तरुण भारत

कराडला कोरोना रूग्णांच्या बेडचा गोलमाल?

सतीश चव्हाण /कराड :

कराड तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू असून बेड शिल्लक नसल्याने अनेक रूग्णांनी हॉस्पिटलच्या बाहेर तडफडून जीव सोडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. कराडला कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी एकुण 829 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तर 672  रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. मग इतर रूग्णांना सहज बेड का उपलब्ध होत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे कराड तालुक्यातील केवळ 492 रूग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत. मग कोरोना रूग्णांसाठी असलेल्या बेडचा गोलमाल सुरू आहे का? असा सवाल तालुक्यातील जनता उपस्थित करीत आहे.

Advertisements

कोरोना संकटाने लोकांत कोरोनाविषयी भीतीचे वातावरण आहे. त्याहुनही अधिक भीती कोरोना झाल्यानंतर बेड मिळत नाही, याची आहे. बडय़ा, राजकीय व पैसेवाल्या लोकांना बेड उपलब्ध होत आहेत. मात्र सर्वसामान्य व गोरगरिबांची आवस्था वाईट आहे. अनेक लोक उपचाराविना मरत आहेत. तर काही लोकांना वेळेत उपचार मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे.

    तालुक्यातील केवळ 492 रूग्ण हॉस्पिटलमध्ये

तालुका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारअखेर कराड तालुक्यात एकुण 4627 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यातील 3372 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 82 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर एकुण 1173 रूग्ण उपचारात आहेत. यातील लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेले 114 रूग्ण पार्लेच्या कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तर 567 रूग्ण होमआयसोलेशन मध्ये असून ते घरीच उपचार घेत आहेत. म्हणजेच तालुक्यातील एकुण 1173 उपचारात असलेल्या रूग्णांपैकी केवळ 492 रूग्ण प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

       बेडची क्षमता 829 व दाखल रूग्ण 672

कराडला कृष्णा हॉस्पिटल-500, सहय़ाद्री हॉस्पिटल-100, एरम हॉस्पिटल-61, श्री हॉस्पिटल-43, कराड हॉस्पिटल-45, उपजिल्हा रूग्णालय 55 व राजस्थान कोव्हिड सेंटर-25 अशा सात हॉस्पिटलमध्ये एकुण 829 बेडची सोय करण्यात आली आहे. प्रांत उत्तम दिघे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी 10 वाजेपर्यंत कृष्णा हॉस्पिटल-402, सहय़ाद्री हॉस्पिटल-96, श्री हॉस्पिटल-43, कराड हॉस्पिटल-43, एरम हॉस्पिटल-41, उपजिल्हा रूग्णालय-30, राजस्थान कोव्हिड सेंटर-17 असे एकुण 672 रूग्ण दाखल आहेत. या 672 पैकी 57 रूग्ण बाहेरच्या तालुक्यातील आहेत. तर 615 रूग्ण कराड तालुक्यातील असल्याचे त्यांनी सांगीतले.

    कोरोनापेक्षाही उपचार मिळवणे महाभयंकर

मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. कराड तालुका हा सुरूवातीपासूनच कोरानाचा हॉटस्पॉट ठरला आहे. मग प्रशासन एवढे सुस्त का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कराडला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली व उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. मात्र सुधारणा होण्याऐवजी परिस्थिती अधिकच बिघडल्याचे पहावयास मिळत आहे. रूग्णांना दाखल करण्यासाठी बेड मिळत नसल्याने नातेवाईकांना बेडसाठी वणवण हिंडावे लागत आहे. तालुक्यातील अनेक रूग्णांना सातारा, कोल्हापूर, इस्लामपूर, पुणे आदी ठिकाणी उपचारासाठी न्यावे लागत आहे. शहरास ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्ते, संस्थांनी पुढाकार घेऊन ऑक्सिजन चळवळ सुरू केली आहे. कार्यकर्ते घरी जाऊन रूग्णाला पोर्टेबल मशिनने ऑक्सिजन पुरवत आहेत. प्रशासनाने जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहु नये. सध्यस्थितीत प्रशासन व सरकारच जनतेचे मायबाप आहे. कोरोना संकटामुळे जनतेला होत असलेला त्रास कमी व्हावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

  लोकांची फरफट थांबवा

कोरोना बाधित रूग्णांसाठी बेड मिळवण्याचे काम लोकांना लागले आहे. अनेक लोक यासाठी धावाधाव करताना दिसत आहेत. रूग्णालयात चौकशी केली असता बेड मिळत नाहीत. डिस्चार्ज झाले तरी बेड मिळत नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रोज येणारे बाधितांचे आकडे व त्यांना बेडची उपलब्धता या साठी केंद्रीत सुविधा सुरू करण्याची मागणी केली आहे. बाधितांना बेडची उपलब्धता प्रशासनाने करून दिली पाहिजे. तेव्हाच लोकांची फरफट थांबणार आहे.

Related Stories

जिल्हय़ात विविध ठिकाणी अवैध दारु अड्डय़ांवर छापे

Patil_p

यवतमाळ : दारूची तल्लफ भागवण्यासाठी सॅनिटायझरचे प्राशन; 7 जणांचा मृत्यू

Rohan_P

मोठा दिलासा : महाराष्ट्रात मागील 24 तासात 48,211 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

बेजबाबदार नागरिकांवर कारवाईसाठी पालिकाही रस्त्यावर

Abhijeet Shinde

सातारा : बिलोलीतील मूकबधिर युवतीवरील अत्याचाराचा निषेध

datta jadhav

बनावट नोटा प्रकरणी आणखी दोघे गजाआड; कराड पोलिसांची कारवाई

Abhijeet Shinde
error: Content is protected !!