तरुण भारत

सातारा : आ. शिवेंद्रसिंहराजेंचे पुष्कर कोविड केअर सेंटर उद्यापासून सुरु

सिव्हीलची वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध होत नसल्याने मंगलमुर्तीकडे केले सुपुर्त

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या कुटूंबियांनी पुष्कर हॉल येथे ८२ बेडचे कोविड केअर सेंटर उभारले आणि ते जिल्हा प्रशासनाला विनामुल्य हस्तांतरित करण्यात आले. मात्र जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाकडून या सेंटरसाठी डॉक्टर्स, नर्स, वार्डबॉय आदी वैद्यकीय यंत्रणाच उपलब्ध होत नाही. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून हे सेंटर बंद होते. कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे आणि त्यांना उपचारासाठी बेड मिळत नाहीत. त्यामुळे पुष्कर कोविड केअर सेंटरचा रुग्णांवर उपचार होण्यासाठी उपयोग व्हावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रशासनाची वाट न पाहता जे कोणी हे सेंटर चालवेल त्याला विनामुल्य सुपुर्त करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मंगलमुर्ती हॉस्पिटलने हे सेंटर चालवण्यास घेतले असून उद्या गुरुवार दि. २४ पासून या सेंटरमध्ये रुग्णसेवा सुरु होणार आहे.

कोरोना महामारीमुळे संपुर्ण देशात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रासह आपल्या सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली आहे. सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खाजगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नाही आणि त्यामुळे रुग्ण दगावत आहेत. या भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतुने आ. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, छ. वेदांतिकाराजे भोसले व कुटूंबियांनी स्वमालकीच्या विसावा नाका येथील पुष्कर हॉल येथे स्वखर्चाने ८२ बेडचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभारले आहे. या सेंटरमध्ये ४२ बेड हे ऑक्सिजन पुरवठ्यासह सुसज्ज असून उर्वरीत ४० बेड विना ऑक्सिजनयुक्त आहेत. दोन आठवड्यांपुर्वी हे सेंटर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाकडे विनामुल्य हस्तांतरीत करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने हे सेंटर जिल्हा रुग्णालयामार्फत चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्यापही जिल्हा रुग्णालयाकडून या सेंटरसाठी वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे हे सेंटर विनावापर पडून होते आणि गरजू रुग्णांना त्याचा उपयोगही होत नव्हता.

पुष्कर कोविड केअर सेंटर चालू करण्याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रुग्णालय प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. मात्र वैद्यकीय अधिकारी, नर्स, वार्डबॉय आदी स्टाफ उपलब्ध नसल्याने सेंटर चालू होवू शकत नसल्याचे सांगण्यात येत होते. काळाची गरज पाहता रुग्णांवर उपचार होण्यासाठी हे सेंटर तातडीने सुरु होणे आवश्यक होते. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णसेवेसाठी सेंटर सुरु करण्याचे आवाहन केले. त्याला मंगलमुर्ती हॉस्पिटलचे संचालक डॉ. जयदीप चव्हाण यांनी होकार दिला असून आता हे सेंटर मंगलमुर्ती हॉस्पिटल मार्फत चालवण्यात येणार आहे. पुष्कर हॉल येथील हे सेंटर उद्या गुरुवारपासून सुरु होणार असून त्याचा लाभ गरजू रुग्णांना होणार आहे.

दरम्यान, हे सेंटर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मंगलमुर्ती हॉस्पिलटला शासनाप्रमाणेच विनामुल्य चालवण्यासाठी दिले आहे. शासनाकडून रुग्णांवर मोफत उपचार झाले असते मात्र त्यांची यंत्रणा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आता खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय यंत्रणेकडे हे सेंटर देण्यात आले असून कमीत कमी खर्चात रुग्णांवर उपचार केले जावेत, अशी आग्रही सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी डॉ. चव्हाण यांना केली आहे. याबाबतही डॉ. चव्हाण सकारात्मक आहेत. पुष्कर कोव्हीड केअर सेंटर हे रुग्णांच्या सेवेसाठी विनामुल्य चालवण्यासाठी देण्यात आले आहे. मंगलमुर्ती हॉस्पिटलमार्फत हे सेंटर सुरु होणार असून त्यातून कोणत्याही प्रकारचा मोबदला आमचे कुटूंब घेणार नसल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे गरजू रुग्णांनी उपचारासाठी डॉ. चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

Related Stories

सातारकरांना पुणेकरांची भिती

Patil_p

सातारा जिल्ह्यातील सरपंच आरक्षण सोडत २९ रोजी

triratna

पदवीधर आणि शिक्षक मतदार निवडणुकीमुळे मतदारांची होणार दिवाळी

Patil_p

जावलीत होणार सुसज्ज क्रिडा संकुल

Patil_p

कराड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी पोलिसांच्या ताब्यात

datta jadhav

जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील पार्किंग निश्चित

Patil_p
error: Content is protected !!