तरुण भारत

सहज उपलब्ध ‘विनामूल्य’-तेच सर्वाधिक ‘अमूल्य’

‘व्हॉट्सअप’ या समाज माध्यमावर नैतिकतेचे धडे देणाऱया अनेक लघुकथा फिरत असतात. अशीच एक कथा काही दिवसांपूर्वी वाचनात आली. ‘पन्नाशीतील एक गृहस्थ आयुष्यात पहिल्यांदाच रुग्णालयात दाखल होतो. पाच-सहा दिवसांनी उपचार पूर्ण झाल्यावर त्याला घरी सोडण्याचा निर्णय होतो. रुग्णालयाकडून त्याला उपचारांचा खर्च भरण्यासाठी सांगितले जाते. रुग्णालयाकडून दिलेले बिल पाहून रुग्ण अवाक् होतो. ‘ऑक्सिजन’ सोडल्यास इतर कोणतेही मोठे उपचार त्याच्यावर केले गेलेले नव्हते. केवळ ऑक्सिजनसाठी त्याला काही लाख मोजावे लागले. त्याने विचार केला की पाच दिवसांच्या प्राणवायूकरिता मी रुग्णालयात लाखो रु. भरत आहे. निसर्ग इतकी वर्षे मला प्राणवायू मोफत पुरवीत आहे, त्या निसर्गाचे मी किती मोठे देणे लागतो.’ ही छोटीशी कथा शुद्ध हवेचे महत्त्व सांगून जाते. ‘पर्यावरण आणि आरोग्य’ हा विषय ‘निळय़ा आकाशासाठी शुद्ध हवा’ या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्ताने जाणून घेऊया. 7 सप्टेंबर 2020 रोजी पहिल्यांदाच हा दिवस साजरा झाला. 19 डिसेंबर 2019 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये या विषयाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. आरोग्य, उत्पादकता, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसाठी शुद्ध हवेचे महत्त्व, शाश्वत विकासाची ध्येये व पर्यावरण बदलांमधील परस्परसंबंध लोकांपर्यंत पोचवणे आणि नाविन्यपूर्ण-यशस्वी काम करून, हवेतील प्रदूषण कमी करून दाखवणाऱया प्रयोगांना प्रोत्साहन देणे, ही प्रमुख उद्दिष्टे हा दिवस साजरा करण्यामागे ठरवली गेली आहेत.   

सर्वांधिक प्रदूषित शहरे असणाऱया देशांच्या यादीमध्ये, जगभरात भारताचा नंबर पहिला लागतो. राष्ट्रीय वायु गुणवत्ता मानकांचे लक्ष्य गाठू न शकणारी 102 शहरे भारतात आहेत. महाराष्ट्र हवा प्रदूषणामध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले राज्य आहे. हवेतील प्रदूषणामध्ये औद्योगिकीकरणाइतकाच वाटा, स्वयंचलित वाहनांचा आहे. याची साक्ष महाराष्ट्रातील अठरा शहरे देत आहेत, जी पर्यावरणाच्या दृष्टीने आज जीवनरक्षण प्रणालीवर आहेत. वाहनांमध्ये मुख्यत: जीवाश्म इंधन वापरले जाते. याच्या धुरामधून नायट्रोजन, सल्फर, कार्बन यासारखे हानिकारक वायु हवेत मिसळून हवा अशुद्ध करीत आहेत. परिणामी हवेत तरंगणाऱया धुलीकरणांच्या प्रमाणातही वाढ होताना दिसून येते. वाहनांच्या धुरातून बाहेर पडणारा अल्ट्राफिनसारखा घटक रक्तप्रवाहात बाधा निर्माण करतो. ‘सल्फर’ वायु श्वसनदाह, दमा, ब्राँकॉयटिससारख्या आजारांना निमंत्रण देत असतो. नायट्रोजनमुळे श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम होतात. कार्बन मोनोक्साईड रक्तातील हिमोग्लोबिनबरोबर मिसळतो आणि रक्ताची प्राणवायु वहन करण्याची क्षमता कमी करतो.

Advertisements

हवेमधील प्रदूषण अधिक असलेल्या शहरांमधील नागरिकांमध्ये रक्तदाबाचा आजार मोठय़ा संख्येने आढळतो. वाहने, कारखाने, ऊर्जा प्रकल्प इत्यादींमार्फत उत्सर्जित होणारे सूक्ष्म कण रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरतात. अशा प्रकारची रक्तदाब वाढ ही पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक असलेली दिसून येते. वाढलेल्या रक्तदाबामुळे ‘एथेरोस्क्लेरोसिस’ (धमणीकाठिण्य) आजाराची सुरुवात होते. वसा, कोलेस्ट्रोल, कॅल्शयिम आणि रक्तात आढळणाऱया अन्य घटकांमुळे धमन्यांमध्ये एक प्रकारचा थर (प्लाक) जमा होऊ लागतो. त्यामुळे धमन्या आकुंचन पावतात. कठीण झालेल्या धमन्यांमधून प्राणवायुयुक्त रक्त हृदयापर्यंत पोचवण्यात अडथळे निर्माण होतात. परिणामी हृदयघात आणि मस्तिष्क आघातासारख्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. यामध्ये मृत्यु होण्याची शक्यताही अधिक असते. म्हणून ज्यांना हृदयाचे काही आजार आहेत, त्यांना अशुद्ध हवेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.

अशुद्ध हवेत सराव करणाऱया खेळाडूंमध्ये फुफ्फुसांपेक्षा हृदयविकाराचे प्रमाण अधिक असल्याचे निष्कर्ष लॉस एन्जल्समधील हार्ट इन्स्टिटयूट ऑफ दि गुड समेरिटन हॉस्पिटल आणि सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी काढले आहेत. अशुद्ध हवेतील घटक शरीरातील सुपरऑक्सिडाईज्ड रेणुंची वाढ करण्यास कारणीभूत असतात. ज्यामुळे शरीरातील उपयुक्त पेशींचा नाश होऊन फुफ्फुसांना सूज येते. परिणामी रक्तवाहिन्या आणि हृदयाला हानी पोचते. लहान मुलांच्या फुफ्फुसांची वाढ पूर्ण झाली नसल्याने दूषित हवेमुळे त्यांच्या फुफ्फुसांना अधिक धोका असतो.

अशुद्ध हवेचे दुष्परिणाम केवळ शारीरिक आरोग्यावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशुद्ध हवेमुळे मनुष्याच्या स्मरणशक्तीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, मनुष्य अधिकाधिक नैराश्याकडे झुकण्याची शक्मयता वाढते, असे अथेन्समधील विद्यापीठाच्या संशोधनात म्हटले आहे. शहरी भागात प्रदूषित हवेमुळे त्वचेवरील पुरळ, लाल चट्टे, खाज यासारखे त्वचाविकारही वाढलेले दिसून येतात. ग्रामीण भागात अन्न शिजवण्यासाठी आजही जळण, सरपण यांचा वापर केला जातो. या धुरामुळे डोळय़ांचे, फुफ्फुसांचे आरोग्य धोक्यात येते. ‘उज्ज्वला’ योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना, चुलीच्या धुरामुळे होणाऱया आजारांपासून मुक्तता मिळत आहे, ही एक सकारात्मक बाब आहे.

राजधानी दिल्लीत गेल्या काही वर्षांत हिवाळय़ात ‘स्मॉग’ची समस्या पहायला मिळत आहे. धुके आणि प्रदूषित हवेच्या मिश्रणामुळे ‘स्मॉग’ची समस्या निर्माण होते. लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो. ‘स्मॉग’च्या परिस्थितीत श्वास घेणे हे 44 सिगारेट पिण्याइतके घातक मानले जाते. दिल्ली सरकारने सम-विषम वाहतूक, फटक्मयांवरील बंदी, पंधरा वर्षांवरील गाडय़ांवर बंदी आदी उपाययोजना प्रदूषण कमी करण्यासाठी अमलात आणून पाहिल्या आहेत.

हवेतील प्रदूषण आणि तापमान वाढ हे जगापुढील मोठे आव्हान राहणार आहे, असा इशारा एकीकडे जागतिक आरोग्य संघटना आणि ‘लैन्सेट’ या विख्यात वैद्यकीय शोधपत्रिकेने दिला आहे. दुसरीकडे भविष्यात येणाऱया महामारींसाठी सज्ज राहण्याविषयी जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगितले जात आहे. ‘कोविड-19’ मुळे निरोगी फुफ्फुसांचे महत्त्व आपण खूप जवळून अनुभवत आहोत. जो प्राणवायु निसर्गाने आपल्याला विनामूल्य दिला आहे, त्याचे संवर्धन करून आपण त्याच्याविषयी कृतज्ञ राहणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. विनाकारण गर्दी टाळणे हे आपण आज कोरोनाच्या निमित्ताने शिकलो आहोत. पर्यायाने रस्त्यावरील वाहन संख्येवरही नियंत्रण आले आहे. पर्यावरणावर झालेले सकारात्मक बदल आपण नद्यांमधील शुद्ध पाणी, दूरवरून दिसणाऱया हिमालयाच्या रांगांच्या निमित्ताने अनुभवलेले आहे. हे आचरण कायम राहिले तर निसर्गही मोकळा श्वास घेऊ शकेल.

Related Stories

मराठा ओबीसीकरण

Patil_p

जबाबदारी आणि पटेल!

Omkar B

‘आत्मनिर्भर गोवा’साठी चला खेडय़ांकडे

Omkar B

मज फूलही रुतावे…

Patil_p

कृषी व्यवस्थेच्या विकासाचे प्रारुप

Patil_p

अशक्त भारत

Omkar B
error: Content is protected !!