तरुण भारत

अझारेन्का, सेरेना विल्यम्स, थिएम, मेदवेदेव्ह उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था /न्यूयॉर्क :

बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेन्का व अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांनी अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. पुरुष एकेरीत ऑस्ट्रियाचा द्वितीय मानांकिन डॉमिनिक थिएम व रशियाचा डॅनील मेदवेदेव्ह यांनी शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले आहे तर एलिस मर्टेन्स, त्स्वेताना पिरोन्कोव्हा, ऍलेक्स डी मिनॉर, आंद्रेय रुबलेव्ह यांचे आव्हान समाप्त झाले.

अझारेन्काने बेल्जियमच्या सोळाव्या मानांकित एलिस मर्टेन्सवर पूर्ण वर्चस्व राखत 6-1, 6-0 असा एकतर्फी धुव्वा उडविला. या दोघींची पहिल्यांदाच गाठ पडली होती. चार वर्षाच्या खंडानंतर अझारेन्काने गेल्या महिन्यात पहिले जेतेपद पटकावताना वेस्टर्न अँड सदर्न ओपन टेनिस स्पर्धा जिंकली होती. 2013 नंतर पहिल्यांदाच ती ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी पार करण्यात यशस्वी ठरली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी तिला आता बलाढय़ सेरेना विल्यम्सचा अडथळा पार करावा लागणार आहे. याच स्पर्धेत 2012 व 2013 च्या अंतिम फेरीत सेरेनाने अझारेन्काला हरविले होते. सेरेनाचे तिच्याविरुद्धचे रेकॉर्ड 18-4 असे खूप सरस आहे.

सेरेनाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी थोडा संघर्ष करावा लागला. बल्गेरियाच्या बिगरमानांकित त्स्वेताना पिरोन्कोव्हावर मात करताना तिने 4-6, 6-3, 6-2 असा दोन तासांत विजय मिळविला. सलग 11 व्या वेळी सेरेनाने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली असून 24 वे ग्रँडस्लॅम मिळविण्यासाठी सेरेनाला आता आणखी दोनच सामने जिंकावे लागणार आहेत. 39 वर्षीय सेरेनाने याआधी सहावेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे.

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत डॉमिनिक थिएमने ऑस्ट्रेलियाच्या 21 व्या मानांकित ऍलेक्स डी मिनॉरचे स्वप्न धुळीस मिळविताना 6-1, 6-2, 6-4 असा सरळ सेट्सनी धुव्वा उडविला. दोन तासाच्या खेळात त्याने हा विजय साकार केला. त्याची उपांत्य लढत रशियाच्या तिसऱया मानांकित डॅनील मेदवेदेव्हशी होणार आहे. मागील वर्षीचा उपविजेता असलेल्या मेदवेदेव्हने आपल्या मित्राचा म्हणजे दहाव्या मानांकित आंद्रेय रुबलेव्हचा 7-6 (8-6), 6-3, 7-6 (7-5) असा पराभव केला. शुक्रवारी उपांत्य फेरीचे सामने होणार असून दुसरी उपांत्य लढत जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह व स्पेनचा पाब्लो कॅरेनो बुस्टा यांच्यात होणार आहे.

Related Stories

भारतीय युवा संघाची विजयी सलामी

Patil_p

सेरेना, वोझ्नियाकी शेवटच्या चार खेळाडूत

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत गोलंदाजच निर्णायक ठरतील

Patil_p

मधल्या फळीत खेळण्याची अजिंक्य रहाणेची तयारी

Patil_p

डेक्कन चार्जर्सला 4800 कोटी रुपये देण्याचा बीसीसीआयला आदेश

Patil_p

रोहन बोपण्णाची महत्त्वाकांक्षी स्कॉलरशिप योजना

Patil_p
error: Content is protected !!