तरुण भारत

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन

आयपीएल समालोचनासाठी मुंबईत असताना तीव्र हृदयविकाराचा झटका, क्रिकेट वर्तुळाला धक्का

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisements

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि सुप्रसिद्ध समालोचक डीन जोन्स यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या समालोचनासाठी ते मुंबईत आले होते. त्यांच्या अनपेक्षित निधनाच्या वृत्ताने संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला आहे.

आयपीएल प्रक्षेपण पथकाचे एक सदस्य असल्याने ते मुंबईत राहत होते. गुरुवारी होणाऱया सामन्याबाबत नियोजन करण्यासाठी ते हॉटेलमध्ये सहकाऱयांशी चर्चा करीत असताना ते अचानक कोसळले. त्यांना जवळच असलेल्या इस्पितळात नेण्यात आले होते. पण ते मृत झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते 59 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त ऑस्ट्रेलियात त्यांच्या पत्नीला कळविण्यात आले आहे. दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये ते सध्या राहत होते. गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास नाष्टा आटोपल्यानंतर ते आयपीएल प्रक्षेपणासंदर्भातील बैठकीत सामील झाले. त्यानंतर ते हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये सहकाऱयांशी चर्चा करीत बसले असताना अचानक ते कोसळले, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्यांना तातडीने जवळच असलेल्या हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. पण हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देताना एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी ही माहिती सर्वांना दिली. ‘हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखात सहभागी आहोत. पुढील व्यवस्था करण्यासाठी आम्ही ऑस्ट्रेलियन दूतावासाच्या संपर्कात आहोत,’ असे या पत्रकात त्यांनी नमूद केले होते. जोन्स हे क्रिकेटचे खरे राजदूत होते. दक्षिण आशिया विभागात क्रिकेटचा प्रसार करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. नवीन प्रतिभावंतांचा शोध घेण्यात आणि त्यांना घडवण्यात ते नेहमीच उत्सुक असायचे. समालोचक म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. त्यांची गैरहजेरी यापुढे प्रत्येकाला जाणवत राहील, असेही त्यांनी त्यात म्हटले आहे.

त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसल्याचे अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्यांना श्रद्धांजली वाहताना सांगितले. त्यात सचिन तेंडुलकर, रवि शास्त्री, सेहवाग, कोहली, ऍरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, मायकेल क्लार्क, जिमी नीशम, वहाब रियाझ व अन्य खेळाडू तसेच आयपीएलमधील सर्व संघांचा समावेश आहे.

जोन्स यांची कारकीर्द

आक्रमक फलंदाजीसाठी जोन्स यांना ओळखले जायचे. ऑस्ट्रेलियातर्फे त्यांनी 1984 ते 1994 या कालावधीत प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी एकूण 52 कसोटीत 46.55 धावांच्या सरासरीने 3631 धावा जमविल्या. त्यात 11 शतके व 14 अर्धशतकांचा समावेश आहे. 1986 मध्ये मद्रासमध्ये (चेन्नई) भारताविरुद्ध झालेल्या तिसऱया कसोटीत त्यांनी डीहायड्रेशनचा त्रास होत असूनही 210 धावांची द्विशतकी शानदार खेळी केली होती. भारतात ऑस्ट्रेलियातर्फे नोंदवलेली ती आजही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. रोमांचक ठरलेला हा सामना टाय झाला होता. याशिवाय 164 वनडेत त्यांनी 44.61 च्या सरासरीने 6068 धावा जमविल्या. त्यात 7 शतके व 46 अर्धशतकांचा समावेश आहे. 1987 मध्ये भारतात झालेली विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱया ऑस्ट्रेलियन संघाचे ते सदस्य होते. 1984 मध्ये वनडे पदार्पण केल्यानंतर पहिले शतक नोंदवण्यासाठी त्यांना तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. 1 जानेवारी 1987 ला इंग्लंडविरुद्ध 104 धावांची खेळी केल्यानंतर लगेच दुसऱया दिवशी पाकिस्तानविरुद्ध 121 धावा जमविल्या होत्या. मात्र पर्थमध्ये झालेल्या या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला होता.

Related Stories

‘सूर्य’ तळपला! ‘टॉस’ नव्हे, भारतच ‘बॉस’!

Amit Kulkarni

राज्यस्तरीय शाहू मॅरैथॉनची तयारी पूर्ण

triratna

गुणवंत खेळाडूंना केंद्रीय नोकरीची लॉटरी

Patil_p

बेंगळूर टेनिस स्पर्धेत पेसचा सहभाग

Patil_p

ऍथलेटिक्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी सुमरीवाला

Patil_p

स्पेनच्या बॅडोसाचे पहिले जेतेपद

Patil_p
error: Content is protected !!