तरुण भारत

विराट कोहलीच्या मोहिमेची सुरुवात आजपासून

आयपीएल 13 : सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आरसीबीची सलामी, दोघांकडेही मॅचविनर फलंदाज

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisements

विराट कोहली आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळविण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या मोहिमेला सोमवारी सुरुवात करणार आहे. आतापर्यंत फक्त एकदाच अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर व सनराजर्स हैदराबाद यांच्यात सोमवारी सामना होणार असून सायंकाळी 7.30 पासून खेळाला प्रारंभ होणार आहे.

दोन्ही संघांत धोकादायक फलंदाजांचा समावेश असून एकहाती सामन्याचा निकाल बदलण्याची त्यांच्यात क्षमता आहे. आरसीबीचा कर्णधार कोहली आघाडीवर राहून सेनापतीत्व करतो. पण संघाने सर्व विभागात चांगले प्रदर्शन केले तरच पहिले जेतेपद मिळविण्याचे स्वप्न साकार होऊ शकते, याची त्याला पूर्ण जाणीव आहे. ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकाच्या संघाचा कर्णधार ऍरोन फिंच संघात दाखल झाल्याने आरसीबाची ताकद आणखी वाढली आहे. देवदत्त पडिक्कल या कर्नाटकच्या युवा खेळाडूच्या गुणवत्तेची बरीच चर्चा सुरू आहे. साहजिकच संघाची त्याच्याकडून मोठी अपेक्षा असेल. मागील वर्षी या संघाचे निराशाजनक प्रदर्शन झाले होते. पण यावेळी त्यांच्याकडे समतोल संघ असून अखेरच्या टप्प्यात फटकेबाजी करण्याच्या त्यांच्या क्षमतेची अजून परीक्षा झालेली नाही.

सनराजर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ही स्पर्धा बरीच गाजवली असून तीन वेळा त्याने सर्वाधिक धावा जमवित ऑरेंज कॅप मिळविली आहे तर 2016 मध्ये त्याच्या संघाने या स्पर्धेचे जेतेपदही पटकावले आहे. वॉर्नर पुन्हा एकदा इंग्लंडच्या बेअरस्टोसमवेत सलामीस उतरणार आहे. आयपीएलमधील ही सर्वात तगडी सलामीची जोडी असून आरसीबीविरुद्धच गेल्या वर्षी त्यांनी सलामीची सर्वोच्च भागीदारीही नोंदवली आहे. त्याची पुनरावृत्ती करण्यास वॉर्नर-बेअरस्टोही उत्सुक झाले आहेत. याशिवाय या संघात केन विल्यम्सन, मनीष पांडे, मिचेल मार्श, फॅबियन ऍलन या फलंदाजांचाही समावेश आहे.

सनराजयर्सच्या फलंदाजीत पुरेशी खोली नाही, ही त्यांची अडचण आहे. प्रँचायजींनी विराट सिंग, अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, अब्दुल समद या युवा खेळाडूंवर भर देत गुंतवणूक केली आहे. मध्यफळीत हे महत्त्वाचे खेळाडू ठरतील, अशी अपेक्षा संघव्यवस्थापनाची आहे. गोलंदाजीत मात्र वैविध्य व खोली हे या संघाचे बलस्थान असून मुख्य संघात फारसा बदल झालेला नाही. भुवनेश्वर वेगवान गोलंदाजीतील त्यांचा आघाडीवीर असून संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, बसिल थम्पी हे त्याचे सहकारी असतील. अफगाणचा रशिद खान व अष्टपैलू मोहम्मद नबी यांच्या रूपात या संघाकडे स्पर्धेतील सर्वोत्तम फिरकी जोडी आहे. नबीने तर नुकतीच सीपीएल स्पर्धाही गाजविली आहे. याशिवाय डावखुरा स्पिनर शाहबाज नदीमही त्यांच्या ताफ्यात आहे. आरसीबीकडेही युजवेंद्र चहल हा प्रमुख स्पिनर असून वाशिंग्टन सुंदर, पवन नेगी ऍडम झाम्पा, मोईन अली यांचा पर्यायही त्यांच्याकडे उपलब्ध आहे. डेथ बॉलिंगची उणीव त्यांनी ख्रिस मॉरिसची भरती करून यावेळी केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघाचे प्रशिक्षक ऑस्ट्रेलियन्स आहेत. ट्रेव्हर बेलीस सनराजयर्सचे तर सायमन कॅटिच आरसीबीचे प्रशिक्षक आहेत.

संघ : सनरायजर्स : वॉर्नर (कर्णधार), बेअरस्टो, विल्यम्सन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंग, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, रशिद खान, मिचेल मार्श, अभिषेक शर्मा, बी.संदीप, संजय यादव, फॅबियन ऍलन, भुवनेश्वर, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅन्लेक, टी. नटराजन, बसिल थम्पी.

आरसीबी : कोहली (कर्णधार), फिंच, देवदत्त पडिक्कल, पार्थिव पटेल, डी व्हिलियर्स, गुरकीरत मान, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, सुंदर, शाहबाद अहमद, नवदीप सैनी, डेल स्टीन, युजवेंद्र चहल, झाम्पा, इसुरु उदाना, मोईन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

सामन्याची वेळ : सायं. 7.30 पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.

Related Stories

कुसल परेराला कोरोनाची बाधा

Patil_p

फ्रेंच स्पर्धेत नदालचे 13 वे जेतेपद

Patil_p

ऑस्ट्रेलिया महिला संघाचा विश्वविक्रमी विजय

Patil_p

लंकेचा धमिका प्रसाद आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

पाकची टी-20 मालिकेत विजयी सलामी

Patil_p

सिमन्स संघासमोर अल्टिअस डाटा संघाची शरणागती

prashant_c
error: Content is protected !!