तरुण भारत

मडगाव पालिका मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांची अखेर बदली

अनेक प्रकरणांमुळे वादग्रस्त ठरली कारकीर्द, बदलीच्या मागणीने धरला होता जोर, बिजू नाईक नवीन मुख्याधिकारी

प्रतिनिधी / मडगाव

Advertisements

मडगाव पालिकेचे वादग्रस्त मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांची अखेर बदली झाली असून सार्वजनिक बांधकाम खात्याचे संचालक (प्रशासन) या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बिजू नाईक यांची नवीन मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे.

पंचवाडकर यांनी मंगळवारी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या पार्टीस उपस्थित सर्वांनी सोशल डिस्टसिंग व मास्क वापरणे हे कोविडविषयक नियम धाब्यावर बसविल्याने त्याच्यावर मोठय़ा प्रमाणात टीका झाली होती. सरकारने कोविड कमांडंट म्हणून पंचवाडकर यांची नियुक्ती केलेली असताना घडलेल्या या प्रकाराची त्वरित दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालिका कर्मचारी संघटनेने उचलून धरली होती. तसेच फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनीही पंचवाडकर हे सरकारी जावई बनले असून त्यांना कोविड नियम धाब्यावर बसविल्याने दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणी केली होती. सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटले होते.

त्यापूर्वी पंचवाडकर यांनी पालिकेतील कर्मचाऱयांची सतावणूक चालविली असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन तसेच त्यांच्यावर कथित विनयभंगाची तक्रार असल्याने त्यांच्या बदलीची मागणी पालिका कर्मचारी संघटनेने उचलून धरली होती. या व अन्य मागण्या पूर्ण न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा देणारी नोटीस त्यांनी पालिकेला व इतर संबंधित अधिकारिणींना दिली होती. मडगाव पालिकेतील विशाखा समिती, जिल्हा स्तरावरील अन्य एक समिती यांनी विनयभंगाचे प्रकरण हाताळूनही काहीच कारवाई न झाल्याने पोलिसांत तक्रार करण्याचे व उच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरविण्यात आले आहे, असे कर्मचारी संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले होते.

निर्णय उशिरा, तरी स्वागत ः शिरोडकर

सरकारने पंचवाडकर यांना बदली करण्याचा निर्णय उशिरा घेतला असला, तरी आम्ही त्याचे स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया गोवा पालिका कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अनिल शिरोडकर यांनी व्यक्त केली आहे. पंचवाडकर यांची बदली करण्याची मागणी आम्ही मागील कित्येक महिन्यांपासून करत आलो होतो. मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, मुख्य सचिव, नगरविकास सचिव, पालिका संचालक यांच्याशी पत्रव्यवहार करून संघटनेने बदलीची मागणी केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंचवाडकर यांना जनतेच्या करांतून वेतन मिळत असते. मात्र त्यांचे नागरिकांकडे वर्तन बेजबाबदारपणाचे होते. अशा अधिकाऱयाला थेट नागरिकांशी संपर्क येतो अशा ठिकाणी सरकारने नियुक्त करू नये, असे शिरोडकर म्हणाले.

विनयभंगप्रकरणी पाठपुरावा चालू राहणार

आमच्या संपावर जाण्याचा इशारा देणाऱया नोटिसीतील एक मागणी पूर्ण झाली असली, तरी अन्य कित्येक पडून असल्याने त्या पूर्ण करण्याची मागणी कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंचवाडकर यांची बदली झाली असली, तरी त्यांच्याविरुद्धच्या महिला कर्मचारी विनयभंगप्रकरणी चौकशी होऊन न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचे प्रयत्न राहणार आहेत. या प्रकरणी पोलीस तक्रार करून न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय आम्ही खुला ठेवला आहे, असे शिरोडकर यांनी स्पष्ट केले.

बदलीचे स्वागत करताना नगराध्यक्षांकडून तिखट प्रतिक्रिया

मडगाव आणि फातोर्डा येथील सर्वसामान्य नागरिकांसाठी लाभदायक असलेल्या व दीर्घकालापासून मागणी होणाऱया अजित पंचवाडकर यांच्या मडगाव पालिकेच्या मुख्याधिकारीपदावरून बदलीचे आपण मनापासून स्वागत करते. पंचवाडकर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली केली. एवढेच नव्हे, तर त्यांनी पालिकेच्या प्रतिमेचे मोठे नुकसान केले, अशी तिखट व खरमरीत टीका नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी केली आहे. गेल्या 10 महिन्यांचा त्यांचा संपूर्ण कार्यकाळ निवडून आलेले नगरसेवक आणि पालिकेला केलेल्या असहकाराने भरला होता. त्यांनी सर्व सार्वजनिक कामांमध्ये अडथळे आणले आणि प्रशासन ठप्प करण्याचा त्यांचा हेतू होता. यामुळे नगरसेवकांची सर्वसामान्यांना मदत करण्याची इच्छा असूनही मडगाव आणि फातोर्डा येथील लोकांना त्रास सहन करावा लागला, अशी टीका नाईक यांनी केली आहे.

पंचवाडकर यांच्या कारकिर्दीत पालिकेच्या आवारात वारंवार येणारे एजंट व दलाल तसेच मुख्याधिकाऱयांकडून कामे करण्यासाठी नागरिकांकडून हफ्ते घेणाऱयांच्या संख्येतही मोठी वाढ झाली होती, असा दावा नगराध्यक्षांनी केला आहे. त्यांना हटविलेले असल्याने अशा एजंट व दलालांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. मुख्याधिकारी म्हणून महिला कर्मचाऱयाचा लैंगिक छळ केल्याचा आरोपच त्यांच्यावर झाला नाही, तर जनता आणि लोकप्रतिनिधींच्या इच्छेविरुद्ध कार्निव्हल मिरवणुकीच्या मार्गात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले होते, याकडे नाईक यांनी लक्ष वेधले. आपल्याला खात्री आहे की, त्यांच्या बदलीमुळे मडगाव पालिकेच्या कामकाजात स्वागतार्ह बदल होईल आणि सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना फातोर्डा आणि मडगावमधील लोकांसाठी प्रभावीपणे काम करण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

पेट्रोल व डिझेलची शंभरीकडे वाटचाल

Amit Kulkarni

संकटाच्या स्थितीतही गोवा डेअरीत लूट

Patil_p

सांखळीत सूडाचे राजकारण थांबता थांबेना

Amit Kulkarni

शेतकऱयांचे फॉर्म भरण्यासाठी पोस्टमन शेतकऱयांच्या दारात

Patil_p

मातृछायेच्या कार्याला हातभार म्हणजे जीवनातील खरे भाग्य !

Patil_p

माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोणकर यांचे निधन

Patil_p
error: Content is protected !!