तरुण भारत

राज्यात जानेवारीपासून रोजगार भरती

 मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

प्रतिनिधी/ म्हापसा

राज्यात सरकारकडून लोकांच्या अपेक्षा खूप आहेत. त्यात रोजगार ही प्रमुख समस्या आहे. भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत रोजगारावर बरीच चर्चा झाली. लोकांची अपेक्षा रोजगार असून डिसेंबरपर्यंत रोजगार भरती बंद आहे. येत्या जानेवारी 2021 पासून राज्यात रोजगार भरती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हापसा येथे भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर, वीजमंत्री नीलेश काब्राल, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, अनिल होबळे उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आम्ही कोविडच्या काळात विकासकामांबाबत कमी पडलो असलो तरी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध प्रकल्प आता सुरू होणार आहेत. आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून अधिक 28 योजना राज्यात येणार आहे. या लोकांपर्यंत  पोचविण्यासाठी मायक्रो प्लेनिंग करून सरकार योग्यरीत्या लोकांपर्यंत पोहचणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

कोरोनामुळे सरकारी तिजोरीत खडखडाट

सरकारच्या तिजोरीत आर्थिक खडखडाट आहे काय? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना केला असता ते म्हणाले की, कोरोनामुळे आर्थिक जमा कमी झाली आहे हे मान्य करावेच लागणार आहे. आपण मुख्यमंत्री झालो तेव्हा आर्थिक बाब 35 ते 40 टक्के होती. 20 कोटी 240 लाखांचे कर्ज सरकारने घेतले होते. त्यापैकी दीड हजार कोटी रुपये परतफेडही केलेले आहेत. कोरोनाचा काळ असूनही येत्या सहा महिन्यांत मार्चपर्यंत संपूर्ण अभ्यास करून राज्याची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

कार्यकर्त्यांना प्रशिक्षण हे भाजपचे मुख्य लक्ष्य

मुख्यमंत्री म्हणाले की, राजकीय ठरावही या बैठकीत घेण्यात आले. तसेच कोरोनाबाबतही यावेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. येत्या 2022 च्या निवडणुकीसाठी येत्या 15 ऑक्टोबर 2020 पासून राज्यात भाजपच्या  कार्यकर्त्यांसाठी ट्रेनिंग सुरू होणार असून हे भाजपचे मुख्य लक्ष्य असल्याचे  मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोव्यातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांना निवडणुकीची ट्रेनिंग देण्यात येणार आहे. राज्यातील नागरिकांचा विश्वास भाजपा सरकारवर आहे तो आपणास पुन्हा सांगण्याची गरज नाही. सोशल मीडिया तसेच सर्वांच्या तोंडावर व हृदयात भाजपचे नाव कोरले गेले आहे. कोरोनाच्या महामारीत आर्थिक टंचाई असतानाही या सरकारने सर्व योजना योग्यरीत्या पुढे नेण्याचे काम केलेले आहे. असे असतानाही केंद्र सरकारच्या सहकार्याने नवीन प्रकल्प राज्य सरकार पुढे नेणार आहे. भाजपच्या ट्रेनिंगसाठी भाजपा कार्यकर्ते दिवसभर ऑनलाईन राहाणार आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पेडणेत इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्प

राज्यात लँडऍलॉटमेंट धोरण सुरू होणार आहे. या प्रकल्पाद्वारे आम्ही पेडणेत  इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्प उभारणार आहोत. राष्ट्रीय मार्ग ते इलेक्ट्रॉनिक सिटी हेही फास्टट्रेकवर घेण्यात आले आहे. पेडणेत नवीन हॉस्पिटल उभारणे काही आर्थिक बाबतीमुळे राहिले आहे.

शैक्षणिक धोरणाबाबतही चर्चा

2021 पर्यंत शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. यात मातृभाषेच्या शिक्षणास आम्ही कुठेच विरोध केला नाही. आजही आम्ही मातृभाषेचे शिक्षण प्रमोट करतो आहोत. पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतूनच द्यावे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिवसभर झालेल्या कार्यक्रमाचा यावेळी आढावा घेतला.

Related Stories

मंत्र्यांचा जोरदार प्रचार, विरोधकांची सतावणूक

Patil_p

सलग चौथ्या दिवशीही पावसाने गोव्याला झोडपले

Omkar B

खाजगी बसेस रस्त्यावर आल्याच नाही…

Omkar B

कोरोना संकटकाळात युथ हॉस्टेलने जपली माणुसकी

Patil_p

कंटेनमेंट झोनमधून झुआरीनगरातील भाग हटवा नागरिकांची मागणी

Omkar B

आयआयटी सीमांकन विरोधात आंदोलक पुन्हा रस्त्यावर

Patil_p
error: Content is protected !!