तरुण भारत

सॅमसन-केएल राहुल यांची जुगलबंदी रंगण्याची अपेक्षा

आयपीएल : राजस्थान रॉयल्स-किंग्स इलेव्हन पंजाब मुकाबला आज, षटकारांच्या आतषबाजीची पुन्हा पर्वणी

वृत्तसंस्था / शारजाह

Advertisements

राजस्थान रॉयल्स व किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात आयपीएलमधील साखळी लढत रविवारी होत असून संजू सॅमसन आपला फॉर्म या सामन्यातही पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करेल. राजस्थान संघात जोस बटलर सामील झाल्याने त्यांची बाजू आणखी भक्कम झाली असून या सामन्यातही षटकारांची आतषबाजी पहावयास मिळण्याची अपेक्षा आहे. सायंकाळी 7.30 पासून या सामन्याला सुरुवात होणार आहे.

आधीच्या सामन्यात दोन्ही संघांनी विजय मिळविले असल्याने दोन्ही संघांचे मनोबल उंचावलेले असून विजयी जोम पुढे चालू ठेवण्याचा त्यांचा मनोदय आहे. क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर बटलर राजस्थान संघात दाखल झाला असून यशस्वी जैस्वालसमवेत तो सलामीला येण्याची शक्यता आहे तर स्टीव्ह स्मिथ डेव्हिड मिलरच्या जागेवर फलंदाजीस येईल. टॉम करण व जोफ्रा आर्चर यांच्या समावेशाने चार विदेशी खेळाडूंचा कोटा पूर्ण होईल. किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल याच्याकडे भारताचा भावी कर्णधार म्हणून पाहिले जात असून आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्याने तुफानी फटकेबाजी करीत संघाला 97 धावांनी विजय मिळवून दिला होता. राहुलने केवळ 69 चेंडूत 7 षटकारांचा पाऊस पाडत नाबाद 132 धावा झोडपल्या होत्या. आयपीएलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवणारा तो भारतीय फलंदाज बनला आहे. सीमारेषा छोटय़ा असल्याने या सामन्यातही फटकेबाजीचा हा जोम कायम ठेवण्याचा तो प्रयत्न करेल.

राजस्थानच्या संजू सॅमसनने याच मैदानावर झालेल्या आधीच्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई करीत 32 चेंडूत 74 धावा तडकावताना 9 षटकार ठोकले. नंतर जोफ्रा आर्चरने शेवटच्या षटकात 4 षटकार ठोकल्याने राजस्थानला दोनशे धावांचा टप्पा पार करता आला होता. राजस्थानचा कर्णधार स्मिथने देखील 47 चेंडूत 69 धावा जमविल्या होत्या. कन्कशन संबंधित समस्येनंतर खेळलेला त्याचा हा पहिलाच सामना होता. पंजाबचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आरसीबीविरुद्ध (5) अपयशी ठरला होता. त्याची भरपाई करण्यास तो उत्सुक असेल. गोलंदाजीत पंजाबच्या वेगवान माऱयाचे नेतृत्व शमी आणि शेल्डॉन कॉट्रेल करतील. रवि बिश्नोई व मुरुगन अश्विन या फिरकी द्वयीने आरसीबीविरुद्ध प्रत्येकी 3 बळी टिपून विजयात मोलाची भूमिका बजावली होती. तशाच कामगिरीची त्यांच्याकडून अपेक्षा संघव्यवस्थापन करीत आहे.

आर्चरच्या डेथ ओव्हर्समधील अचूक गोलंदाजीमुळे राजस्थानने 216 धावांचे यशस्वी संरक्षण केले. याशिवाय राहुल तेवातियाने (3-37) आघाडी फळीतील बळी मिळवित त्याला मोलाची साथ दिली होती. आयपीएलमध्ये उनादकट क्वचितच चमकला आहे. त्यामुळे स्मिथ व मॅकडोनाल्ड नवोदित कार्तिक त्यागी किंवा अनुभवी वरुण ऍरोन यापैकी एकाला उनादकटच्या जागी आजमावून पाहतील, अशी शक्यता वाटते.

Related Stories

ऍथलेटिक्स फेडरेशनची निवडणूक 31 ऑक्टोबरला

Patil_p

एफसी गोवाचे शिल्पकार सर्जिओ लॉबेरा आता बनले प्रतिस्पर्धी

Patil_p

शाहू स्टेडियमवर ‘जय शिवाजी’..!

Abhijeet Shinde

रिअल माद्रिदचे प्रशिक्षक झिदान कोरोनाबाधित

Patil_p

मेमॉल रॉकी यांचा फुटबॉल प्रशिक्षकपदाचा राजीनामा

Patil_p

भारताचा उपांत्य फेरीत पराभव

Patil_p
error: Content is protected !!