तरुण भारत

जिल्हय़ात दहा हजार कोरोना रूग्ण बेडवर!

प्रतिनिधी / सांगली :

जिल्हय़ात कोरोनाच्या महामारीने उच्चांक गाठला आहे. जिल्हय़ात एकूण रूग्णसंख्या 24 हजाराच्या वर गेली आहे. त्यामध्ये दररोज वाढच होत चालली आहे. या वाढत्या रूग्णसंख्येला रोखण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना नाही. जिल्हय़ात सध्याच्या घडीला खासगी, सरकारी आणि नव्याने निर्माण केलेल्या कोरोना सेंटरमध्ये एकूण फक्त 3900 बेड आहेत. तेही फुल्ल आहेत. तर सहा हजारापेक्षा अधिक रूग्ण घरात आहेत. उपचार सुरू असणारी एकूण रूग्णसंख्या ही दहा हजाराच्या घरात गेली आहे. या सर्व रूग्णांची कोरोनाविरूध्द लढण्याची झुंज सुरूच आहे.

साखळी तोडण्यात प्रशासन अपयशी

जिल्हय़ात कोरोनाचा समूह संसर्ग झाला आहे. पण, हा समूह संसर्ग रोखण्यासाठी ज्याप्रमाणात उपाययोजना करण्याची गरज होती. त्या उपाययोजना करण्यात जिल्हा प्रशासन पूर्णपणे फेल ठरले आहे. यामुळे जिल्हय़ात सध्याच्या घडीला दररोज सरासरी 900 ते एक हजार रूग्ण वाढत चालले आहेत. या वाढत्या रूग्णांच्यावर उपचार करण्यासाठी सध्याच्या घडीला सक्षम आरोग्य यंत्रणा नाही. त्यामुळे लोक घाबरून गेले आहेत. कोरोना झाला की त्या रूग्णांचा आपोआपच ऑक्सिन कमी होत चालला आहे. त्यामुळे ही वाढणारी रूग्णसंख्या आटोक्यात  आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. ते झाले तरच या रूग्णसंख्येचा वाढणारा आकडा कमी होऊ शकतो.

रूग्णांना उपचारासाठी बेड नाहीत

जिल्हय़ात सध्याच्या घडीला 10 हजार रूग्ण कोरोनाशी लढत आहेत. पण या कोरोनाशी लढणाऱया रूग्णांना मुबलक आरोग्य सुविधा नाहीत. त्यांना साधा उपचारासाठी बेड मिळविण्यासाठी दिवसभर फिरावे लागत आहे. कोठेही बेड मिळाला की त्या हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल व्हावे लागत आहे. तर अनेक रूग्णांना तर त्यांची प्रकृती ठीकठाक आहे असे सांगून त्यांना घरीच उपचारार्थ केले आहे. या होम आयसोलेशनच्या रूग्णांना घरीच आरोग्य यंत्रणा येणार असल्याचे सांगितले जाते. पण, त्यांच्याकडेही या यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. जिल्हय़ात समूह संसर्ग पसरल्यानंतर लागणाऱया बेडची संख्या वाढविण्यासाठी कोणतेही प्रयत्न प्रशासनाकडून झाले नाहीत. त्यामुळे अनेक रूग्णांचे बेड नसल्याने हाल झाले आहेत.

ऑक्सिजन, व्हेंटिलेंटर बेड अवघे हजार

जिल्हय़ात सध्या कोरोनाने प्रकृती चिंताजनक बनलेल्या रूग्णांची संख्या दीड हजारापेक्षा अधिक आहे. पण, या रूग्णांवर उपचार करण्यासाठी सक्षम अशी यंत्रणाच उपलब्ध नाही. सध्या जिल्हय़ात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेंटर बेडची संख्या ही एक हजाराच्या घरात आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागात उपचाराची गरज असणाऱया 500 रूग्णांच्यावर जनरल वॉर्डमध्येच उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती कधीही बिघडू शकते. पण त्यासाठी लागणारे ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेंटर बेड जिल्हय़ात उपलब्धच नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे बेड वाढविण्यासाठी  जिल्हा प्रशासनाकडून मोठय़ा प्रमाणात प्रयत्न गरजेचे आहेत. त्याचवेळी चिंताजनक प्रकृती असणाऱया रूग्णांना वाचविता येवू शकते.

लोक घाबरून गेले आहेत

जिल्हय़ात कोरोनाने पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांला तातडीने उपचार सुरू केल्यास तो निश्चित बरा होतो. पण, त्याला बेड मिळविण्यासाठीच फार प्रयत्न करावे लागत असल्याने त्यातच तो घाबरून जात आहे. त्यामुळे त्याची ऑक्सिजनची पातळी आपोआप कमी होते आणि त्याची प्रकृती चिंताजनक बनत चालली आहे. जर तातडीने अशा रूग्णांना उपचार मिळाल्यास ते सात ते दहा दिवसांच्या आत बरे होऊ शकतात. पण, त्यांना तातडीने उपचार मिळत नाहीत. त्यांचे योग्य समुपदेशन होत नाही. त्यामुळे ते घाबरून जातात आणि त्यातच त्यांची प्रकृती चिंताजनक बनत चालली आहे. सांगलीतील अनेक मृत्यूच्या मागे रूग्ण घाबरला हे मुख्य कारण आहे.

जिल्हय़ात दररोज 30 वर बळी

जिल्हय़ात सध्या दररोज 30 हून अधिक कोरोना रूग्णांचा बळी जात आहे. ही आकडेवारी जिल्हय़ाला चिंताजनक बनविणारी आहे. आजपर्यंत जिल्हय़ात 893 जणांचे बळी गेले आहेत. ही बळीची संख्या दररोज वाढत चालली आहे. त्यामुळे हे मृत्यू रोखण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचे आहेत. पण, त्यासाठी आरोग्य विभागाकडून कोणतीही यंत्रणा सक्षम केली गेली नाही. कारण गेल्या सहा महिन्यापासून अविरतपणे जिल्हय़ातील आरोग्य यंत्रणा काम करत आहे. त्यांच्यातील काही मंडळी पॉझिटिव्ह आल्याने तेही आता घाबरून गेले आहेत. त्यामुळे हे वाढणारे बळी रोखण्यासाठी आता विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

साखळी तोडणे हा एकमेव पर्याय

जिल्हय़ातील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी ही साखळी स्वतःहून तोडली पाहिजे त्यासाठी त्यांनी आपली आणि आपल्या कुटुंबांची  काळजी घेत सुरक्षित अंतर ठेवून आपले व्यवहार केले पाहिजेत. तसेच बाहेर पडताना सोशल डिस्टन्सिंग बरोबरच त्यांनी मास्कचा वापर तसेच सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे तरच ही कोरोनाची साखळी तुटे शकते आणि हा एकमेव पर्यायच कोरोनाला रोखण्यासाठी प्रभावी ठरणार आहे.

Related Stories

कोरोना सातारा शहराचा फास आवळू लागला

Patil_p

सांगलीत आढळले दुर्मिळ फुलपाखरू

Shankar_P

बीड शेड परिसरातील चार युवकांना कोरोनाची लागण

Shankar_P

त्या हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपर्यंत 312 पॉझिटिव्ह रुग्ण

triratna

सातारा तालुक्यातील डोंगरी भागात पाण्याची टंचाई

triratna
error: Content is protected !!