तरुण भारत

कोकणातील आरोग्य सेवेच्या मर्यादा उघड

कारोनाच्या निमित्ताने राज्यकर्त्यांनी कोकणातील आरोग्य यंत्रणा सक्षम करावी अशी कोकणी जनतेची अपेक्षा आहे. पुढील काळात आरोग्य सुविधा अशीच रामभरोसे राहिल्यास कोकणी जनतेच्या जीवाशी खेळल्यासारखेच होईल.

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या  झपाटय़ाने वाढत आहे. दोन्ही जिल्हय़ात 8,500 च्यावर रुग्णसंख्या गेली आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढत असून 225 च्यावर बळी गेले आहेत. कोरोनाची ही परिस्थिती मर्यादित आरोग्य सुविधेअभावी हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे कोरोनाच्या महामारीमध्ये कोकणातील आरोग्य सुविधांच्या मर्यादा उघड झाल्या आहेत.

Advertisements

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ातील जनतेचे आरोग्यमान तसे खूप चांगले आहे. परंतु कोरोनाच्या महामारीमध्ये कोकणी जनतेचे आरोग्यमान पार बिघडून गेले आहे. याचे प्रमुख कारण उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा नाहीत. आजही व्याधीग्रस्त नागरिकांना गोवा, बेळगाव, कोल्हापूर किंवा मुंबईला उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य सुविधांची एवढी वानवा असताना एवढय़ा वर्षात दोन्ही जिल्हय़ात एक शासकीय मेडिकल कॉलेज होऊ शकले नाही. राज्यकर्त्यांचा हा कुचकामीपणाच म्हणायला हवा. आजवर कोकणाने लेप्टोस्पायरोसिस, माकडताप यासारख्या आजारांचा कसाबसा सामना केला. त्यातही शेकडो लोकांचे बळी गेले. आता तर कोरोनामुळे रुग्ण संख्या वाढीबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. त्यामुळे प्रकर्षाने आरोग्य सुविधांची कमतरता जाणवते आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ात शासकीय मेडिकल होणार असे सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सूतोवाच केले आहे. परंतु प्रत्यक्षात कधी होईल तेव्हा. तोपर्यंत अनेक लोकांचे हकनाक बळी जात आहेत. राज्यकर्त्यांची ही नामुष्कीच आहे.

 जुलै अखेरपर्यंत पहिल्या चार महिन्यात बऱयापैकी परिस्थिती नियंत्रणात ठेवली गेली. दोन्ही जिल्हा प्रशासनाने उत्तम कामगिरी करत कोरोनावर नियंत्रण ठेवले. रत्नागिरी जिल्हय़ात थोडय़ा अधिक प्रमाणात रुग्ण आढळत होते. मात्र सिंधुदुर्ग जिल्हय़ाने कमालीचे नियंत्रण ठेवले होते. परंतु गेल्या दीड महिन्यात दोन्ही जिल्हय़ात कोरोनाचे चित्र पूर्ण बदलून गेले आहे. झपाटय़ाने रुग्ण वाढत आहेत आणि मृत्यूही होत आहेत.

गणेशोत्सवासाठी पुणे-मुंबई येथून मोठय़ा प्रमाणात चाकरमानी येतात आणि हे चाकरमानी कोकणात कोरोना हॉटस्पॉटमधून आले तर निश्चितपणे कोकणात कोरोना फैलाव मोठय़ा प्रमाणात वाढणार हे निश्चित होते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन दोन्ही जिल्हय़ांच्या प्रशासनाने चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी निर्बंध घातले हेते. ते केवळ चाकरमान्यांची अडवणूक करण्यासाठी नव्हते तर दोन्ही जिल्हय़ातील आरोग्य सुविधांच्या मर्यादा किती आहेत याची पूर्ण कल्पना होती. चाकरमानी मोठय़ा प्रमाणात येऊन कोरोनाचा फैलाव झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाणार होती हेही माहिती होते म्हणूनच निर्बंध घातले गेले. परंतु सत्ताधारी आणि विरोधी नेतेमंडळींनी चाकरमान्यांच्या मतावर डोळा ठेवत प्रशासनाने घातलेले निर्बंध शिथिल करून घेतले आणि चाकरमान्यांना कोकणात आणले गेले. त्याचाच गंभीर परिणाम कोकणवासियांना भोगावा लागत आहे.

कोरोनाच्या या महामारीत एक वर्ष गावी येणे टाळता आले असते तर आपलेच सगेसोयरे आज अडचणीत आले नसते हे आता चाकरमान्यांनाही कळून चुकले आहे. त्याचे कारण मूळ प्रश्न आहे तो आरोग्य सुविधांचा. दोन्ही जिल्हय़ात आरोग्य सुविधा अपुऱया आहेत आणि कोरोनाच्या या महामारीत आरोग्य सुविधांच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. दोन्ही जिल्हय़ाची आजची परिस्थिती पाहिली तर रत्नागिरीमध्ये 6,000 च्यावर तर सिंधुदुर्गात 2,500 च्या वर रुग्ण संख्या गेली आहे. रत्नागिरीत 175 च्यावर आणि सिंधुदुर्गात 45 च्यावर कोरोनाचे बळी गेले आहेत. कोरोनामुळे बळी जाणाऱया रुग्णांची पार्श्वभूमी पाहिली तर 80 ते 90 टक्के रुग्ण वयोवृद्ध आणि व्याधिग्रस्त आहेत. असे असले तरी त्यांना वेळीच उपचार मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या संकटकाळात राज्य सरकारने दोन्ही जिल्हय़ात कोविड लॅब केल्या ही समाधानाची बाब आहे. त्यामुळे चाचण्या वाढविता आल्या. आरोग्य यंत्रणा गेले सहा महिने दिवसरात्र काम करून थकलेली आहे. परंतु मोठय़ा प्रमाणात रिक्त जागा आहेत त्या भरल्या गेलेल्या नाहीत. रुग्ण संख्या एवढी वाढली आहे की सरकारी कोविड सेंटरमध्ये रुग्णांना बेड मिळणे मुश्किल झाले आहे. चांगले जेवण मिळत नाही, ऑक्सिजनचाही तुटवडा पडत आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स व इतर कर्मचाऱयांनाच कोरोनाची लागण होऊ लागल्याने रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत आहेत. खाजगी हॉस्पिटलला कोविड सेंटरची परवानगी दिली. परंतु त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना जाणे परवडणारे नाही, पैसे मोजावे लागणार आहेत.

कोकणात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा फैलाव होईल हे अपेक्षित नव्हते. सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना नियंत्रणात येईल अशी अपेक्षा होती. परंतु गेल्या दीड महिन्यात कोरोनाची संख्या एवढी वेगाने वाढते आहे की कधी नियंत्रणात येईल हे सांगणे कठीण आहे. या महामारीत कोकणातील आरोग्य सुविधा मर्यादा मात्र उघड झाल्या आहेत. आता या निमित्ताने तरी राज्यकर्त्यांनी कोकणातील आरोग्य यंत्रणा सक्षम करावी अशी जनतेची अपेक्षा आहे. पुढील काळात आरोग्य सुविधा अशीच रामभरोसे राहिल्यास जनतेच्या जीवाशीच खेळण्यासारखे होईल. मुंबई-पुणे प्रमाणे कोकणातही दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे आतातरी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. सामाजिक सेवा संस्थांनीही आरोग्यसेवा देण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. अन्यथा मर्यादा उघड होऊन लोकांचे जीव जातील.

संदीप गावडे

Related Stories

स्मरण स्वातंत्र्यशलाकांचे

Patil_p

गोवा राज्य कृषिप्रधान होणार काय ?

Patil_p

कृष्णें नोवरीतें जिंकिलें

Patil_p

लसीकरणाची वाढती टक्केवारी आशादायी

Patil_p

धक्कादायक दुर्घटना

Patil_p

अतिवृष्टी, पूर, कोरोनाचे संकट आणि राजकीय हेवेदावेही

Patil_p
error: Content is protected !!