तरुण भारत

चौपदरीकरणास पुढील डिसेंबरची डेडलाईन!

राजेंद्र शिंदे/ चिपळूण

कोरोना संसर्गामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील कंत्राटदार कंपन्यांना 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटदार कंपन्यांना महामार्गाचे काम पुर्ण करण्यासाठी डिसेंबर 2021 ची डेडलाईन मिळाली आहे.  सहापदरी वाशिष्ठी पूलाचा दोन पदरी भाग जानेवारीपर्यंत पूर्ण करून वाहतूक सुरू केली जाणार असून सर्व पुलांची कामे जूनपर्यंत पुर्ण केली जाणार आहेत.  कंत्राटदार कंपन्याही बदलण्यात आल्याने 1 ऑक्टोबरपासून चौपदरीकरणाची कामे वेगवान होणार असल्याची माहिती ‘महामार्ग’च्या सूत्रांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.

  चौपदरीकरणाचे काम वेगाने होण्यासाठी जिल्हय़ात कशेडी ते खारेपाटणपर्यंत वेगवेगळे टप्पे पाडून त्यासाठी वेगवेगळय़ा बांधकाम कंत्राटदार कंपन्या नियुक्त करण्यात आल्या. मात्र राजापूर आणि खेडचा टप्पा वगळता अन्यत्र काम रखडले आहे. जिल्हय़ात चौपदरीकरणाच्या कामाला चिपळूण टप्प्यात प्रथम प्रारंभ झाला. परशुराम ते खेरशेत या 36 कि. मी.मध्ये चार वर्षात अवघे 28 टक्केच काम झाले आहे, तर आरवली ते बावनदी हा टप्पा पूर्णपणे रखडला आहे. आता चिपळूण, संगमेश्वर टप्प्यात कंत्राटदार कंपन्या बदलल्या आहेत. चिपळुणात चेतकचीच भागीदार असलेल्या ईगल इन्फ्रा, तर संगमेश्वरमध्ये ए. बी. कन्ट्रक्शन या कंपन्या काम करणार आहेत.

सहा महिन्यांची मुदतवाढ

 यावर्षीच्या सुरूवातीला कोरोना संसर्गाचा फटका चौपदरीकरण कामाला बसल्याने रस्ते विकास मंत्रालयाने चौपदरीकरणाच्या कामांना 6 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी पुढील वर्षी डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. चौपदरीकरणासह महामार्गावरील मोठय़ा पुलांची कामेही 2 वर्षापासून अर्धवट आहेत. संगमेश्वरमधील शास्त्री, कोळंबे, सप्तलिंगी तर लांजातील आंजणारी हे तीनही पूल जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्णत्वास नेण्यासाठी कंत्राटदारांना मुदत देण्यात आली आहे.

पुढील चार महिने ‘वाशिष्ठी’वर दिवस-रात्र काम 

महामार्गावरील महत्वाच्या पुलांमध्ये अग्रभागी असलेल्या आणि गेल्या 2 वर्षापासून अर्धवट स्थितीत राहिलेल्या वाशिष्ठी पुलाचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. जानेवारीपर्यंत दोनपदरी पूल वाहतुकीस खुला करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या आठवडाभरात 50 कामगार दाखल होणार असून पुढील 4 महिने दिवस-रात्र या पुलाचे काम केले जाणार आहे. जानेवारीत वाहतूक सुरू होईल, या दृष्टीने ईगल इन्फ्रा या कंपनीने आपले नियोजन केले आहे.

उड्डाणपुलाचा शुभांरभही ऑक्टोबरमध्ये

 मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सर्वात मोठा उड्डाणपूल चिपळूणात बहादूरशेख नाका ते युनायटेड हायस्कूलपर्यंत होणार आहे. गेले वर्षभर त्या दृष्टीने सर्व्हीस रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. काही ठिकाणी गटारे आणि भिंत उभारणी करण्यात आली असली तरी गेल्या चार महिन्यांपासून ही कामेही थांबली आहेत. पुढील महिन्यात उड्डाणपुलाच्या कामाचाही शुभांरभ करण्याचे नियोजन सुरू आहे.

Related Stories

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सुधारित,अंतिम अंदाजपत्रक मंजूर

triratna

दापोली-पाळंदे समुद्रात 8 पर्यटक बुडाले

Patil_p

पॉझीटीव्ह गर्भवती महिलेला रूग्णालयात जाण्यास नकार

Patil_p

सहाही पॉझिटिव्ह रूग्ण बरे झाल्याने पाचल गाव तूर्त तरी कोरोनामुक्त

Patil_p

चिपळूणच्या शिरपेचात दोन मानाचे तुरे!

Patil_p

कशेडी घाटातील 730 मीटर अंतराचा भुयारी मार्ग पूर्णत्वास

Patil_p
error: Content is protected !!