तरुण भारत

संजू सॅमसन-स्टीव्ह स्मिथची आक्रमक अर्धशतके

आयपीएल क्रिकेट स्पर्धा : राजस्थान रॉयल्सचे चेन्नई सुपरकिंग्सला 217 धावांचे आव्हान

शारजा / वृत्तसंस्था

संजू सॅमसनने अवघ्या 32 चेंडूत 74 धावा झोडपल्यानंतर व त्याला स्टीव्ह स्मिथ (47 चेंडूत 69), जोफ्रा आर्चर (8 चेंडूत नाबाद 27) यांची पूरक साथ लाभल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल साखळी सामन्यात चेन्नईविरुद्ध निर्धारित 20 षटकात 7 बाद 216 धावांचा डोंगर रचला.

संजू सॅमसन व स्टीव्ह स्मिथची फटकेबाजी राजस्थानच्या डावातील ठळक वैशिष्टय़ ठरले. त्यानंतर जोफ्रा आर्चरच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संजू सॅमसनचा झंझावात लक्षवेधी होता. त्याने खेचलेले उत्तूंग 9 षटकार चेन्नईच्या गोटात खळबळ उडवणारे नसते तरच नवल होते. तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरल्यानंतर पहिल्या चेंडूपासूनच त्याने जोरदार आक्रमणावर भर दिला होता.

प्रत्येक चेंडूवर तुटून पडत त्याने चेन्नईच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजाची जबरदस्त धुलाई केली. युएईमधील खेळपट्टय़ा संथ गोलंदाजीला पोषक असल्याचे मानले जात असले तरी सॅमसनने फिरकी गोलंदाजीचाही तितक्याच ताकदीने समाचार घेतला. चेन्नईचा सर्वात अनुभवी फिरकीपटू रविंद्र जडेजाचे पृथक्करण (4 षटकात 40 धावा, एकही बळी नाही) याचा उत्तम दाखला ठरले. पियुष चावलाला तर 4 षटकात एका बळीसाठी 55 धावा मोजाव्या लागल्या.

राजस्थानतर्फे अनुभवी स्टीव्ह स्मिथने देखील आणखी एकदा तंत्रशुद्ध, तडाखेबंद फलंदाजीचे प्रदर्शन घडवत चेन्नईच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. स्टीव्ह स्मिथचा बीमोड करणे सहजसोपे कधीच असत नाही, याचा प्रत्यय या लढतीत चेन्नईच्या गोलंदाजांना आला.

सलामीवीर यशस्वी जैस्वाल (6) आल्या पावली परतल्याने राजस्थानची खराब सुरुवात झाली होती. पण, त्यानंतर स्टीव्ह स्मिथ व संजू सॅमसन यांनी 11.2 षटकातच 121 धावांची भागीदारी साकारल्यानंतर हा संघ सुस्थितीत आला. या दोघांनीही चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेण्यात कोणतीच कसर सोडली नाही. पुढे, डेव्हिड मिलर (0), रॉबिन उत्थप्पा (5), राहुल तेवातिया (10), रियान पराग (6) स्वस्तात बाद झाले. पण, अंतिम टप्प्यात तळाचा फलंदाज जोफ्रा आर्चरने अचानक जोरदार, उत्तूंग फटकेबाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांना अक्षरशः गलितगात्र करुन टाकले. त्याने अवघ्या 8 चेंडूतच 4 टोलेजंग षटकारांसह नाबाद 27 धावा कुटल्या.

धावफलक

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल झे. व गो. चहर 6 (6 चेंडूत 1 चौकार), स्टीव्ह स्मिथ झे. जाधव, गो. सॅम करण 69 (47 चेंडूत 4 चौकार, 4 षटकार), संजू सॅमसन झे. चहर, गो. एन्गिडी 74 (32 चेंडूत 1 चौकार, 9 षटकार), डेव्हिड मिलर धावचीत (गायकवाड-जाधव) 0 (0 चेंडू), रॉबिन उत्थप्पा झे. डय़ू प्लेसिस, गो. चावला 5 (9 चेंडू), राहुल तेवातिया पायचीत गो. करण 10 (8 चेंडूत 1 चौकार), रियान पराग, झे. धोनी, गो. करण 6 (4 चेंडूत 1 चौकार), टॉम करण नाबाद 10 (9 चेंडूत 1 चौकार), जोफ्रा आर्चर नाबाद 27 (8 चेंडूत 4 षटकार). अवांतर 9. एकूण 20 षटकात 7 बाद 216.

गडी बाद होण्याचा क्रम

1-11 (जैस्वाल, 2.2), 2-132 (सॅमसन, 11.4), 3-134 (मिलर, 11.6), 4-149 (उत्थप्पा, 14.1), 5-167 (तेवातिया, 16.2), 6-173 (रियान पराग, 16.6), 7-178 (स्टीव्ह स्मिथ, 18.2)

दीपक चहर 4-0-31-1, सॅम करण 4-0-33-3, एन्गिडी 4-0-56-1, रविंद्र जडेजा 4-0-40-0, पियुष चावला 4-0-55-1.

मैदानी पंचांनी रिप्ले पाहून बदलला निर्णय!

राजस्थानच्या डावातील 18 व्या षटकात पंचांच्या खराब निर्णयाची आणखी एक झलक पाहायला मिळाली. चहर गोलंदाजी करत असताना टॉम करणच्या थाय-पॅडला लागून चेंडू हाफ व्हॉलीवर धोनीकडे गेला. चेन्नईने केलेले अपील उचलून धरत मैदानी पंचांनी त्याला बाद दिले आणि रिव्हय़ू बाकी नसल्याने करणला परतण्याशिवाय पर्यायही नव्हता. पण, तोवर मोठय़ा स्क्रीनवर रिप्ले पाहिल्यानंतर मैदानी पंचांनी बादचा निर्णय फिरवत तिसऱया पंचांचा कौल मागितला. प्रारंभी, बाद दिल्यानंतरही रिप्ले पाहून निर्णय फिरवल्याबद्दल धोनीने तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. तिसऱया पंचांनी नंतर टॉम करणला नाबाद ठरवले होते.

10 चेंडूत 38 धावांची अभेद्य भागीदारी!

जोफ्रा आर्चर (8 चेंडूत नाबाद 27) व टॉम करण (9 चेंडूत नाबाद 10) या जोडीने आठव्या गडय़ासाठी 10 चेंडूत 38 धावांची अभेद्य भागीदारी साकारली व याचमुळे राजस्थान रॉयल्स संघाला 216 धावांची दमदार मजल सहज गाठता आली.

Related Stories

बाबरचे अर्धशतक

Amit Kulkarni

शकीबचे 4 बळी, बांगलादेशचा विंडीजवर विजय

Patil_p

आला रे आला, अजिंक्य आला!

Amit Kulkarni

आरआरचे दिशांत याज्ञिक दुबईत दाखल

Patil_p

आयपीएल जेतेपदासाठी उद्या मुंबई-दिल्ली आमनेसामने

Patil_p

भारतीय महिलांना 5 सुवर्णपदके

Patil_p
error: Content is protected !!