तरुण भारत

खासगी रूग्णालयांतील लुटीवर नियंत्रण कुणाचे?

प्रतिनिधी / चिपळूण :

 कोविडच्या नावाखाली शहरातील खासगी रूग्णालयांत उपचार घेत असलेल्या रूग्णाची अक्षरश: लूट चालली आहे. उपचारासाठी अडीच ते चार लाखाची बिले आकारली जात असल्याने या लुटीवर नियंत्रण कुणाचे असा सवाल शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी गुरूवारी केला. यावर लवकरच डॉक्टरांची बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, असे उत्तर आमदार भास्कर जाधव यांनी दिले.

Advertisements

  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या शुभांरभानिमित्त येथील डीबीजे महाविद्यालयाच्या सभागृहात गुरूवारी पत्रकार परिषद पार पडली. तहसीलदार जयराज सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी तालुक्यात कशा पध्दतीने ही मोहीम राबवणार यासंदर्भात माहिती देत सहकार्याचे आवाहन केले.

    यावेळी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख शिंदे म्हणाले की, मोहीम चांगली आहे. तिला लोकप्रतिनिधी म्हणून सर्वजण सहकार्य करणार आहोत. आज खासगी रूग्णालयात अनेकजण उपचार घेत आहेत. मात्र त्यांची बिले पाहिल्यानंतर डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. एका रूग्णाला आठ दिवसांत दिलेल्या ऑक्सिजनपोटी 30 हजार रूपयांचे बील आकारण्यात आले आहे. एक सिलिंडर साधारणपणे पाचशे रूपयाला मिळत असताना आठ दिवसांत साठ सिलिंडर लावले का, असा प्रश्न पडतो. याबाबत अनेक तक्रारी आणि बिले आली असून कोणाचेच नियंत्रण नसल्याने आंदोलनात्मक पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  आमदार जाधव यांनीही शिंदे यांच्या मताशी सहमती दर्शवताना सांगितले की, आज रूग्णांची संख्या वाढती आहे. कामथे रूग्णालय सर्व सोयींनी युक्त आहे. उद्या एखादे रूग्णालय बंद केले गेले तर रूग्णांचीच गैरसोय होणार आहे. यातच उपचार मिळत नाही म्हणून तक्रार करणारेच आपणाला दोष देत बसतील. रूग्ण संख्या वाढत असताना आता फॅमिली डॉक्टरनेही आपली जबाबदारी ओळखून उपचार आणि सल्ला देणे गरजेचे आहे. संकटकाळात तेच जर दरवाजा बंद करून बसणार असतील त्यांच्या रूग्णांनी जायचे कुठे. त्यामुळे सर्वच लहानमोठय़ा डॉक्टरांकडून उपचार कसे सुरू होतील, असे पाहिले पाहिजे. त्यासाठी लवकरच सर्व डॉक्टरांची बैठक घेऊन चर्चा करू, असे जाधव म्हणाले. आरोग्य मोहीम यशस्वी करण्याच्यादृष्टीने जी-जी मदत लागेल ती देण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी म्हणून कायम पाठीशी राहू, अशी हमीही त्यांनी प्रशासनाला दिली.

   कामथे रूग्णालयाचे डॉ. अजय सानप यांनीही रूग्णालयात कमतरता असलेल्या औषधांची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, खासगी रूग्णालयातील वाढीव बिलांवर जिल्हा शल्यचिकीत्सकांचे नियंत्रण असते. शासनाच्या निर्देशांनुसार उपचाराच्या शुल्काची आकारणी केली जाते. त्यातून काही आक्षेपार्ह आढळले तर ती वसुली करण्याचीही तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  माजी आमदार सदानंद चव्हाण, नगरसेवक आशिष खातू यांनीही कोरोनाबाबत भीतीदायक चित्र उभे केले जात आहे. प्रथम ही  भीती दूर करणे गरजेचे आहे. खासगी रूग्णालयांमध्ये उपचाराच्या नावाखाली लूट केली जात असली तरी त्यांच्या ‘लिंक’ मोठय़ा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  यावेळी शहरातील कांता कानिटकर यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबाची तपासणी करत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेचा शुभांरभ करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, सभापती धनश्री शिंदे, जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, नगरसेवक शशिकांत मोदी, मनोज शिंदे, गटविकास अधिकारी सरिता पवार, नगरपरिषदेचे अनंत मोरे, रोटरीचे प्रशांत देवळेकर, नाजीम अफवारे, दशरथ दाभोळकर आदी उपस्थित होते.

Related Stories

18 वर्षावरील वयोगटासाठी लसीकरण सत्र

NIKHIL_N

प्रशासनाच्या हेकेखोर कारभाराला कंटाळून धुंदरेवाशीय छेडणार लाक्षणिक उपोषण

Abhijeet Shinde

जरंडेश्वर प्रकरणी ‘ईडी’ने जिल्हा बँकेकडून मागवली माहिती

Patil_p

दत्तक मुले घेण्यात चंद्रकांत सावंत यांचे राज्यात रेकॉर्ड

NIKHIL_N

वकिलाचा मोबाईल हॅक करून पाठवले अश्लिल व्हिडीओ

Patil_p

ओवळीये मुख्य रस्त्याची श्रमदानातून साफसफाई

NIKHIL_N
error: Content is protected !!