तरुण भारत

शाळा सुरु करण्यास पालक, मंत्री, आमदारांचा विरोध

प्रतिनिधी / मडगाव :

कोरोना महामारीमुळे बंद असलेले इयत्ता 9 ते 12 वी पर्यंतचे वर्ग पुन्हा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली असली तरी असंख्य पालकांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. मुलांचे एक वर्ष वाया गेले तरी चालेल पण, मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. पंचायतमंत्री माविन गुदिन्हो तसेच कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनीसुद्धा शाळा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे.

गोव्यात कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. कोरोना नियंत्रणात येण्याची कोणतीच लक्षणे नसल्याने सद्या सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनामुळे बळी जाण्याचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पालक कोणताच धोका पत्करण्यास राजी नाही. सद्या सोशल मीडियावरून पालकांनी आपली मते व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. मुलांचे एक वर्ष वाया गेले तरी चालेल पण, मुलांना शाळेत पाठवायचे नाही अशा स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.

शिक्षणापेक्षा आपल्या मुलांचा जीव महत्वाचा असल्याच्या प्रतिक्रीया पालकांनी व्यक्त केलेल्या आहेत. सरकारने शाळा सुरू करण्याची घाई करू नये असे आवाहन देखील पालकांनी केले आहे. सद्या ऑनलाईन वर्ग सुरू केलेले आहेत. ते तसेच कायम ठेवावे, लाईन पद्धतीनेच मुलांच्या परीक्षा घ्यावात. त्यांना पुढील वर्गात बढती द्यावी अशी मागणी सुद्धा पालकांनी केली आहे.

सरकारने फेर विचार करावा : माविन

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी देखील शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात सरकारने फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. सद्या कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. अशा पार्श्वभूमीवर सरकारने शाळा सुरू करण्याचा कोणताच धोका पत्करू नये. सरकारातील सर्व मंत्री व आमदार यावर चर्चा करून निर्णय घेतील असे ही त्यांनी म्हटले आहे.

कोरोनाचा उद्रेक असल्याने वर्ग नकोच : आलेक्स

शाळा पुन्हा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली असली तरी गोव्यात सद्या कोरोनाची भयानक परिस्थिती आहे. असंख्य पालक आपल्याशी संपर्क साधून पुन्हा शाळा सुरू करू नये अशी मागणी करतात. सरकारने शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी प्रतिक्रिया कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी व्यक्त केली आहे.

सर्वसंबंधितांची मते आजमावून निर्णय घ्यावा

काही पालक शाळा पुन्हा सुरू कराव्यात या मताचे आहेत. त्याचाही विचार व्हायला पाहिजे. शाळा सुरू केल्या आणि मुले शाळेत नाही गेली तर त्यांचे वर्ष वाया जाणार आहे. त्यामुळे सरकारने शाळा पुन्हा सुरू करण्यापूर्वी सर्व घटकांना विश्वासात घ्यावे. विरोधी आमदारांनी कोणत्याही गोष्टीला विरोध केला तर मुख्यमंत्री नेमकी तिच गोष्ट करतात. हा आजवरचा अनुभव आहे. शाळा पुन्हा सुरू करण्यासदंर्भात मुख्यमंत्र्यांनी पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच लोक प्रतिनिधी यांची मते आजमावून घ्यावी व नंतरच योग्य तो निर्णय घ्यावा असे  लॉरेन्स म्हणाले.

कोरोनामुळे अनेकांचे बळी जात आहे. ते रोखण्यात सरकारला प्रचंड अपयश आलेले आहे. हॉस्पिटलाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. अशा पार्श्वभूमीवर शाळा सुरू करणे धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे सरकारने फेरविचार करावा असे मत ही त्यांनी मांडले आहे.

Related Stories

साळगावकरची वास्को क्लबवर चार गोलांनी मात

Amit Kulkarni

शिक्षकांना मिळणाऱया सर्व सवलती प्रशिक्षकांनाही मिळायाला हव्यात

Amit Kulkarni

विद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर

Patil_p

पाडव्याच्या मुहुर्तावर मगोची पुनर्बांधणी

Omkar B

ओव्या म्हणजे मनापासून व्यक्त हेणाऱया भावना

Amit Kulkarni

उदयनराजे भोसलेंची सूर्यकिरण हेरिटेज हॉटेलला भेट

Patil_p
error: Content is protected !!