तरुण भारत

वाईतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटलाल ओसवाल यांचे निधन

वाई / सातारा

येथील व्यापारी,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,गोरक्षक,वाई अर्बन बँक परिवाराचे प्रमुख व बँकेचे माजी अध्यक्ष पोपटलाल ओसवाल ( वय ७१) यांचे ह्रदयविकाराने पहाटे निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातंवंडे असा परिवार आहे.नगरसेवक दीपक ओसवाल यांचे ते वडील होत.

पोपटलाल वरदीचंद ओसवाल उर्फ पोपट काका यांनी सामाजिक, शैक्षणिक,सहकार व गोरक्षण कार्यात स्वतःला झोकून दिले होते.त्यांच्यावर संघ विचारांचा पगडा होता. जिल्ह्यातील अनेक संस्थांची ते निगडीत होते.

वाई अर्बन बँक परिवाराचे प्रमुख व माजी अध्यक्ष होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने मोठी प्रगती केली .दिनेश ओसवाल स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी वाई, सातारा,महाबळेश्वर,जावली,उत्तर कोरेगाव,खंडाळा तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले.दुर्गम आणि डोंगराळ कांदाटी खोऱ्यात मागील वीस वर्षापासून तेथील मुलांना खोड रबर, पेन्सिल पासून शालेय गणवेश दप्तर वह्या पुस्तके ते दरवर्षी पोहोचवत होते. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे ते माजी संचालक होते. या माध्यमातून त्यांनी येथील कन्या शाळेला मोठे वैभव प्राप्त करून दिले. त्यांच्याच कारकिर्दीत कनिष्ठ महाविद्यालय,व्यवसाय शिक्षण , व्हीजन इंग्लिश मीडियम स्कूल आणि बीसीए महाविद्यालय आदी विभाग सुरू झाले. भारत विकास ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक अपंगांना आपल्या पायावर उभे केले.आपुलकी मतिमंद मुलांच्या शाळा,पाचवड (ता वाई) येथेही त्यांनी मोलाची मदत केली. अनेक गावांमध्ये त्यांनी नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरे घेतली. त्यातून अनेकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्यांनी करून दिली. येथील राजराजेश्वर जैन गुरुमंदिर उभारणीत व सध्याच्या जैन मंदिर पुनर्वसनामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. वेळे (ता वाई)येथे त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना बरोबर घेऊन करुणा मंदिर गोशाळा उभारली आहे. याठिकाणी पाचशे च्या पेक्षा जास्त भाकड गाईंचे संगोपन केले जाते.जेष्ठ नागरिक संघाने त्यांचा ‘वाई भूषण’पुरस्कार देऊन गौरव केला होता.परिसरातील अनेकांचे ते मार्गदर्शक व आधारस्तंभ होते.

मागील आठवड्यात करोना बाधीत झाल्याने पुणे येथे रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना करोनाची लक्षणे नसल्याने तसे उपचार सुरु नव्हते . आज पहाटे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. पुणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

सातारा : ऑगस्टमध्ये कोरोना जिल्हय़ात दुप्पट

triratna

सातारा : जिल्ह्यात २०१ जण पॉझिटिव्ह, उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू

triratna

धोम येथील वाळूमाफियांना दणका

Patil_p

शासनाचे धान्य प्रत्येक कुटुंबाला मिळाले पाहिजे

Patil_p

उंब्रजमध्ये चार दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

Patil_p

शिवभोजन थाळीचा आस्वाद घेण्यासाठी सातारा शहरात केंद्रावर रांगा

Patil_p
error: Content is protected !!