तरुण भारत

सिमेंट व्यापारी ते केंद्रीयमंत्री

सुरेश अंगडी; राजकारणातील सात्विक चेहरा हरपला

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोनामुळे केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त बेळगावला धडकताच केवळ जिह्यालाच नव्हे तर राज्याला जबर धक्का बसला. राजकारणातील एक सौम्य, सात्विक आणि सत्शील चारित्र्य हरपले, अशाच भावना जनमाणसांतून उमटल्या.

केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनाने बेळगावकरांना मोठा धक्का बसला आहे. बुधवारी रात्री ते कोरोनाचे बळी ठरले, याची बातमी बेळगावात येवून धडकली. सुरुवातीला कोणालाच यावर विश्वास बसला नाही. पंधरा दिवसांपूर्वीच ते बेळगावात होते. लोकसभा अधिवेशनासाठी दिल्लीला गेले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आपल्याला लक्षणे नसल्याचे त्यांनी स्वतः जाहीर केले होते. तरीही कोरोनाने त्यांचा बळी घेतला.

बेळगावच्या राजकारणात एक सज्जन राजकारणी अशी त्यांची ओळख होती. कारण राजकीय क्षेत्रात वावरताना त्यांनी कधीच आपल्या अस्तित्वाला धक्का लागू दिला नाही किंवा विनाकारण कुणाशीही शत्रुत्व ठेवले नाही. भाजप जिल्हा उपाध्यक्ष ते केंद्रिय मंत्री असा संघर्षमय प्रवास करणारे सुरेश चन्नबसाप्पा अंगडी (वय 65) हे मुळचे के. के. कोप्पचे. 1 जून 1955 रोजी त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. आई सोमव्वा, वडिल चन्नबसाप्पा अंगडी.

व्यवसायिक कारकीर्द

सुरुवातीला भाजप जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. कायद्याची पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी सिमेंटचा व्यवसाय सुरु केला. वासवदत्ता सिमेंटची एजंसी त्यांनी मिळविली. रामदेव गल्लीत व्यवसायिक कारकीर्द सुरु झाली. सोबतीने भाजप जिल्हा उपाध्यक्ष म्हणून राजकीय कारकीर्दलाही सुरुवात झाली. त्या काळात काँग्रेसचा जोर होता. पक्षाबरोबरच ते स्वतःही वाढले.

तब्बल चारवेळा बेळगाव लोकसभा मतदार संघाचा खासदार होण्याचा मान त्यांनी मिळविला. 2004 मध्ये स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या लाटेने सुरेश अंगडी पहिल्याच झटक्मयात खासदार बनले. स्वतः प्रचारासाठी अटलजी बेळगावला आले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. गेल्या वषी झालेल्या लोकसभा निवडणुकीत 3 लाख 92 हजार मतांच्या अंतराने ते चौथ्यांदा खासदार झाले. म्हणून केंद्रिय मंत्रीपदही त्यांच्यापर्यंत चालून आले.

शेतकरी कुटुंबात जन्म

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुरेश अंगडी यांनी उद्योग व्यवसाय, शिक्षण, राजकारण, समाजकारण आदी क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोना विरुध्द सामान्य कार्यकर्त्यांसारखे त्यांनी काम केले. गोर-गरीबांना अन्नधान्यांचे कीट वाटण्यापासून प्रत्येक कामात ते आघाडीवर होते. लोकसभा अधिवेशनाला नवी दिल्लीला जाण्यापूर्वी 9 सप्टेंबर रोजी बेळगावात अनेक कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. दुसऱया दिवशी नवी दिल्लीला गेले.

संसद अधिवेशनात भाग घेण्यापूर्वी कोरोना तपासणी झाली. अहवाल पॉझिटिव्ह आला. 11 सप्टेंबर रोजी त्यांनी स्वतः या संबंधीची माहिती जाहीर केली. आपला अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी आपल्याला कसलीच लक्षणे नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण उपचार घेत आहोत. आपल्या संपर्कात आलेल्यांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन केले होते. त्यामुळे त्यांना काही झाले नसणार. अनेक जण कोरोनामुक्त होत आहेत तसे सुरेश अंगडीही या संकटातून बाहेर पडणार, अशी अपेक्षा बेळगावकरांना होती. ही अपेक्षा फोल ठरली. बुधवारी रात्री एम्स्मध्ये त्यांचे निधन झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात 30 मे 2019 रोजी केंद्रिय रेल्वेराज्य मंत्रीपदी त्यांनी शपथ घेतली. 30 मे 2020 ला ते केंद्रिय मंत्री होवून एक वर्ष उलटले. मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर उमेदीने ते कामाला लागले होते. बेळगावसह उत्तर कर्नाटकातील रेल्वेच्या अनेक प्रकल्पांना त्यांनी चालना दिल होती. सी. के. जाफरशरीफ, जॉर्ज फर्नांडीस आदींच्या काळात कर्नाटकातील रेल्वेच्या योजनांना गती मिळाली होती त्यानंतर सुरेश अंगडी यांनी तसाच सपाटा सुरु केला होता. बेळगाव-कित्तूर-धारवाड नूतन रेल्वे मार्गाला मंजुरीही मिळाली होती. अशा अनेक योजना त्यांनी मार्गी लावल्या होत्या.

बेळगावकरांनाही त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. या अपेक्षा पूर्ण होण्याआधीच ते आपल्यातून निघून गेले आहेत. भाजप जिल्हा उपाध्यक्ष, अध्यक्ष असताना त्यांच्यात जो नम्रपणा होता तोच नम्रपणा केंद्रियमंत्री झाल्यानंतरही टिकून राहिला. समोर लहान मोठे कोणीही आले तरी एक स्मीतहास्य करुन त्यांना नमस्कार करणे हा त्यांचा स्वभाव होता. निवडणूका जवळ आल्या त्यांच्या पराभवासाठी अनेक खेळी विरोधकांकडून खेळल्या जायच्या. या सर्व खेळींवर स्मीतहास्य, नम्रपणा व नमस्काराच्या बळावर ते मात करायचे.

राजकीय नेतृत्व म्हटले की त्यांच्या विषयी अनेक बऱयावाईट चर्चा होत असतात. खास करुन नेत्यांची व्यसने कार्यकर्त्यांमध्ये नेहमी चर्चेचा विषय असतो. सुरेश अंगडी हे त्यासाठी अपवाद होते. कारण ते निर्व्यसनी होते. विरोधकांवर खुन्नस धरण्याची त्यांची प्रवृत्ती नव्हती. निवडणूका संपल्या की सगळय़ांना सोबत घेवून ते कामाला लागायचे. तरीही त्यांच्यावर टीका व्हायच्या. अधूनमधून आपल्या बोलण्यामुळे ते अडचणीत यायचे. साऱयांचे ऐकले तरी स्वतःच्या मनाला जे पटेल तेच करण्याचा त्यांचा स्वभाव होता. आता नवी दिल्लीतच त्यांच्यावर अंत्यक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. बेळगावकरांना त्यांचे अंत्यदर्शनही लाभणार नाही. चाहते, कार्यकर्ते व बेळगावकरांना चटका लावून ते आपल्यातून निघून गेले आहेत.

हे वृत्त खोटे ठरावे

सुरेश अंगडी यांच्या निधनाचे वृत्त वाऱयासारखे पसरले. मात्र कोणीच त्याच्यावर प्रथमदर्शनी विश्वास ठेवायला तयार नव्हते. सुरेश अंगडी यांचे असे निधन होईल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. त्यामुळे सामान्य नागरिक, कार्यकर्ते, त्यांचे चाहते आणि अगदी राजकीय मंडळीसुद्धा पुन्हा पुन्हा या वृत्ताची खात्री करुन घेत होती. कदाचित काही तरी चमत्कार घडेल आणि हे वृत्त खोटे ठरेल असेच प्रत्येकालाच वाटत होते. पण प्रुर नियतीने आपला डाव साधला आणि सुरेश अंगडी आपल्यात नाहीत हे वास्तव प्रत्येकालाच जड अंतःकरणाने स्वीकारावे लागले.

कधीही भरून येणारे नुकसान

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनाने कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. बेळगावच्या मराठी भाषिकांचे ते आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनाने निष्कलंक चारित्र्याच्या नेत्यास आम्ही मुकलो आहोत.

-श्री किरण जाधव, बीजेपी नेता बेळगाव

बेळगावचे आणि संपूर्ण कर्नाटकाचे फार मोठे नुकसान

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन ही अतीशय धक्कादायक घटना आहे .चार वेळा खासदारकी मिळवूनही त्यांना अजिबात गर्व नव्हता. सामान्यातल्या सामान्य माणसाशीही  ते अतिशय सौजन्याने वागत. त्यांच्या निघून जाण्याने बेळगावचे आणि संपूर्ण कर्नाटकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. मी एका चांगल्या मित्रास गमावलो आहे.

 -अविनाश पोतदार, चेअरमन मार्कंडेय सहकारी साखर कारखाना, काकती -बेळगाव

सर्वांच्या अडचणीत धावून जाणारा नेता हरपला

सुरेश अंगडी मंत्री झाले तरीही भेट झाली की थांबून बोलल्याशिवाय कधीही  पुढे जात नव्हते. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी माणसाची मदत त्यांना नेहमी लाभली आहे. याबद्दल त्यांना कृतज्ञता होती. बेळगाव जिल्हय़ातील सहकारी बँका आणि सोसायटय़ांच्या अडीअडचणीला ते धावून येत. जिल्हय़ातील समस्यांच्या सोडवणुकीत त्यांची मोठी मदत होती. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य असताना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी आपल्याला मिळाली होती.

प्रत्येकाच्या अडचणीत धाऊन जाणारा एक नेता हरपला याचे वाईट वाटते.

बाळासाहेब काकतकर

माजी नगरसेवक, मराठी नगरसेवक गटनेते

Related Stories

मल्लिकार्जुन कलादगी यांच्याकडे खानापूरचीही जबाबदारी

Amit Kulkarni

बेळगाव जिल्ह्यात ब्लॅक फंगसचे ८७ रुग्ण: जिल्हाधिकारी

triratna

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना किमान वेतन द्या

Patil_p

दहावीचा आज विज्ञान पेपर

Patil_p

कर्नाटक पीयूसी द्वितीय वर्षाच्या पुरवणी परीक्षा ७ सप्टेंबरपासून

triratna

महाराष्ट्राने कणखर भूमिका घ्यायला हवी!

Amit Kulkarni
error: Content is protected !!