तरुण भारत

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

कोमामध्ये असतानाच हृदयविकाराचा झटका : दिल्लीतील लष्करी रुग्णालयात अखेरचा श्वास

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

गेल्या सहा वर्षांपासून कोमात असलेले माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे रविवारी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. कोमामध्ये असतानाच प्रकृती बिघडल्याने त्यांना 25 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर ‘मल्टीऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम’ या विकारासाठी लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

7 ऑगस्ट 2014 रोजी जसवंत सिंह बाथरूममध्ये पडल्यानंतर त्यांच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील लष्करी संशोधन व रेफरल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हापासून ते कोमामध्ये होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रविवारी सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता, अशी माहिती दिल्लीतील लष्करी रुग्णालयाकडून देण्यात आली.

राजकारणातील ‘संकटमोचक’

भारतीय लष्करात कर्तव्य बजावल्यानंतर सिंग यांनी राजकारणात पदार्पण केले. भाजपच्या स्थापनेत सहभाग असलेल्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील ‘संकटमोचक’ अशी त्यांची प्रतिमा होती. परराष्ट्र, संरक्षण, भूपृ÷ वाहतूक अशा महत्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी पार पडली. प्रत्यक्ष जीवनात अत्यंत अदबशीर असलेल्या सिंह यांनी सभागृहात अत्यंत अभ्यासू, सडेतोड आणि आक्रमक भाषणे केल्याचे अनेक दाखले आजही दिले जातात.

2009 साली मोहम्मद अली जिना यांची स्तुती केल्यामुळे जसवंत सिंह यांना भाजपमधून बडतर्फ करण्यात आले होते. मात्र, नंतर त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेतले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपपासून पुन्हा फारकत घेतली होती. त्यांनी राजस्थानच्या बारमेर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपच्या कर्नल सोना राम यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

मान्यवरांकडून श्रद्धांजली

जसवंत सिंह यांच्या निधनाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. जसवंत सिंह यांनी आधी लष्करात आणि त्यानंतर राजकारणात राहून देशाची परिश्रमपूर्वक सेवा केली. त्यांच्या जाण्याने मी दु:खी झालो आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील ट्विट करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. बौद्धिक क्षमता आणि देशसेवेसाठी जसवंत सिंह हे कायम स्मरणात राहतील. त्यांनी राजस्थानमध्ये भाजप पक्ष मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

Related Stories

ममता बॅनर्जी अपघातावरून राजकारण जोरात

Patil_p

ताजमहाल पर्यटकांसाठी खुला

Patil_p

मधूमेह, रक्तदाब, 81 वर्षे वय तरीही कोरोनावर मात

Patil_p

‘चक्का जाम’ दरम्यान अत्यावश्यक सेवांना रोखले जाणार नाही…

datta jadhav

सलग चौथ्या दिवशी वाढल्या पेट्रोल – डिझेलच्या किंमती

Rohan_P

पहिल्यांदाच परराज्यातील व्यक्तीला मिळाले जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व

datta jadhav
error: Content is protected !!