तरुण भारत

सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका..!

राजू भिकारो नाईक/पणजी :

अमेरिकेतील शिकागोत 11 सप्टेंबर 1893 रोजी झालेली जागतिक धर्मपरिषद स्वामी विवेकानंदांमुळे ऐतिहासिक ठरली. भाषणाच्या सुरुवातीलाच उपस्थितांना ‘सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका’ संबोधल्यापासून ते परिषदेच्या समारोपापर्यंत परिषदेवर स्वामींचाच अमिट ठसा उमटला. केवळ भगिनीनो आणि बंधुनो म्हटले म्हणून काय कोणी सभा गाजवितो? हा प्रश्न आज कुण्या अज्ञानीला पडू शकेल, मात्र त्यावेळी त्या दोनच शब्दांमुळे स्वामींना अवघ्या विश्वाने खांद्यांवर घेतले, कारण स्वामींच्यापूर्वी कोणीच पाश्चात्यांनी असे संबोधन केले नव्हते. त्यांना ते माहितही नव्हते, त्यामुळे स्वामेचे दोन शब्दांतील हे संबोधन जागतिक स्तरावर ऐतिहासिक ठरले.

या धर्मपरिषदेपूर्वी अनेक धर्मपरिषदा जगात झाल्या होत्या. मात्र एका हिंदू सन्याशाला प्रथमच याच परिषदेत सहभागी करुन घेण्यात आल्याने परिषद अधिक चर्चेत होती. त्यात स्वामींनी हिंदू सनातन तत्वज्ञानाचे महात्म्य अवघ्या विश्वाला सांगितल्याने ती अधिक प्रकाशझोतात आली.

ऐतिहासिक भाषणाची आज 127 वर्षे पूर्ण

केवळ एकाच भाषणासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या स्वामींना नंतर परिषदेत सहा भाषणे करण्याची संधी देण्यात आली. स्वामींनी जगाला समजावून सांगितलेले भारतीय सनातन तत्वज्ञान जगाने उत्स्फूर्तपणे उचलून धरले होते. त्या जगचर्चीत संबोधनाला आज 11 सप्टेंबर 2020 रोजी 127 वर्षे पूर्ण होत आहेत.

तोच दिवस ठरला जागतिक विश्वबंधुत्व दिवस

वसुधैव कुटुंबकम मानणाऱया भारतीय प्राचीन तत्वज्ञान परंपरेचा महिमा सांगून विश्वबंधुत्वाचा संदेश विश्वसमुदायाला दिला. त्यामुळे 11 सप्टेंबर हा ‘विश्वबंधुत्व दिवस’ साजरा केला जातो. भारतासह अमेरिका, जपान, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, मलेशिया, म्यानमार, रशिया, स्वीत्झरलँड, आफ्रिका, इटली अशा देशांसह 142 हून अधिक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जात आहे.

सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका…

स्वामीजींच्या या एकाच संबोधनाने अवघ्या विश्वाला दीपवून टाकणारे स्वामींचे ते संबोधन खूप चैतन्यदायी आणि भारतीयांना गौरवान्वित करणारे होते. त्या मूळ इंग्रजी भाषणाचा हा मराठी अनुवाद प्रत्येक भारतीच्या ह्य्दयाला भिडणारा आहे. “अमेरिकेतील माझ्या भगिनीनो आणि बंधुनो, आज आपण सर्वांनी याठिकाणी आमचं अगत्त्यानं स्वागत केलं. शब्द सूचत नाहीत, ह्य्दय अवर्णनीय आनंदानं भरुन आलंय. जगातील सर्वांत प्राचीन अशा संन्याशीधर्मातर्फे आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. अवघ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व वर्णांच्या… सर्व संप्रदायांच्या… कोटी कोटी हिंदू नरनारींच्यावतीनं आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो.

आम्ही सर्व धर्माना समान मानतो

आम्हाला अशा धर्माचा अभिमान वाटतो ज्या धर्मानं अखिल विश्वाला सहिष्णुता आणि सहजीवनाची… विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. आम्ही सर्व धर्माना समान मानतो. आम्हाला आमच्या राष्ट्राचा अभिमान वाटतो कारण, त्यानं जगाच्या कानाकोपऱयातून आलेल्या सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेतलं आहे. आमच्या हिंदुस्थानात लक्षावधी नरनारी ज्या स्तोत्राचं प्रतिदिन पारायण करतात ते आम्ही बालपणापासून करत आलोय.

रुचीनां वैचित्र्यात् ऋजुकुटील नानापथजुषाम्,

नृणाम् एको गम्य त्वमसि पयसाम् अर्णव इव…

भिन्न भिन्न उगमांतून निघणारे सर्व जलप्रवाह ज्याप्रमाणं अंती सागरालाच जाऊन मिळतात त्याचप्रमाणं रुचिवैचित्र्यानुसार भिन्न भिन्न मार्गानं जाणारे सारे पांथिक, अंती प्रभूलाच जाऊन मिळतात. अशी अशी दिव्य शिकवणूक देतो आमचा सत्य सनातन हिंदू धर्म. (यावेळी टाळय़ांचा कडकडाट झाला.) परंतु आज अखिल विश्वात धर्माधर्मात जे वितंडवाद माजले आहेत, ते आम्हाला विनाशाकडेच घेऊन जाणार आहेत हे लक्षात ठेवा.

कुपमंडूक बेडकं झालोय आपण सर्वजण

कुपमंडूक बेडकं झालोय आपण सर्वजण… विहिरीत राहणारी बेडकं आपण… समुद्र काय असतो ते कसं कळणार? ख्रिश्चन धर्मीय स्वतःच्या लहानशा विहिरीत बसून तिलाच सारं जग समजतात. मुसलमानही तसाच छोटय़ाशा विहिरीत बसून तिलाच जग समजतो. त्यातूनच निर्माण होते संकुचित धर्मभावना. या संकुचित धर्मभावनेतून जन्म घेते धर्मांधता. या सुंदर वसुंधरेवर दीर्घकाल हाहाकार माजविला या धर्मांधतेनं. अगणित वेळा रक्ताचा सडा शिंपला. राष्ट्रांच्या राष्ट्रे उद्ध्वस्त झाली. असे हे क्रूर धर्मवेडे नसते तर आज हा मानवसमाज किती प्रगत झाला असता. परंतु आता त्यांची घटका भरली. या धर्मपरिषदेच्या शुभारंभी निनादीत झालेला घंटानाद म्हणजे मृत्यूघंटाच आहे या धर्मवेडय़ांची! (पुन्हा तब्बल दीड मिनिटभर टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला.)

अखिल विश्वात सर्वात पुरातन धर्म म्हणजे हिंदू धर्म, ऋषीमुनींनी सत्याचे प्रयोग करून वेद उपनिषदांमधून हा धर्म सांगितला. आज आम्हाला सांगायला आनंद वाटतोय की या पवित्र कार्यात स्त्रीयांचेही फार मोठ योगदान आहे. स्त्री ही आधीशक्ती… सृजन… सृष्टी…आणि संस्कृती. असा हा अथांग विशाल महासागर म्हणजे हिंदूधर्म. सर्व धर्मीय… सर्वपंथीय लोकांना आपल्यामध्ये सामावून घेणारे आम्ही हिंदूस्थानी म्हणून आज आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी एक दिव्य संदेश…

 शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रा…

 आ ये धामानि दिव्यानि तस्थु…

हे अमृताच्या पुत्रानो, हे दिव्यधामवासी देवांना, तुम्ही सर्वजण श्रवण करा. अमृताचे पुत्र… होय अमृताचे पुत्र आहात तुम्ही बंधुनो, सिंहस्वरूप असूनही तुम्ही असे स्वत:ला मेषतुल्य का समजता? उठा… मृगराजानो… उठा आपण मेंढरे आहोत हा वृथा भ्रम झाडून टाका (पुन्हा टाळय़ांचा कडकडाट झाला)

 हा धार्मिक दहशतवाद तुमच्यावरच उलटणार

 आम्ही हिंदू लोक सहिष्णू… संयमी दुसऱयांवर कधी आक्रमण केले नाही आम्ही. आणि हिंदूचा आत्मा वाचवण्यासाठी हिंदूस्थानात धर्मप्रचारक पाठवणारे तुम्ही. आत्मा वाचवण्यापेक्षा उपासमारीपासून हिंदुचा जीव का नाही वाचवत? हिंदूस्थानात भयंकर दुष्काळ पडून हजारो लोक तडफडून मृत्यूमुखी पडतात. अशावेळेस साऱया हिंदूस्थानावर चर्च बांधण्यात तुम्ही गुंतले आहात. हिंदूस्थानाची निकडीची आवश्यकता धर्म नव्हे… धर्म त्यांच्यापाशी भरपूर आहे. ते अन्नासाठी शुष्ककंठानं टाहो फोडीत.. आपल्यासमोर हात पसरत आहेत… आणि तुम्ही… तुम्ही त्यांच्या हातावर दगड ठेवता…? गळय़ात क्रॉस घालता? पण आम्ही आजच 11 सप्टेंबर 1893 रोजी तुम्हाला बजावून ठेवतो… एक ना एक दिवस हा धार्मिक दहशतवाद तुमच्यावर उलटल्याशिवाय नाही रहणार.

 चांगल्या गुणांचा मक्ता जगातील कुण्या एका विशिष्ट धर्माकडे नाही. सर्व धर्मांमध्ये उदात्त विचार… उदात्त चारित्र्याच्या नरनारींचा जन्म झाला. एवढी जाणीव असूनही जर कोणी आपलाच धर्म जीवंत राहून अन्य धर्म नष्ट होतील असे मनोराज्य कोणी रचत असेल तर त्याची किवच करायला हवी. आजच बजावतो, भविष्यात धर्माधर्माच्या ध्वजांवर लिहिलं. जाईल… संघर्ष नको… परस्परांना सहकार्य करा. विनाश नको… कलह नको, मैत्री हवी. शांती हवी वसुधैव कुटुंबकम्…. अवघं विश्व तुमचं कुटुंब माना… उठा.. जागे व्हा आमचा संदेश स्वीकारा… उठा.. जागे व्हा !

Related Stories

राज्यातील भाजपचे सरकार दिशाहीन

Patil_p

कोरोना रुग्णांचा आकडा 490

Omkar B

स्वप्नीलचा मुस्तफाशी परिचय होता का?

Patil_p

प्राचार्य संध्या नाईक यांचे निधन

Patil_p

लोकप्रतिनिधींनी लोकहितासाठी वावरावे

Patil_p

राजीव कला मंदिरच्या ऐतिहासिक नाटय़ स्पर्धेत नागेशी-बांदोडाचे ‘स्वामी’ प्रथम

Amit Kulkarni
error: Content is protected !!