर्त टळणार आहे. लॉकडाऊनमध्ये काम ठप्प असल्यामुळे मार्च 2021 पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. कामाची गती वाढविल्यास मार्चपर्यंत काम पूर्ण होणे शक्मय आहे. अन्यथा यापुढेही कालावधी लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दक्षिण प्रवेशद्वाराचे काम प्रगतिपथावर
यापूर्वी रेल्वेस्थानकाला उत्तर बाजूने एकच दरवाजा होता. यामुळे दक्षिण भागातील नागरिकांना अडचणीचे ठरत होते. यासाठी रेल्वे विभागाच्या दक्षिण दिशेलाही प्रवेशद्वार बांधकामाला सुरुवात केली आहे. या दक्षिण बाजूच्या दरवाजाचे काम प्रगतिपथावर असून काँक्रिटीकरण करण्यात येत आहे.