तरुण भारत

थिएम बनला नवा ग्रँडस्लॅम विजेता

अमेरिकन ओपन टेनिस : झुंजार लढतीनंतर स्वप्नभंग झालेल्या व्हेरेव्हला उपविजेतेपद

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिएम हा अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचा नवा विजेता बनला आहे. रविवारी येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्याने दोन सेट्सनी पिछाडीवर पडल्यानंतरही जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हला हरवून विजेतेपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. त्याचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.

अतिशय रोमांचक ठरलेल्या अंतिम लढतीत दुसऱया मानांकित थिएमने पाचव्या मानांकित व्हेरेव्हवर 1-6, 4-6, 6-4, 6-3, 7-6 (8-6) अशी मात केली. चार तास दोन मिनिटे ही झुंज रंगली होती. पहिले दोन सेट्स गमविल्यानंतरही जेतेपद पटकावणारा या स्पर्धेच्या ओपन इरा इतिहासातील थिएम हा पहिला खेळाडू बनला आहे. याशिवाय निर्णायक पाचवा सेट टायब्रेकरमध्ये होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘खरेतर आज आम्ही दोघेही विजेते आहोत, असे मला वाटते. कारण आम्ही दोघांनीही जेतेपदाच्या योग्यतेचा खेळ केला,’ अशा भावना जेतेपद मिळविल्यानंतर थिएमने व्यक्त केल्या.

यापूर्वी तीन वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी त्याने गाठली होती. पण जेतेपद पटकावण्यात त्याला यश आले नव्हते. या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तसेच 2018 व 2019 मध्ये पेंच ओपन स्पर्धेत त्याने उपविजेतेपद मिळविले आहे. 2014 मध्ये क्रोएशियाचा मारिन सिलिक नंतर नवा ग्रँडस्लॅम विजेता होणारा थिएम हा पहिला खेळाडू आहे. सिलिकने ही स्पर्धा 2014 मध्ये जिंकली होती त्यावेळी त्याचे ते पहिलेच जेतेपद होते. तसेच फेडरर, नदाल, जोकोविच यांच्याव्यतिरिक्त ही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाराही थिएम हा वावरिंकानंतरचा पहिला खेळाडू बनला आहे. 2016 मध्ये वावरिंकाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.

23 वर्षीय झ्वेरेव्हने पहिल्या सेटमध्ये सर्व्ह अँड व्हॉलीचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत 4 बिनतोड सर्व्हिस आणि 16 विजयी फटके मारत केवळ 30 मिनिटांत सेट जिंकला. दुसऱया सेटमध्ये झ्वेरेव्हने 5-1 वर असताना तीन सेटपॉईंट्स वाया घालविले. मात्र सर्व्हिस राखत पाचव्या सेटपॉईंटवर त्याने हा सेटही 6-4 असा जिंकला. तिसऱया सेटपासून मात्र थिएमचा खेळ उंचावत गेला आणि व्हेरेव्हचा खालावत गेला. व्हेरेव्हच्या सेकंड सर्व्हचा वेग मंदावला आणि फोरहँड हा त्याचा कच्चा दुवा असल्याने तो बचावावर भर देऊ लागला. थिएमने तिसरा व चौथा सेट जिंकून बरोबरी साधल्यानंतर निर्णायक पाचव्या सेटमध्ये 5-3 वर असताना झ्वेरेव्हला चॅम्पियनशिप पटकावण्याची संधी मिळाली होती. पण त्याला सर्व्हिस राखता आली नाही आणि थिएमने लवकरच 6-5 अशी आघाडी घेतली. थिएमलाही चॅम्पियनशिप जिंकण्याची यावेळी संधी मिळाली होती. पण त्यानेही झ्वेरेव्हप्रमाणे चूक केली आणि सेट टायब्रेकवर गेला. टायब्रेकरमध्ये झ्वेरेव्हने दोन दुहेरी चुका केल्यानंतर थिएम 5-3 वर पोहोचला असताना तो थकल्याचे आणि लंगडत असल्याचे दिसून आले आणि त्याने दोन चॅम्पियनशिप पॉईंटही वाया घालविले. मात्र तिसऱया पॉईंटवर त्याने जेतेपदासह 3 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीसही पटकावले.

या सामन्यात व्हेरेव्हने 15 बिनतोड सर्व्हिस केल्या तर थिएमने केवळ दोन आणि झ्वेरेव्हने 15 व थिएमने केवळ 8 दुहेरी चुका केल्या. या स्पर्धेत प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र या सामन्यावेळी काही डझन लोक उपस्थित होते. पण त्यात पदाधिकारी, पत्रकार, स्टाफ मेंबर्स यांचाच भरणा होता.

Related Stories

ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

Patil_p

AUS vs IND : ऑस्ट्रेलियाचा विजय पंच; भारत उपविजेता

tarunbharat

हॅम्पशायरचा लियॉनबरोबरचा करार रद्द

Patil_p

पंतप्रधान मदतनिधीसाठी सनरायजर्स हैदराबादची 10 कोटींची मदत

Patil_p

जोकोविचची स्पर्धेतून हकालपट्टी

Patil_p

नीरज चोप्रा टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

Patil_p
error: Content is protected !!