तरुण भारत

सातारा : ३४ बळी, ७०८ कोरोनाबाधित, ५०० मुक्त

वाढत्या मृत्यूदराने जिल्हय़ात चिंता, सातारा तालुक्यात चिंताजनक वाढ
बळींची संख्या साताऱ्यात जास्त, सातारा 256, कराडात 157 बळी
वाई 81, कोरेगावात 72 बळी, युवा कराडकर ग्रुपची संवेदनशीलता
जिल्हाधिकाऱ्यांनी दिला रुग्णांना न्याय

प्रतिनिधी / सातारा

जिल्हय़ात सप्टेंबरच्या मध्यानंतर कोरोना संसर्गाची स्थिती चिंताजनकच आहे. सप्टेंबरच्या प्रारंभी मोठय़ा संख्येने बाधितांची आकडेवारी समोर येत होती. आता एकदम मोठय़ा संख्या कमी होत असल्यातरी सातारा शहर व तालुक्यात चिंताजनक स्थिती आहे. सातारा तालुक्यात एकूण 7 हजार 138 बाधितांची संख्या झाली तर 256 कोरोना बळी गेले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी साताऱयाला आता कसून प्रयत्न करावे लागणार आहेत. कराडमध्ये एकूण बाधितांची संख्या 7 हजार 876 असून 157 बळी गेले आहेत. दुसरीकडे कोरोना मुक्तीचे प्रमाण चांगले असल्याने दिलासा मिळत असला तरी मृत्यूदर रोखण्याचे आव्हान आरोग्य विभागासह सर्वांसमोर आहे.

दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात जिल्हय़ातील 708 एवढय़ा जणांचा अहवाल बाधित आला आहे. तर सायंकाळी आलेल्या अहवालात 500 जणांनी कोरोनावर मात केली असून जिल्हय़ात 34 बाधितांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा जिल्हयात जास्त बाधित
पुणे, मुंबई, नाशिकसारखी कार्पोरेट शहरे आता कोरोनाची साथ आटोक्यात आणत आहे. इतर अनेक जिल्हय़ात कोरोना बाधितांचे आकडे छोटे असताना सातारा जिल्हय़ात मात्र स्थिती गंभीर झालीय. यामध्ये सातारा व कराडमध्ये जास्त बाधितांची संख्या आहे. एकूण 31 हजार 514 पैकी 15 हजारांच्यावर बाधितांची संख्या सातारा व कराडमध्येच आहे. यापैकी अनेकजण कोरोनामुक्त असले तरी सातारा, कराडसह जिल्हय़ात वाढणारी बाधितांची संख्या कमी होण्यासाठी नागरिकांसह प्रशासनालाही कठोर उपाय योजना कराव्या लागणार आहेत. तर उपाय योजनांबरोबर नागरिकांच्या मनातील भीतीही कमी करावी करण्याची गरज आहे.

रुग्णांची 33 लाख 94 हजारांची बिले कमी
कोराना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव पाहता विविध खासगी रुग्णालये कोराना आजारावर उपचार करण्यात येत आहे. परंतु या रुग्णालयांकडून जास्त बिले घेतल्याच्या तक्रारी झाल्या. त्यानंतर देयकाच्या तपासणीसाठी पथक तयार करुन पथकात एक नोडल अधिकारी व एका ऑडीटरची नेमणुक झाली. यामध्ये विविध रुग्णांलयाकडून 122 कोरोना बाधितांकडून 96 लाख 10 हजार 770 रुपये आकारण्यात आलेले होते. पथकाकडून रुग्णालयनिहाय देयकाची तपासणी करुन 33 लाख 94 हजार 856 रुपये इतके बिले कमी करुन 62 लाख 73 हजार 554 रुपये इतकेच उपचाराचे देयक देय केले आहे. बिलांची तपासणी सुरुच राहणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.

अँटीजन टेस्टमध्ये बाधितांची संख्या जास्त
जिल्हय़ात अँटीजन टेस्ट सुरु करण्यात आल्यापासून बाधितांची संख्या वाढली आहे. या बाधितांमध्ये 70 टक्के रुग्ण लक्षण नसलेले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असून या अशा 5 हजार 434 जणांना होम आयसोलेट करण्यात आलेले आहे. तर विविध कोरोना केअर सेंटरमध्ये 1124 रुग्ण निरीक्षणाखाली आहेत. त्यामुळे एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 9,449 एवढी दिसत असली तरी त्यातून होम आयसोलेट व केअर सेंटरमधील रुग्ण वजा केल्यास प्रत्यक्षात 2 हजार 891 रुग्णांवर जिल्हा रुग्णालय, कृष्णा तसेच खासगी हॉस्पिलटमध्ये उपचार सुरु आहेत.

45,538 रुग्णांची ॲन्टिजन तपासणी
सातारा जिल्ह्यात विविध शासकीय व खाजगी तपासणी केंद्रात आतापर्यंत अँटी जन (RAT) साठी 48,538 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, यापैकी 12,600 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह तर 35,938 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

सातारा तालुक्यात 256 कोरोना बळी
जिल्हय़ात वाढत्या मृत्यूदराने चिंता व्यक्त होत आहे. मात्र मृत होणाऱया नागरिकांमध्ये वृध्द नागरिकांचा समावेश जास्त आहे. त्यापाठोपाठ 50 ते 70 वयोगटातील नागरिक बळी ठरत आहेत. मात्र ज्येष्ठांचे प्रमाण अधिक आहे. सर्वात जास्त बळी सातारा तालुका 256, कराड 157 येथे आहेत तर वाई 81, खटाव 78, कोरेगाव 72, फलटण 57, पाटण 54, खंडाळा 35, जावली 30 असे बळी गेले आहेत. तर महाबळेश्वर तालुक्यात 11 बळी गेल्याची नोंद आहे.

सातारा शहर व तालुका हॉटस्पॉट
कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून सातारा शहर व तालुक्यात बाधितांची संख्या नगण्य होती. कराड तालुका पश्चिम महाराष्ट्रातील हॉटस्पॉट ठरला होता. मात्र आता सातारा शहर व तालुका हॉटस्पॉट झाला असून सातारकरांना काळजी घेण्याची गरज वाढलीय. काळजी सर्व जिल्हय़ानेच घेतली पाहिजे मात्र आता सातारकरांना तालुका व शहर कोरोनामुक्त करण्यासाठी कंबर कसण्याची गरज आहे. कोरोना स्थिती गंभीर असताना नागरिकांचे बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत असून सर्वजण मास्क वापरत आहेत, सामाजिक अंतर राखण्याचा प्रयत्न करत असताना कोरोना मात्र वाढतोच आहे.

युवा कराडकर ग्रुपची संवेदनशीलता
‘दैनिक तरुण भारत’चे पत्रकार संतोष गुरव यांचे आकस्मित निधन झाले. गुरव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असून युवा कराडकर सोशल मिडिया ग्रुपने त्यांच्या कुटुंबियांना रुपये 15 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. येथून पुढे सुद्धा गुरव कुटुंबियांच्या सुख दु:खात युवा कराडकर ग्रुप सदैव सोबत असेल, अशी ग्वाही दिलीय. कोरोना संकट काळात माणुसकी जपण्यासाठी शहरातील युवकांनी एकत्र येवून या ग्रुपची स्थापना केलीय. रुग्णांना रात्री अपरात्री कुठेही ऑक्सिजन मशीन पुरवणे, रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध करुन देणे, आवश्यकतेनुसार बेड उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणे, रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे यासाठी हा ग्रुप कार्यरत आहे . सध्या कोरोनामुक्त रुग्णांची माहिती काढून त्यांना प्लाझ्मा दान करण्याविषयी जागरूकता करण्याचे काम या ग्रुपने हाती घेतले आहे. यामध्येच एका पत्रकाराच्या दुर्दैवी निधनानंतर पश्चात त्याच्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम या ग्रुपने केले आहे.

जिल्हय़ात 34 बाधितांचा मृत्यू
सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वाढे, सातारा 37 वर्षीय महिला, रहिमतपूर येथील 64 वर्षीय पुरुष, शेंद्रे सातारा 70 वर्षीय पुरुष, कोंडवे सातारा 49 वर्षीय पुरुष, गडकर आळी सातारा 75 वर्षीय महिला, निगडी 49 वर्षीय पुरुष, रामाचा गोट सातारा 55 वर्षीय पुरुष, चरेगाव, ता. कराड 78 वर्षीय पुरुष, चिंचळी ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा 60 वर्षीय पुरुष, काशिळ सातारा 80 वर्षीय पुरुष, तसेच विविध खासगी हॉस्पिटलमध्ये शाहुपुरी सातारा 83 वर्षीय पुरुष, सासकल ता. फलटण 50 वर्षीय पुरुष, कोरेगाव 78 वर्षीय पुरुष, गोपुज ता. खटाव 50 वर्षीय महिला, सदाशिव पेठ सातारा 72 वर्षीय पुरुष, मुंबई 83 वर्षीय महिला, सदरबझार 75 वर्षीय व 60 वर्षीय पुरुष, कृष्णानगर सातारा 74 वर्षीय पुरुष, पाटण 74 वर्षीय पुरुष, वडूथ ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले कराड 72 वर्षीय पुरुष, जत सांगली येथील 75 वर्षीय महिला, गजानन हौसिंग सोसायटी कराड 70 वर्षीय महिला, बोरगाव, वाळवा 64 वर्षीय पुरुष, मलकापूर कराड 68 वर्षीय पुरुष, बनवडी कॉलनी कराड 56 वर्षीय पुरुष, रेठरे बु कराड 56 वर्षीय पुरुष, बनवडी कराड 46 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड 88 व 66 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर कराड 58 वर्षीय पुरुष, शिवाजी हौसिंग सोसायटी कराड 70 वर्षीय पुरुष अशा एकूण 34 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

807 जणांचे नमुने तपासणीला
सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 26,उपजिल्हा रुग्णालय कराड 16, उपजिल्हा रुग्णालय फलटण 65, कोरेगाव 117, वाई 109, खंडाळा 51, रायगांव 118, पानमळेवाडी 86, मायणी 33, महाबळेश्वर 50, दहिवडी 39 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 97 असे एकूण 807 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 1,13,178
एकूण बाधित 32,222
एकूण कोरोनामुक्त 21,625
मृत्यू 940
उपचारार्थ 9,657

मंगळवारी
एकूण बाधित 708
एकूण मुक्त 500
एकूण बळी 34

Related Stories

सातारा : ‘माझे कुटुंब माझे जवाबदारी’चे उदिद्ष्ट आरोग्याविषयी जनजागृती करणे : प्रांत मिनाज मुल्ला

triratna

वडाप चालकांचे मंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन

triratna

जिल्हय़ात पोलिसांच्या कारवाईचा धडाका सुरु

Patil_p

पाटण मध्ये राष्ट्रवादीच्या ’नगरसेवकांवर गुन्हा दाखल

Patil_p

सातारा : पोलीस निरीक्षक अजय गोरड यांचा मसूर ग्रामस्थांनी केला सन्मान

triratna

आगाशिवनगरला चार बंद घरे फोडली

Patil_p
error: Content is protected !!